बुद्धिशक्तीची अतूट प्रेरणा

06 May 2024 22:14:06
 mansi nagda
 
यश मिळवण्याची एक संधी शोधणार्या प्रत्येक ‘नाही रे’ गटातील व्यक्तीसाठी मानसी दयाराम नागदा म्हणजे एक ऊर्जादायी प्रेरणाच. तिच्या बुद्धिशक्तीचा या लेखात मागोवा घेतला आहे.
अरे बापरे तुझे वजन बघ ९० किलो आहे. तू बॉक्सिंग खेळणार? वजनामुळे तुला एक उडी तरी मारता येईल का?” तिच्या वजनावरून तिला अनेकांनी हिणवले. ती खेळत राहिली, मोजून चार स्पर्धा हरली. मात्र, प्रत्येक वेळी तिचे आईवडील आणि शिक्षक तिला धीर देत राहिले. कुलदेवतेचे स्मरण आणि हनुमान चालिसा तसेच शंकराचा मंत्र जपत तिनेही तिच्यातला आत्मविश्वास कायम ठेवला. आईबाबा आणि शिक्षक यांचा विश्वास सार्थ ठरवत तिने नुकतेच राज्यस्तरीय चेस बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
 
मानसी नागदा या १८ वर्षांच्या मुलीचा जीवनपट पाहू. दयाराम आणि गुड्डी नागदा हे दाम्पत्य मूळचे राजस्थानचे. कामधंद्यानिमित्त मालाडच्या सुंदरनगरात स्थायिक झालेले. त्यांना दोन अपत्ये. त्यापैकी एक मानसी. दयाराम यांचे भंगारचे दुकान. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण. मानसीला लहानपणापासूनच खेळामध्ये विशेष रस. टीव्ही, मोबाईल यावर ती खेळासंदर्भातले व्हिडिओ पाहायची.
 
इयत्ता सहावीला असताना शाळेत वार्षिक उत्सव होता. या उत्सवासाठी मानसीच्या मैत्रिणींनी नवीन कपडे, त्यावर शोभणार्या वस्तू खरेदी केल्या. ते पाहून मानसीलाही वाटले की, आपणही नवीन डे्रस, वस्तू घ्याव्यात. तिने पित्याकडे हट्ट केला. पण, त्यावेळी तत्काळ या सगळ्या वस्तू विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते म्हणाले, ”बेटा, आता लगेच आपण हे घेऊ शकत नाही. तू जेव्हा मोठी होशील, तेव्हा सामर्थ्यशाली असायला हवेस. तुझ्यासोबत तू दुसर्यांनाही मदत करशील. देवाने तुला त्यासाठीच तर आमची मुलगी बनवून पाठवले.” त्यांच्या बोलण्याने मानसीच्या मनात जिद्द उत्पन्न झाली की, आयुष्यात काहीतरी केले पाहिजे.
 
पुढे आठवीला असताना मानसी बेसबॉल खेळू लागली. बेसबॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मानसी खेळणार होती. ती स्पर्धा रद्द झाली. मानसीला प्रचंड वाईट वाटले. पण, आईबाबा आणि तिच्या कुलदेवतेचे नामस्मरण यामुळे ती या विचारांपासून दूर झाली. मात्र, कोरोनाच्या दोन वर्षांत ४५ किलो वजन असलेल्या मानसीचे वजन ९० किलो झाले. याचकाळात मानसीने महाविद्यालयात कलाशाखेत प्रवेश घेतला. ‘जाडी मुलगी’ म्हणून तिला अनेक लोकांनी हिणवले.
 
मात्र, मानसीचा विचार करून बाबांनी सांगितले की, ”सामर्थ्यशाली बनायचे. त्यामुळे मला स्वतःला सिद्ध करावेच लागेल.” त्यामुळेच महाविद्यालयीन शिकून ती अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन लर्निंग कोर्स करू लागली. एकदा तिने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा बॉक्सिंग सराव पाहिला. बॉक्सिंग शिकावे असे तिला कुठे कसे शिकवणार, याची खातरजमा करून मानसीला परवानगी दिली. मानसी कृष्णा सरांच्या क्रिसॉन स्पोर्ट्स अॅकॅडमीमध्ये बॉक्सिंग शिकू लागली. या काळात मानसीने पुन्हा ४० किलो वजन कमी केले.
 
असो. बॉक्सिंगसाठी काही वस्तू गरजेच्या असतात. हा पूर्ण संच सात ते नऊ हजार रुपयांचा असतो. मात्र, मानसीने ठरवले की, आईबाबा परिस्थिती नसतानाही आपल्यासाठी खूप करतात, त्यांना खर्चात पाडायचे नाही. एक वर्ष तिने दुसर्यांचा संच मागून तो वापरून सरावही केला आणि स्पर्धाही खेळल्या. बॉक्सर खेळाडू प्रोटिन पावडर, शेक वगैरे घेतात. तो आहार खर्चिकच असतो. आपल्या बाबाने आपल्यासाठी इतका खर्च करू नये, यासाठी मानसी मग प्रोटिन म्हणून आहारात चण्याचा वापर करू लागली. घरी बनवलेला ताज्या फळांचा रस आणि आईच्या हातची भाजीभाकरी हेच तिचे शक्तिवर्धक अन्न. नुकतेच सुवर्णपदक मिळवून तिने सिद्ध केले की, आपले भारतीय पारंपरिक अन्न हे शक्तीचे स्रोतच आहे.
 
तिचे वडील हे रा. स्व. संघाशी संबंधित. संघाच्या सुशील जाजू यांच्याशी त्यांचा स्नेह. सुशील यांना जेव्हा कळले की, मानसी बॉक्सिंग खेळते, तेव्हा त्यांना खूप अप्रूप आणि अभिमान वाटला. ते मानसीला म्हणाले, ”बेटा, तू खेळ, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत.” त्यांनी मानसीला बॉक्सिंग संच मिळवण्यासाठी स्पॉन्सर मिळवून दिला. रा. स्व. संघाच्या माध्यमातून आपल्याला सज्जनशक्तीचा पाठिंबा आहे, हे पाहून मानसीचा हुरूप वाढला. चार स्पर्धा हरल्यानंतर ती एक स्पर्धा जिंकली. पुढे बारावीला तिला महाविद्यालयासाठी प्रतिनिधित्व करावे लागले.
 
मात्र, अभ्यासासाठी मानसीने सहा महिने बॉक्सिंगचा सराव केला नव्हता. तरीही, ती स्पर्धा जिंकली. मानसीचा आत्मविश्वास, जिद्द पाहून शिक्षक कृष्णा यांनी तिला सुचवले की, ‘तू चेस बॉक्सिंग खेळ.’ मानसी कधीही बुद्धिबळ खेळली नव्हती. शिक्षक म्हणताहेत तर खेळायचे, या आत्मविश्वासाने स्पर्धेच्या आठ दिवसांआधी मानसी बुद्धिबळाचे डाव शिकली, सराव केला आणि तिने चेस बॉक्सिंगची राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली.
 
लवकरात लवकर अयोध्येच्या राम मंदिरात रामललाचे दर्शन घ्यायचे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान व्हावा, अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय खेळात यश मिळवायचे, अशी मानसीची इच्छा आहे. मानसी म्हणते की, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून तिला देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. तसेच अधिकाधिक मुली क्रीडा क्षेत्रात येतील, यासाठी तिला प्रयत्न करायचे आहेत. मानसी दयाराम नागदा या मुलीचे यश हे सकल हिंदू समाजासाठी आणि त्यातही संधी मिळवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत लढणार्या लोकांसाठी दीपस्तंभ आहे. मानसी, आम्हाला तुझा अभिमान आहे!
 
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0