मुंबई : राज्यभरात लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. रोहित पवारांचे कट्टर समर्थक असलेले अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राज्यभरात सध्या सर्वच पक्ष लोकसभेच्या प्रचाराला लागले आहेत. रोहित पवारांचेही महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारदौरे सुरु आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे नेते अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अक्षय शिंदे हे रोहित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, आता त्यांच्या पक्षप्रवेशामुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
हे वाचलंत का? - "बहिणीने जास्त दिवस भावाच्या घरी राहू नये!"
अक्षय शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची माहितीही पुढे आली आहे. अक्षय शिंदे हे कर्जत जामखेड विधानसभेमध्ये रोहित पवारांचे कट्टर समर्थक होते.
यावेळी प्रथमच बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायूतीकडून सुनेत्रा पवार या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी थेट लढत होणार आहे. अशातच अक्षय शिंदेंच्या प्रवेशाने शरद पवार गटाचं टेन्शन वाढलं आहे.