चीनचा खलिस्तानी प्रोपगंडा पसरवण्यात हातभार; मेटाच्या कारवाईत उघड!

31 May 2024 17:05:15
china-is-paddling-fake-propaganda-of-khalistan

नवी दिल्ली :
भारताशी स्पर्धा करण्यासाठी तयार असलेल्या चीनने खलिस्तानी फुटीरतावादाला खतपाणी घालण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी चीन बनावट सोशल मीडिया अकाउंटचाही वापर करत होता. जेणेकरून भारतााबाहेर राहणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना एकत्र करता येईल. यासाठी चीन बॉट्सची मदत घेत होता, मात्र फेसबुकची मूळ कंपनी मेटाने त्याच्यावर कारवाई केली आहे. मेटाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये चीनच्या चुकीच्या धोरणांचा खुलासा केला आहे,
 
मेटाने आपला 'ॲडव्हर्सरियल थ्रेट रिपोर्ट' प्रकाशित केला आहे, जो ३३ पृष्ठांचा आहे. यामध्ये चीनमधून चालवले जाणारे ३७ फेसबुक अकाऊंट, ९ इंस्टाग्राम अकाउंट, १३ फेसबुक पेज आणि ५ ग्रुप बंद करण्यात आल्याचे मेटाने म्हटले आहे. यापैकी काही पेजचे जवळपास २७०० फॉलोअर्स आहेत, काही ग्रुप्सचे १३०० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर Instagram आयडीवर १०० पेक्षा कमी फॉलोअर्स आढळले आहेत.
 
या खात्यांद्वारे भारतात तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, पाकिस्तान, नायजेरिया आणि यूके यांसारख्या देशांमध्ये खलिस्तानी दहशतवाद आणि शीख फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात होता. या अहवालाच्या पान क्रमांक ७ वर मेटाने सांगितले आहे की चीनने पोसलेल्या खलिस्तानी समर्थकांचा प्रचार केवळ फेसबुरुपुरता मर्यादीत नसून चीनची कम्युनिस्ट पार्टी (CCP) X आणि Telegram सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा ही वापर त्यात केला जात आहे. यापैकी अनेक बनावट खाती आणि बॉट्स मेटाच्या यंत्रणेने पकडले आणि आम्ही तपास सुरू केला. यापैकी, अनेक खाती शीखांची असल्याचे कळले आणि त्यावर खलिस्तानच्या समर्थनांर्थ मजकूर पोस्ट केला जात होता.
 
चीनचे ऑपरेशन-के

चीनने चालवलेल्या 'ऑपरेशन-के'च्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या खलिस्तान समर्थकांमध्ये भारताविरुद्ध द्वेष पसरवला जात होता. अहवालात असे म्हटले आहे की, “आम्ही खलिस्तानी समर्थक पोस्ट पाहिल्याबरोबर त्या पसरण्याआधीच आम्ही हटवल्या. या पोस्ट्स इंग्रजी आणि हिंदी भाषेत होत्या ज्यात AI ने संपादित केलेल्या बातम्या आणि चित्रे होती. त्यात पंजाबशी संबंधित गोष्टी होत्या, ज्याचा जगभरातील शीख समुदायामध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न होताना दिसत होता. या पोस्टमध्ये खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरची हत्या आणि भारत सरकारच्या दुष्कृत्यांचा समावेश होता.
 

 
Powered By Sangraha 9.0