दुर्गम दुर्ग-अलंग

03 May 2024 20:52:38


AMK
 

सह्याद्रीतील सर्वात थरारक अशी डोंगरयात्रा म्हणजे कळसूबाई रांगेतील अलंग-मदन-कुलंग हे गिरिदुर्ग. यातील अलंग हा किल्ला आकार, तसेच त्याची पायथ्यापासून असलेली कसदार वाटचाल यामुळे अविस्मरणीय आहे.
 
अलंगचा उडदावणे गावाच्या बाजूने येणारा प्रवेशमार्ग अतिशय चिंचोळ्या घळीतून काढला असून, किल्ल्याच्या दुर्गस्थापत्याची पहिली करामती आपल्याला इथेच पाहायला मिळते. अलंगच्या पठारावरून त्याच्या प्रवेशमार्गाचा अजिबात अंदाज लागत नाही आणि हेच त्याच्या बांधणीतील एक ठळक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे किल्ल्याची बांधणी करताना त्याचा प्रवेश जितका दुर्लभ करता येईल, तितका तो बनवला गेला आहे.
 
हीच बाब त्याच्या आंबेवाडी गावाकडील प्रवेशमार्गाची आहे. तिथल्या पायर्‍या इंग्रजांनी उद्ध्वस्त केल्याने सध्या तिथे कठीण श्रेणीचे कातळारोहण करावे लागते. पण, या प्रवेशद्वाराच्या स्थापत्याची खासियत अशी की, गडाच्या दरवाजाजवळ सपाटी कमी असल्याने एका गुहेतच पहारेकर-यांच्या विश्रांतीची जागा म्हणजेच देवडी खोदून काढलेली आढळते. पुढे गडाच्या खोदीव पायर्‍यांजवळदेखील अत्यंत अरुंद मार्ग असून एकावेळी एकच व्यक्ती इथे जाऊ शकेल, अशी रचना इथे केली आहे. मार्गाचा विस्तार न करण्याचे कारण म्हणजे किल्ला काबीज झाल्यास या अरुंद पायर्‍यांजवळच शत्रूला रोखून धरता येऊ शकत असे.
अलंग किल्ल्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, किल्ल्याचा आकार व त्यावेळी गडावर राहणार्‍या लोकांची संख्या लक्षात घेऊन करण्यात आलेली पाण्याची विपुल व्यवस्था. किल्ल्यावर प्रचंड प्रमाणात पाणी उपलब्ध असून किल्ल्याच्या जवळपास प्रत्येक भागात एकतरी पाण्याचे टाके आहे. अलंगला बुलंद असे नैसर्गिक कडे लाभल्याने इथे तटबंदी उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे मुळातच दुर्गम असूनही त्याच्या बांधणीमध्ये गडाच्या सुरक्षिततेचा केलेला बारीक विचार यातच त्याच्या दुर्गस्थापत्याचे सार सामावले आहे.
 
जाण्याचा मार्ग : नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणापासून अलंगच्या पायथ्याला उडदवणे गावाला जाण्यासाठी रस्ता आहे.
 
पाण्याची सोय : गडावर बारमाही पाण्याची टाकी आहे.
 
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
 
विशेष सूचना : अलंग-मदन-कुलंग ही अत्यंत थरारक अशी डोंगरयात्रा असून, हा ट्रेक करताना सुरक्षिततेची सर्व साधने जवळ बाळगावत.
 
Powered By Sangraha 9.0