बासरीच्या सुरेल स्वरांना केवळ नाशिकच नव्हे, तर देश-विदेशात पोहोचविण्यासाठी धडपड करणारे बासरीवादक अनिल यादवराव कुटे यांच्याविषयी...
नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे १९६८ साली अनिल यादवराव कुटे यांचा जन्म झाला. वडील वैद्यकीय अधिकारी, तर आई गृहिणी. वडील रेडिओवर विविध भारती, कामगार सभा असे अनेक कार्यक्रम ऐकत असत. नाशिकमध्ये होत असलेल्या पंडित हरिप्रसाद चौरसिया, बिस्मिल्ला खान, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज अशा अनेक दिग्गज गायकांच्या मैफिली ते टेपरेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करून घरी अनिल यांना ऐकवत आणि गायकाचा आवाज ओळखायला सांगत.
वडिलांना संगीताची आवड असल्याने अनिल यांनाही संगीताची गोडी निर्णय झाली. प्राथमिक विद्यालय, कोशिंबे येथून त्यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतले. पेठे हायस्कूलमधून इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे नवलनगर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ‘डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन’साठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयात उत्कृष्ट बासरी वादन करणार्या सोनी सरांनी एकदा अनिल यांना नाशिकहून सुट्टीमध्ये ‘जी स्केल’ची बासरी आणण्यास सांगितले. परंतु, अनिल यांनी ‘बी स्केल’ची बासरी आणली. सोनी सरांनी बदलून आणण्यास सांगितली, तेव्हा दुकानदाराने नकार दिला. त्यामुळे अनिल यांनी सोनी सरांना नवी बासरी देऊन जुनी बासरी नाईलाजाने स्वतःकडे ठेवली. हॉस्टेलवर राहत असताना पाच ते सहा महिने अनिल यांनी बासरी वाजविण्याचा प्रयत्न केला, पण जमले नाही. सोनी सरांनी त्यांना ‘बासरी तू स्वतःच वाजवायला शिकशील,’ असे सांगितले.
एके दिवशी अनिल यांनी हवेचा दाब अधिक दिल्याने उंच स्वर लागला. हळूहळू बासरीचं गणित अनिल यांना उलगडत गेले. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात बासरी वादनात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि बक्षीसही सोनी सरांच्या हातून स्वीकारले. त्याचवेळी ज्या दिवशी उत्तम बासरी वाजवता येईल, त्या दिवसापासून हजारांंहून अधिक जणांना बासरी शिकविण्याचा पण त्यांनी केला. एकदा घरी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची कॅसेट ऐकली आणि त्यांनी त्यांच्याकडून बासरी शिकण्याचा निश्चय केला. खासगी कंपनीत नोकरी लागल्यानंतर त्याठिकाणी उत्तम बासरी वाजविणार्या रवि जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली.
रवि जोशी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे बासरी शिकले होते. तेव्हा, चौरसिया यांची भेट घेण्याची इच्छा अनिल यांनी रवि यांच्याकडे बोलून दाखवली.
फार तगादा लावल्यानंतर अखेर रवि यांनी अनिल यांना मुंबईतील त्यांच्या गुरूकुलमध्ये नेले. तेव्हा शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर हरिप्रसाद यांनी रुपक कुलकर्णी यांच्याकडून धडे घेण्यास सांगितले. त्यानंतर सुट्टीच्या दिवशी अनिल मुंबईला जाऊन धडे घेत. नंतर पगारातून बचत करून ते पुण्याहून सुनील अवचट यांच्याकडून बासरी विकत घेऊन येत असत. विवेक सोनवणे, रूपक कुलकर्णी, हिमांशू नंदा यांच्या कार्यशाळांना अनिल यांनी हजेरी लावली. बासरी वादनाचा पाया मजबूत करण्यासाठी या कार्यशाळांची मोठी मदत झाली.
२००७ पासून त्यांनी रियाज वाढवला. स्थानिक विद्यालये, महाविद्यालये, मंदिरे अशा ठिकाणी त्यांना बासरी भजनमालेसाठी आमंत्रण मिळू लागले. भावगीत, भक्तिगीत, अभंग ही त्यांची वैशिष्ट्ये. हळूहळू त्यांनी विद्यार्थ्यांना घरीच बासरी वादनाचे धडे देण्यास सुरूवात केली. नोकरी, रियाज आणि शिकवणी अशा तिन्ही गोष्टींचा ताळमेळ त्यांनी बसवला. प्रवीण गुळवे त्यांचा पहिला विद्यार्थी. पांडवलेणीवर जाऊन अनिल रियाज करत.
चिन्मय मिशन हॉलमध्ये त्यांनी प्रथमच हिमांशू नंदा यांची कार्यशाळा घेतली. श्री श्री रविशंकर यांचा ‘वेणूनाद’ हा कार्यक्रम २०१५ साली झाला. या कार्यक्रमात पाच हजार, ३७८ जणांचा समूह बासरीवादनाचा विश्वविक्रम झाला. विशेष म्हणजे, चीनच्या तीन हजार जणांनी बासरी वादन केल्याचा विक्रम मोडीत निघाला. या कार्यक्रमात अनिल यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. चिन्मय मिशनमध्ये त्यांनी मुलांना बासरीवादनाचे धडे देण्यास सुरूवात केली. शनिवारी आणि रविवारी ते दिवसभर बासरीवादनाचे क्लास घेतात. पत्नी आणि आईचेही त्यांना सहकार्य लाभते. मुलगा समृद्ध हादेखील बासरी वाजवतो.
कोविडनंतर त्यांनी ऑनलाईन क्लासेस घेण्यास सुरूवात केली. त्यांनी बासरी कुरिअर केल्या. सध्या त्यांच्याकडे ब्राझील, जपान, कझाकिस्तान, स्पेन, हंगेरी या देशांतील अनेकजण बासरी वादनाचे धडे घेतात. कझाकिस्तानमध्ये अल्माटी याठिकाणी अनिल यांनी हॉल भाड्याने घेतला. तिथे १८ जणांना अनिल हे ऑनलाईन पद्धतीने धडे देतात. सध्या नाशिकमध्ये ‘बासरी प्रशिक्षण वर्ग’ या नावाने अनिल यांनी क्लासेस घेण्यास सुरूवात केली. सध्या त्यांच्याकडे १७० विद्यार्थी बासरीवादनाचे धडे घेत आहेत. खेड्यापाड्यातून, शेतकरी, गरीब मुलांकडून ते कोणतेही शुल्क आकारत नाही.
“बासरी हे कृष्णाचे आद्य वाद्य. जगाच्या कानाकोपर्यात ते पोहोचवले पाहिजे. गुरू-शिष्य परंपरेनुसार पुढे जाणारी ही विद्या असून ती लुप्त होता कामा नये. अधिकाधिक लोकांपर्यंत बासरी पोहोचवायची,” असे अनिल सांगतात. बासरीच्या सुरेल स्वरांना केवळ नाशिकच नव्हे, तर देश-विदेशात पोहोचविणार्या अनिल कुटे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा...