थायलंडमध्ये लेज़-मैजेस्टी कायदा आहे, त्यानुसार थायलंडचा राजा वजिरालोंगकोर्न आणि त्याच्या परिवारजनांसंदर्भात निंदा, विवादास्पद बोलणे हा गंभीर अपराध आहे. थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्यावर राजेशाहीची निंदा केली, असा आरोप आहे. गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना १५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
तर, थाकसिन हे थायलंडमधले बडे उद्योगपती. दोन वेळा ते थायलंडचे पंतप्रधान होते. मात्र, २००८ साली भ्रष्टाचाराच्या मुद्द्दावर त्यांचे पंतप्रधानपद संपुष्टात आले, ते सत्तेतून बाहेर फेकले गेले. थाकसिन यांनी देश सोडला, लंडन, दुबई येथे राहू लागले. २०२३ साली ते पुन्हा थायलंडला आले, तेव्हा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांसाठी त्यांना ८ वर्षांंंची शिक्षा सुनावली गेली. थायलंडच्या राजाने राजा वजीरालोंगकोर्न याने त्यांना शाही माफी दिली. ८ वर्षांच्या शिक्षेेऐवजी १ वर्षाची शिक्षा झाली. मात्र, एक-दोन महिन्यांंतच वृद्धत्व आणि आजाराचे कारण दाखवत थाकसिन तुरूंगाच्या बाहेर आले. आता थायलंडच्या अॅटर्नी जनरलच्या म्हणण्यानुसार, ९ वर्षांपूर्वी जपानच्या एका पत्रकाराला मुलाखत देताना थाकसिन यांनी राजेशाहीची निंदा केली होती. त्यामुळे त्यांच्यावर खटला भरू शकतो. अर्थात, थाकसिन हा आरोप फेटाळत आहेत.
थायलंडमध्ये राजा किंवा त्याच्या परिवारातल्या सदस्यांची निंदा, किंवा त्यांच्या विरोधात मत प्रदर्शित करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी थायलंडमध्ये कायदा आहे. त्याला ११२ कायदा म्हणतात. तसेच लेज मॅजेस्टी कायदा असेही म्हणतात. २०२० साली या कायद्याविरोधात ’थाई’ जनता रस्त्यावर उतरली होती. पण, थायलंड प्रशासन आणि त्याच्याआड राजसत्तेने हे आंदोलन मोडून काढले. २००० लोकांवर राजनिंदेचा गुन्हा दाखल केला. लेज मॅजेस्टी कायद्यानुसार राजनिंदा करणार्याला १५ वर्षाची शिक्षा असली, तरीसुद्धा शिक्षा सुनावण्यातही मनमानी केलेली दिसून येते. २८ वर्षे, ४३ वर्षे ते अगदी ५० वर्षापर्यंतही शिक्षा सुनावल्या आहेत. २०२३ साली राजेशाहीची निंदा करणार्या, टिव्टला रिटवीट केले म्हणून थायलंडच्या खासदार रुक्चानोक श्रीनोर्क यांना सहा वर्षाची शिक्षा फर्मावली गेली. बरीच रदबदली केल्यावर १४ हजार पाऊंडवर त्यांची सुटका झाली.
थोडक्यात राजाची निंदा करणे, हा थायलंडमध्ये सगळ्यात मोठा गुन्हा आहे. इतका की, ’मुव फॉरवर्ड पार्टी’ या थायलंडच्या राजकीय पक्षाला, निवडणुकीत बहुमत मिळाले. मात्र या पक्षाला सत्ता मिळाली नाही. कारण या पक्षाने जाहीर केले होते की सत्तेत येताच, राजनिंदाविषयक कायदा बदलणार. अर्थात जनतेने बहुमत देऊनसुद्धा हा पक्ष सत्तेत बसला नाही, कारण थायलंडच्या राजाचा हस्तक्षेप. आपण उत्तर कोरियाच्या किंम जोंग उन, चीनच्या, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या ’विक्षिप्त’पणाचे किस्से वाचले आहेत. मात्र थायलंडचा राजा वजीरालोंगकोर्नच्या कथा या सगळ्यांना पुरून उरतील. हा राजा अतिशय विलासी आहेच,आणि त्याहूनही विक्षिप्तही आहे. याने कुत्र्याला देशाचा सेनापती बनवले. कारण तो कुत्रा त्याचा आवडता होता. त्याने चार विवाह केले. काही वर्षापूर्वी त्याने सिनीनात या महिलेला, ’राजकीय सहयोगी’ म्हणून अधिकार दिले. ’राजकीय सहयोगी’, म्हणजे केवळ पत्नीचा दर्जा दिला नाही इतकेच. तर ही सिनीनात पायलट होती, मग पॅराशूट सैनिक झाली, नंतर राजाशी भेट झाल्यावर रॉयल गार्डमध्ये राजाची विशेष बॉडीगार्ड झाली. राजाने तिला चारचार वेळा पदक देऊन सन्मानित केले. नंतर तिला ’राजकीय सहयोगी’ म्हणून राजेशाहीचे सदस्यही केले.
मात्र, काही महिन्यांनी राजाने तिचा दर्जा काढून घेतला. सगळी सन्मानाची पदे काढून घेतली का? तर ती राजघराण्यातल्या राणीसारखी वागण्याचा प्रयत्न करत होती म्हणून. बरंं राजघराण्यातल्या राणी यांचे जगणे तरी राजाच्या विचित्र स्वभावापासून सुटले आहे का? तर राजाच्या चार पत्नीपैकी, दोन पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. दुसर्या पत्नीपासून झालेल्या चार मुलांनाही, राजाने नाकारले आहे, तर तिसरी पत्नी सुवादीच्या सगळ्या पदव्या काढून घेतल्या असून, ती कुठे आहे कुणालाही माहिती नाही. मात्र, तिचे सगळे कुटुंब तुरूंगात आहे. सध्या राजा चौथ्या पत्नीसोबत आहे. मात्र ’थाई’ जनतेला संशय आहे की, पत्नी व्यतिरिक्त आणखी २० महिला राजासोबत आहेत. देशात काहीही होवो राजाच्या अय्याशीपणात जराही कमतरता येत नाही. मात्र, थायलंडमध्ये हे बोलणेसुद्धा पाप आहे. जगभरात कुठे ईशनिंदा तर कुठे राजनिंदा केल्यावर शिक्षा आहे. आपला देश बरा, संविधानाचे राज्य आहे.