इंटरनेटच्या युगात, समाज माध्यमांद्वारे आपल्या बाजूने जनमत वळवून, युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच एक प्रयोग सध्या पॅलेस्टाईन समर्थकांकडून केला जात आहे. हे करण्यासाठी जगभरातून, ’टूलकिट गँग’ सक्रिय झाली आहे. हमाससारख्या राक्षसाची वकिली करण्यासाठी सक्रिय झालेल्या, टूलकिट गँगचा कार्यपद्धतीचा घेतलेला हा आढावा...
मानवी सभ्यतेच्या इतिहासात, आजतागयत अनेक युद्ध लढली गेली. यामध्ये छोट्या-मोठ्या लढायांची संख्या तर आपण सांगूच शकत नाही. त्यासोबतच मानवी सभ्यतेच्या इतिहासात पहिले युद्ध कधी झाले होते, हे सांगणे जवळपास अशक्य आहे. पण, एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे, मानवी सभ्यतेच्या इतिहासातील पहिले युद्ध हे जमिनीवर लढले गेले असेल. त्यानंतर युद्धाचे स्वरूप बदलले, आणि युद्ध जमीन आणि पाण्यावर लढले जाऊ लागली. यात आणखी एक भर पडली ती, आकाशाची. विमानांचा, लांबवर जाणार्या क्षेपणास्त्रांचा शोध लागल्यानंतर, युद्ध जमीन, पाणी यांच्याबरोबरच हवेतसुद्धा लढली जाऊ लागली. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध आणि त्यानंतर झालेल्या बहुतांश लढायांची मैदाने ही जमीन, पाणी आणि हवा राहिलेली आहेत. पण, इंटरनेटच्या युगात यात आणखी एक क्षेत्र उदयास आले आहे, ते म्हणजे समाज माध्यम. इंटरनेटचा वापर करत, समाज माध्यमांद्वारे प्रचार करून, जनमत आपल्या बाजूने वळविणे हा सुद्धा युद्धाचा एक नविन प्रकार आहे. या युद्धप्रकाराचा सगळ्यात जास्त उपयोग कोठे झाला असेल, तर तो इस्रायल-हमास युद्धात.
दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने, इस्रायलमध्ये घुसून हजारो निष्पाप इस्रायली नागरिकांची हत्या केली. शेकडो लोकांचे अपहरण करून, त्यांना आपल्यासोबत बंधक म्हणून नेले. यानंतर इस्रायलने हमासवर प्रतिउत्तराची कारवाई करत, गाझा पट्टीत हमासचे समूळ उच्चाटन करण्याचा चंग बांधला. युद्धाला सुरुवात झाल्यापासून, या युद्धाची धग संपूर्ण जगाला बसली. इस्रायल-हमास युद्धाचा ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असल्यामुळे, जगभरातील सामान्य नागरिक दोन गटांत विभागले गेले. दोन्ही बाजूंचे समर्थक समाज माध्यमांद्वारे प्रचार करण्यात मग्न आहेत. या युद्धाविषयीचे ’हॅशटॅग’ समाज माध्यमांवर ट्रेण्ड करण्यात आले. यामध्ये आघाडी घेतली आहे, ती पॅलेस्टाईन आणि हमास समर्थकांनी. युद्धाच्या मैदानात इस्रायल आघाडीवर असूनही, नॅरेटिव्हच्या मैदानात मात्र, इस्रायला मोठा पराभव पाहावा लागत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पुढे आलेले जगभरातील मुस्लीम, आणि त्यांच्याबरोबरीने आपली राजकीय पोळी भाजू पाहणारे डावे आणि तथाकथित उदारमतवादी.
इस्रायल-हमास युद्ध अंतिम टप्प्यात आले आहे. हमासचा नायनाट करण्यासाठी वेळ लागत असला, तरी इस्रायल पुढील काही दिवसांमध्ये रफाह शहरातून हमासचा नायनाट करून, संपूर्ण गाझा पट्टीतून हमासला इतिहासजमा करण्याच्या प्रयत्नात आहे. याच प्रयत्नात रविवार, दि. २६ मे रोजी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात, काही मुलांचा आणि महिलांचा मृत्यू झाला. युद्धात स्वतःचा बचाव करण्यासाठी लहान मुलांचा, महिलांचा मानवी कवच म्हणून वापर करणे, ही हमासची पूर्वापार चालत आलेली युद्धनीती. त्यामुळे हमासच्या दहशतावाद्यांवर हल्ला करताना, सामान्य नागरिकांचा मृत्यू होणे अटळच! पण यासाठी इस्रायलला जबाबदार धरणे किती योग्य? हासुद्धा मोठा प्रश्न आहे. सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला म्हणून, इस्रायलवर युद्धाचे नियम मोडल्याचा आरोप होत असेल, तर सामान्य नागरिकांचा ’मानवी कवच’ म्हणून वापर करण्यार्या हमासने युद्धाच्या नियमांचे पालन केले आहे का? या प्रश्नाचे उत्तर ही ’टूलकिट गँग’ द्यायला तयार नाही.
हमासने इस्रायलच्या २ हजार, ५०० पेक्षा अधिक, निष्पाप नागरिकांची हत्या केली. यामध्ये कित्येक महिलांवर बलात्कार करण्यात आले. कित्येक महिला आजही हमासच्या ताब्यात आहेत. त्यांच्यासाठी आवाज न उठवता, ही मंडळी पॅलेस्टाईनी नागरिकांच्या मानवाधिकारांच्या नावाखाली हमासला खुलेआम पाठिंबा देत आहेत. ‘ऑल आइज ऑन रफाह’ ही मोहिमही याचाच भाग आहे. युद्धाच्या मैदानात हमासचा पराभव अटळ असताना जगभरातील कलाकारांनी, खेळाडूंनी हा हॅशटॅग वापरून एआयने बनविलेला फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केला. एकाच प्रकारचा फोटो, एकच हॅशटॅग आणि एकाच वेळी सगळ्यांनी समाज माध्यमांवर शेअर करणे, हे ’टूलकिट गँग’चे मुख्य हत्यार. जेणेकरून समाज माध्यमांच्या अल्गोरिदमध्ये याला प्रसिद्धी मिळते. विशेष म्हणजे ही ’टूलकिट गँग’ प्रसिद्ध लोकांचा सहारा घेते. त्यांना पोस्ट करण्यासाठी पैसे दिले जातात, असाही आरोप आहे.
आपण जी पोस्ट करत आहोत, त्याने काय परिणाम होणार आहे, याची कल्पना या व्यक्तींना नसते. मुळात अशा प्रसिद्ध व्यक्तींचे खाते पीआर एजन्सी चालवितात. प्रसिद्धीसाठी काहीही उठाठेव करणार्या प्रसिद्ध व्यक्ती, अशा ’टूलकिट गँग’च्या शिकार होतात. यावेळीसुद्धा हेच घडले. त्यामुळेच कित्येक प्रसिद्ध व्यक्तींनी पोस्ट केल्यानंतर ती डिलीट करण्यात धन्यता मानली. पण तरीही ’टूलकिट गँग’ला जे साध्य करायचे आहे, ते त्यांनी साध्य करून घेतले. या ’टूलकिट गँग’ने भारतातही शेतकरी आंदोलन, आणि सीएए विरोधातील आंदोलनात आपला प्रताप दाखविलेला आहे. जगाच्या एखाद्या कोपर्यात आपले आरामदायी आयुष्य जगत, ही ’टूलकिट गँग’ जगभरात समाज माध्यमांद्वारे अशांतता पसरविण्याचे काम करत आहे. वेळीच या ’टूलकिट गँग’च्या सूत्रधारांना शोधले नाही, तर जागतिक शांततेला मोठा अडथळा निर्माण होईल.