‘हिंदुफोबिक’ कॅलिफोर्निया

28 May 2024 22:34:28
Hinduphobia in California
 
अमेरिकेतील हिंदू मंदिरांमध्ये तोडफोडीच्या, तसेच हिंदुंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. यामुळे हिंदू अमेरिकी नागरिकांमध्ये, काळजीचे वातावरण असणे साहजिकच आहे. अशातच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील नागरी हक्क विभागाने, एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. दि. २० मे रोजी प्रसिद्ध झालेल्या या ५६० पानांच्या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीने, अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. कारण धार्मिकदृष्ट्या हिंदुंविरोधी द्वेषाचे गुन्हे कॅलिफोर्नियातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक नोंदविलेले प्रकरण ठरले असल्याचे, यातून स्पष्ट झाले आहे.

अहवालानुसार, कॅलिफोर्नियात ’हिंदुफोबिया’ आणि हिंदुंविरोधी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ज्यूविरोधी घटनांनंतर, हिंदुंविरोधी घटना आता दुसर्‍या स्थानावर आल्या असून, इस्लामोफोबियाने प्रेरित झालेल्या घटनांना मागे टाकले आहे. अहवाल पाहिल्यास असे दिसून येते की, १ हजार, २० द्वेषपूर्ण घटनांपैकी ५८० घटनांची पुष्टी झाली आहे. मे २०२३ मध्ये, कॅलिफोर्नियात असे गुन्हे थांबविण्यासाठी ‘कॅलिफोर्निया विरुद्ध द्वेष’ (उअ र्ीीं करींश) ही मोहीम सुरू करण्यात आली होती. बरोबर एका वर्षानंतर ‘नागरी हक्क विभागा’ने यासंबंधित आपला अहवाल प्रसिद्ध केला. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या एका वर्षात धर्माच्या आधारावर भेदभावाच्या एकूण १ हजार, २० घटनांची नोंद झाली आहे. यांतील एकूण २३.३ टक्के घटना हिंदुंच्या विरोधात होत्या. ३७ टक्के घटना ज्यूंच्या विरोधात होत्या, तर १४.६ टक्के घटना मुस्लिमांच्या विरोधात नोंदविण्यात आल्या होत्या.

 नोंदविलेल्या सर्वात सामान्य कारणांमध्ये भेदभावपूर्ण वर्तन, छळ, आणि गैरवर्तन यांचा समावेश आहे, जे क्रमशः १८.४ टक्के, १६.७ टक्के आणि १६.७ टक्के आहे. या घटना मुख्यतः निवासी भागांत, कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहेत. भारतीय आणि अमेरिकन लोकांविरुद्ध, विशेषतः हिंदुंच्या विरोधात द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये, अचानक वाढ झाल्यामुळे समाजात प्रचंड भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. समाजातील अनेक सदस्यांनी, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या जॉर्जिया विधानसभेने, ‘हिंदुफोबिया’ या संकल्पनेचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. अशी कायदेशीर कारवाई करणारे हे अमेरिकेचे पहिले राज्य ठरले आहे. ’हिंदुफोबिया’ आणि हिंदुंविरोधी धर्मांधतेचा निषेध करत ठरावात असे म्हटले आहे की, ‘हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आणि जुना धर्म आहे’ आणि जगातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये १.२ अब्ज लोक या धर्माचे पालन करतात. यात विविध परंपरा आणि मान्यता, परस्पर आदर आणि शांतता या मूल्यांचा समावेश आहे. एफबीआयच्या एका अहवालात असेही म्हटले होते की, २०२२ सालापासून हिंदुंविरुद्धच्या हिंसक घटनांमध्ये वाढ नोंदविली गेली आहे.
 
एका ब्रिटिश संस्थेने आपल्या एका अभ्यास अहवालात दिलेल्या माहितीनुसार, शाळांमधील गोरी मुले हिंदू समाजातील मुलांना धमकवितात आणि त्यांच्या धर्माबद्दल चुकीची टिप्पणी करतात. हे खूप संतापजनक आहे. या अहवालात काही घटनांची उदाहरणे देऊन हिंदुंप्रती द्वेषाची समस्या लक्ष्यकेंद्रित करण्यात आली आहे, जसे की हिंदू मुलांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगून त्रास देणे किंवा त्यांच्यावर मांसाहार फेकणे. अहवाल तयार करताना काही पालकांसोबत चर्चा करण्यात आली होती. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५१ टक्के पालकांनी सांगितले की, “त्यांच्या मुलांना शाळेत हिंदुंविरोधी द्वेषाचा अनुभव आला आहे.” गेल्या पाच वर्षांत अशा घटनांची नोंद होण्याचे प्रमाण नगण्य आहे, ही चिंतेची बाब आहे. वास्तविक एक टक्क्यापेक्षा कमी प्रकरणांमध्ये, मुलाने किंवा पालकांनी गुंडगिरीबद्दल माहिती दिली किंवा तक्रार नोंदविली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १९ टक्के पालकांचा असा विश्वास आहे की, शाळा हिंदुंविरोधी द्वेष ओळखू शकतात. अशा घटनांकडे शाळा लक्ष देतात, असे केवळ १५ टक्के लोकांचे मत होते. एकूणच हिंदुंविरोधात द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, हिंदुंच्या आस्थेवर अमेरिकेत घाला घातला जात आहे का? असा प्रश्न उद्भवत आहे. अहवाल पाहता हिंदुंच्या सुरक्षेची हमी अमेरिका निश्चितच देईल, अशी आशा आहे.


Powered By Sangraha 9.0