मतदानाचा कौल पाहता पुन्हा २०१९ची पुनरावृत्ती!

27 May 2024 21:04:42
loksabha election result exit poll


आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत विविध कारणांमुळे जम्मू-काश्मीर राज्यात मतदानाचे प्रमाण कमी राहिले होते. पण, यावेळी मतदानाच्या सहाव्या टप्प्यात त्या राज्यातही चांगले मतदान झाल्याचे दिसून आले. मतदानाची ही टक्केवारी पाहता, मतदार पुन्हा २०१९च्या निकालाची पुनरावृत्ती करणार असल्याची दाट चिन्हे दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकांचे सहा टप्पे पार पडले आहेत. आता सातव्या टप्प्यासाठी येत्या १ जून रोजी मतदान होणार आहे. या सहा टप्प्यांतील मतदान पाहता, राष्ट्रीय पातळीवर साधारणपणे ६५ टक्के मतदान झाले. ही टक्केवारी वाढण्याचीही शक्यता आहे. ही टक्केवारी पाहता, देश पातळीवर या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून येते. खरे म्हणजे, देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत शत प्रतिशत मतदान व्हायला हवे. पण, सर्वच मतदारांमध्ये तेवढी जागरूकता नसल्याने मतदानाची ती टक्केवारी गाठली जाणे नजीकच्या भविष्यकाळात तरी शक्य दिसत नाही. असे असले तरी काही संसदीय मतदारसंघांत ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले, तर काही मतदारसंघात जवळजवळ ९० टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत विविध कारणांमुळे जम्मू-काश्मीर राज्यात मतदानाचे प्रमाण कमी राहिले होते. पण, यावेळी मतदानाच्या सहाव्या टप्प्यात त्या राज्यातही चांगले मतदान झाल्याचे दिसून आले. मतदानाची ही टक्केवारी पाहता, मतदार पुन्हा २०१९च्या निकालाची पुनरावृत्ती करणार असल्याची दाट चिन्हे दिसत आहेत.

या निवडणुकीच्या दरम्यान विरोधकांकडून नेहमीचे मुद्दे उपस्थित केले गेले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबद्दल नेहमीच्या शंका-कुशंका उपस्थित करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करूनही विरोधक न्यायालयाचा निर्णयही मान्य करण्यास तयार नसल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे विरोधकांनी निवडणूक आयोगावरही शंका घेणे सुरु ठेवले. निवडणूक आयोगाकडून मतदानाची जी प्राथमिक आकडेवारी देण्यात आली आणि नंतर अंतिम आकडेवारी देण्यात आली, त्यावरून आयोगास लक्ष्य करण्यास विरोधकांनी मागे-पुढे पाहिले नाही. पण, निवडणूक आयोगाने देशभरातील आतापर्यंतच्या सर्व मतदानाची तपशीलवार आकडेवारी जाहीर करून विरोधकांची तोंडे बंद केली. सर्व स्वायत्त संस्थांवर सरकारचे नियंत्रण असल्याने त्या सरकारच्या तालानुसार वागत असल्याचे आरोप तर विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. पण, निवडणूक आयोगाने मतदानाचे सहा टप्पे अत्यंत सफलपणे आणि निष्पक्षपणे पार पडून आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडली आहे.
 
या निवडणुकीत पुन्हा २०१९ची पुनरावृत्ती होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीस प. बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात चांगले यश मिळणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये जे संभाव्य नुकसान होण्याची शक्यता आहे, ते नुकसान पूर्व आणि ईशान्य भारतातील मतदारसंघातून भरून काढले जाईल, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. सहा टप्प्यांतील मतदान पाहता, भाजप विरोधकांना भाजपचा झंझावाती प्रचार मोडून काढण्यास यश आले नाही. हे सर्व पाहता भाजप-राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा मतदान टक्का निश्चित वाढण्याचे शक्यता आहे. भाजपने या निवडणुकीपूर्वी ‘अब की बार चारसौ पार’ अशी घोषणा केली होती. भाजपच्या या प्रचारास तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण करण्यात विरोधकांना अपयश आले. त्यांचा प्रचार, आपण काय करणार आहोत, हे सांगण्याऐवजी भाजपच्या घोषणेभोवती फिरत राहिला. स्वत:च्या आघाडीस भाजपविरुद्ध सिद्ध करण्याऐवजी ‘अब की बार भाजप तडीपार’ अशा घोषणा देऊन भाजपला हरविणार असल्याचा आनंद विरोधक मानत राहिले. पण, भाजपला पराभूत करण्याएवढी यंत्रणा उभी करण्यात विरोधकांना अपयश आल्याचे दिसून आले.

आता मतदानाचा अखेरचा टप्पा येत्या १ जून रोजी पार पडल्यानंतर, त्याच दिवशी विविध माध्यमांकडून ‘एक्झिट पोल’ देण्यास प्रारंभ होईल. त्यावरून कोणाची सरशी होईल याचा अंदाज मतदारांना येईलच. पण, त्यानंतर लगेचच ४ जून रोजी मतमोजणी सुरु होईल आणि त्या दिवसभरात भाजप-राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पदरात मतदारांनी किती दान टाकले ते स्पष्ट होईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४००चा आकडा पार करील का, हे त्याच दिवशी स्पष्ट होईल. तोपर्यंत ४ जूनची प्रतीक्षा करुया!

तामिळनाडू : विरोध डावलून तिरुवल्लुवर यांची जयंती

तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी सत्तारूढ द्रमुक आणि त्यांच्या मित्रपक्षांचा विरोध डावलून राज भवनामध्ये संत तिरुवल्लुवर यांची जयंती ‘वैशाखी अनुशाम नक्षत्रा’च्या मुहूर्तावर मोठ्या थाटात साजरी केली. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी १९७१ मध्ये सत्तेवर आल्यानंतर संत तिरुवल्लुवर यांची जयंती तमिळ महिना ‘थाई’च्या दुसर्‍या दिवशी साजरी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. हा दिवस ‘तिरुवल्लुवर दिन’म्हणून साजरा करण्यात येईल, असेही करुणानिधी यांनी घोषित केले होते. मात्र, राज्यपालांनी संत तिरुवल्लुवर यांच्या जन्माची नक्षत्रानुसार तिथी पाहून त्या दिवशी त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि तो राजभवनावर अमलातही आणला. आपण याच तिथीला ही जयंती का साजरी करीत आहोत, याचे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले. तामिळ विद्वान, लेखक, इतिहासकार यांच्या मते तिरुवल्लुवर यांची जयंती ‘वैशाखी अनुशाम’ या तिथीस साजरी केली जात आली आहे. पण, करुणानिधी सरकारने त्यात बदल केला. मात्र, राज्यपालांनी तिथीनुसार ही जयंती साजरी करण्याचे ठरविले. राजभवनावर आयोजित करण्यात आलेल्या या जयंती समारंभास विविध शासकीय उच्चपदस्थ उपस्थित होते. पण, मुख्यमंत्री स्टॅलिन किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हता.

‘इंटरनॅशनल खान मार्केट गँग’

देशांतर्गत ज्याप्रमाणे ‘खान मार्केट गँग’ सक्रीय आहे, त्याचप्रमाणे भारतविरोधी प्रचार करण्यासाठी विदेशातही ‘इंटरनॅशनल खान मार्केट गँग’ कार्यरत असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीमध्ये केले. भारतविरोधी प्रचार करण्यामध्ये ही ‘इकोसिस्टीम’ कार्यरत असल्याचे ते म्हणाले. या मुलाखतीमध्ये त्यांना विरोधकांकडून ‘दक्षिण में साफ, और उत्तर में हाफ’ असा जो दावा केला जात आहे, त्याबद्दल विचारले असता एस. जयशंकर म्हणाले की, भाजप दक्षिण भारतात दुप्पट जागा मिळवेल आणि उत्तर भारतात तर विरोधकांची आणखी वाईट अवस्था होईल, असे ते म्हणाले. सध्याच्या पेक्षा अधिक जागा मिळवून भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच केंद्रातील भाजप सरकार घटनाविरोधी असल्याचा जो आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे, तो जयशंकर यांनी पूर्णपणे फेटाळून लावला. काँग्रेस पक्षाचे शासन असताना राज्यघटनेमध्ये ८० दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यघटनेने श्रद्धांवर आधारित आरक्षण दिलेले नाही. पण, विरोधक अशा आरक्षणाचा पाठपुरावा करीत आहेत आणि वर पुन्हा आम्हास घटनेचा आदर आहे, असे म्हणत आहेत, हे जयशंकर यांनी निदर्शनास आणून दिले.

९८६९०२०७३२
Powered By Sangraha 9.0