देश हमे देता हैं सब कुछ...

27 May 2024 21:44:49
article on hindukush bhardwaj


संगीत, चित्रकला आणि साहित्य या सर्व कलांच्या माध्यमातून राष्ट्रधर्म, संस्कृतीचे वैभव मांडण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे मुंबईचे हिंदुकूश भारद्वाज. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

१९८३ साली तळजाई येथे रा. स्व. संघाचे शिबीर होते. सात तरूण त्या शिबिरासाठी डोंबिवली ते तळजाई पायी गेले. शिबिरासाठी पायी येणार्‍या त्या सात तरुणांचे स्वागत तळजाईला गो. नी. दांडेकरांनी केले होते. त्या सात तरुणांपैकी एक तरुण म्हणजे हिंदुकूश विश्वनाथ भारद्वाज. हिंदुकूश यांनी संपूर्ण वंदे मातरम् राष्ट्रीय गीत सुरेलपणे संगीतबद्ध केले. नंतर प्रशस्त अत्याधुनिक स्टुडिओमध्ये साधना सरगम, बेला शेंडे यांसारख्या नामवंत गायिकांकडून ते गाऊन घेतले. स्टुडिओ ते गायिकांचे मानधन सगळ्याच गोष्टी खर्चिक. पण, त्यांनी पदरमोड करून हे सर्व खर्च आनंदाने पूर्ण केले. त्यानंतर या गायिकांनी गायलेले ‘वंदे मातरम्’ त्यांनी प्रसिद्ध वाहिन्यांना निशुल्क दिले. अट एकच ठेवली की, हे ‘वंदे मातरम्’ त्यांनी त्यांच्या वाहिन्यांवर प्रदर्शित करावे. का? तर ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची कडवी पाच आहेत. मात्र, समाजापुढे सातत्याने त्यातील दोनच कडवी येत राहिली. स्वातंत्र्याचे हे स्फूर्तिगीत स्वातंत्र्यानंतरच्या पिढीसमोर पूर्ण स्वरुपात यावे म्हणून!

हिंदुकूश हे ‘क्लास वन मरिन इंजिनियर ऑफिसर’ आहेत. त्यांनी जगातील सर्वच खंडांना आणि जवळजवळ ५३ देशांना भेटी दिल्या. जगभर फिरल्याने जागतिक संस्कृती त्यांना अनुभवता आली. या पार्श्वभूमीवर त्यांना विश्वाचे मंगल इच्छिणार्‍या भारतीय धर्मसंस्कृतीचे श्रेष्ठत्व सातत्याने जाणवले. वर्षाचे आठ महिने जहाजावर असताना जहाजामध्येही जगभरातील लोकांशी संपर्क होत असतो. या सगळ्या प्रवासात भारताचा वैभवशाली इतिहास आणि संस्कृती, भयंकर प्रतिकूल परिस्थितीमध्येही धर्म जपत काळाच्या छाताडावर पाय रोवून उभा राहिलेला भारतीय हिंदू, ही हिंदुकूश यांच्यासाठी अभिमानाची बाब. हे सगळे संपूर्ण जाणून घेऊन ते समाजासमोर व्यापक स्वरुपात यायलाच हवे, असे हिंदुकूश यांना वाटत असे. त्यांनी १९९० साली ‘संस्कारधारा : वेदमंत्रों से वंदे मातरम्’ ही ऑडिओ कॅसेट तयार केली. वेदमंत्र, त्यांचे अर्थ, त्यांचे कालातीत महत्त्व ते ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या मागील इतिहास, संघर्ष, यश आणि देशाचे उज्ज्वल भवितव्य हे सगळे यामध्ये होते.

९०च्या दशकात मर्चंट नेव्हीमध्ये इंजिनिअर असलेल्या तरुणाने ‘वेदमंत्र ते वंदे मातरम्’ समाजासमोर मांडावे, हे सोपे नव्हते. या कॅसेटला जगामध्ये उत्तम प्रतिसाद लाभला. त्यांना वेदमंत्रांबद्दल अभ्यास करावासा का वाटला, तर हिंदुकूश हे स्वामी समर्थांचे भक्त. मठामध्ये त्यांची भेट स्वामी भक्त गुरूदेव खंडोज आप्पाजी मोरे म्हणेजेच मोरे गुरूजींशी झाली. मोरे गुरूजी हिंदुकूश यांच्याशी चर्चा करताना वेद, सूक्त यांवर माहितीपूर्ण भाष्य करत. त्यामुळेच हिंदुकूश यांना वेदांबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्याचे दृश्य स्वरुप म्हणजे ‘संस्कारधारा : वेदमंत्रों से वंदे मातरम्.’ उत्तम संगीतकार असलेले हिंदुकूश यांनी काही तथाकथित संगीत शिक्षण घेतलेले नाही.

मात्र, हृदयनाथ मंगेशकर यांचा भावसरगम कार्यक्रम ऐकून आणि देव-देश-धर्माबाबतची असलेली उपजत तळमळ यातून संगीताशी त्यांचे नाते जुळले. पुढे ‘टीसीरीज’ने त्यांचा ‘नित्य प्रार्थना’ नावाचा अल्बम प्रकाशित केला. त्याला ५० लाख लाईक्स आहेत. ते अतिशय चांगले चित्रकारही आहेत. सातवेळा त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही आयोजित झाली. ते साहित्यिकही आहेत. अनेक मालिकांसाठी त्यांनी सहलेखक म्हणून काम केले आहे. तसेच, त्यांचा एक हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट म्हणजे १०० वर्षार्ंपूर्वीच्या एका राष्ट्रभक्त, देशनिष्ठ व्यक्तिमत्त्वाचा चरित्रपटच आहे. हा लिहिण्यासाठी हिंदुकूश यांनी गेले तीन वर्षे मर्चंट नेव्हीच्या कामातून रजा घेतली आहे. गेेली तीन वर्षे ते या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करत आहेत.

कलासक्त तितकेच देशभक्त संस्कृतनिष्ठ असलेल्या हिंदुकूश यांच्या जीवनाचा मागोवा घेतला. विश्वनाथ आणि भारती भारद्वाज हे मूळचे रत्नागिरी देवरुखच्या हातीव गावचे दाम्पत्य. त्यांचे सुपुत्र हिंदुकूश. कामानिमित्त भारद्वाज कुटुंब डोंबिवली येथे राहू लागले. विश्वनाथ हे ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’ येथे ‘टाईम कीपर’ म्हणून काम करत. ते रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आणि भारती या अत्यंत संस्कारशील गृहिणी. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला, सगळ्यांना सोबत घेतले, तरच प्रगती होते, हे संस्कार ते मुलांना देत. घरची गरिबीच, पण भारद्वाजांच्या घरात संस्कारांची श्रीमंती होती. तेव्हा त्यांच्या घरी प्रचारक येत असत. रा. स्व. संघाचे प्रचारक डॉ. शरद कुलकर्णी येत असत. त्यांचे वागणे-बोलणे पाहून त्यावेळी बाल हिंदुकूश यांना वाटे, हा इतका मोठा माणूस किती नम्र आहे, किती शांत आहे. संघविचारांमध्ये हिंदुकूश यांचे बालपण व्यतीत झाले.
 
असो. अभ्यासात हिंदुकूश हुशारच होते. मात्र, साहित्य, संगीत, चित्रकलेची आवड उत्पन्न झाली, ती त्यांच्या शाळेतील शिक्षक आर. बी. कुलकर्णी यांच्यामुळे. धडा शिकविताना ते कवी, लेखकांच्या इतर साहित्यकृतींचे रसग्रहण सहज करत, अनेक दाखले देत. त्यामुळे हिंदुकूश यांना साहित्याची, संगीताची आवड निर्माण झाली. लहानपणी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे, शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानेही ऐकली. या सगळ्यांंमुळे धर्मसंस्कृतीवरील त्यांचे प्रेम अक्षय आणि दृढ होत गेले. पुढे मरीन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन ते नोकरीला लागले. याकाळात त्यांनी ‘मरीन’ संदर्भातील नोकरीबाबत अनेकांना मार्गदर्शन, सहकार्य केले. उच्चशिक्षण घेण्यासाठी मदत केली. जगभरात जिथे गेले, तिथे भारतीय संस्कृतीचे सत्य, श्रेष्ठत्व त्यांनी मांडले. ते म्हणतात, ‘देश हमे देता हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें।’ तर असे हे हिंदुकूश भारद्वाज यांचे विचारकार्य हे समाजाचे वैभव आहे.

९५९४९६९६३८


Powered By Sangraha 9.0