१९८३ साली स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त बाबांनी ‘अनादि मी, अनंत मी’ या स्वा. सावरकर जीवनदर्शन महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही केली. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा, साहित्याचा, विचारांचा, दूरदर्शीपणाचा बारीक अभ्यास करून गुंफलेली, संस्कृतप्रचुर मराठीतील निवेदनात्मक संहिता, त्याला जोड देऊन वेगवान बनविणार्या संगीत रचना, सावरकरांच्या आयुष्यातील लक्षणीय प्रसंगांना जीवंत करणारे नाट्यप्रवेश, तडफदार पोवाडे, सावरकर स्वरचित गझल, कवने, कविता, भाषणे यांचा एकत्रित मिलाफ म्हणजेच ‘अनादि मी, अनंत मी’!
ज्येष्ठ रंगकर्मी माधव खाडिलकर आणि मराठी रसिकांना सुपरिचित अशा सुप्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर हे माझे आई-वडील. अर्थातच संगीत आणि नाटक हे पैलू, आम्हा भावा-बहिणींना बाळकडू म्हणून लाभले. बाबांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली (National School of Drama) येथून आणि त्यानंतर पूर्व जर्मनीमधील ‘वायमार’ या नाट्यपंढरीतून नाट्य प्रशिक्षण घेतले. त्यानंतर काही वर्षं व्यावसायिक मराठी रंगभूमीवर कलाकार म्हणून काम केलेच. परंतु, १९७७ साली ‘सागरा प्राण तळमळला’सारख्या नाटकामधून स्वा. सावरकरांची प्रमुख भूमिका साकारण्याचे भाग्य त्यांना लाभले. १९८३ साली स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त बाबांनी ‘अनादि मी, अनंत मी’ या स्वा. सावरकर जीवनदर्शन महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही केली. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा, साहित्याचा, विचारांचा, दूरदर्शीपणाचा बारीक अभ्यास करून गुंफलेली, संस्कृतप्रचुर मराठीतील निवेदनात्मक संहिता, त्याला जोड देऊन वेगवान बनविणार्या संगीत रचना, सावरकरांच्या आयुष्यातील लक्षणीय प्रसंगांना जीवंत करणारे नाट्यप्रवेश, तडफदार पोवाडे, सावरकर स्वरचित गझल, कवने, कविता, भाषणे यांचा एकत्रित मिलाफ म्हणजेच ‘अनादि मी, अनंत मी’!
ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, लेखक के. विद्याधर अर्थात अण्णा गोखले यांनी नाटकाच्या संहितेला समर्पक असे विनायकस्तुती पसायदान शब्दांकित केले, तर नाटकाच्या पुस्तकाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्तुतिसुमनात्मक प्रस्तावना लाभली. माझ्या मातोश्रींनी माई सावरकरांची भूमिका करून त्यांना सहकार्य दिले. रोमांचकारी निवेदनाच्या माध्यमातून फुललेल्या या धगधगत्या नाट्यकलाकृतीच्या प्रत्येक टप्प्याचे, जीवंत साक्षीदार होण्याचे भाग्य मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला वेदश्रीला लाभले. १९८३ सालच्या गणेशोत्सवात मुंबईतील विलेपार्ले उपनगरात शाळा महाविद्यालयामधील तरुण मुलं-मुली एकत्रित करून, तीन-साडेतीन महिन्यांच्या अथक, अविरत प्रयत्नांचा नाटकीय आविष्कार, लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात जवळजवळ एक-दीड हजार लोकांच्या साक्षीने सादर झाला, तर दि. २६ फेब्रुवारी, १९८४ रोजी पहिला व्यावसायिक प्रयोग शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत सादर झाला. १९८५ साली नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन, खुद्द लंडनमध्ये ‘इंडिया हाऊस’च्या ऐतिहासिक वास्तूमध्ये अनिवासी भारतीयांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्र शासनाचा विशेष लक्षणीय लेखन आणि ‘नाट्यदर्पण प्रतिष्ठाना’चा संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कारही या नाटकाला मिळाला. नाटकाचे व्यावसायिक स्वरूपात जवळजवळ १५० प्रयोग १९८५-१९९० कालावधीत झाले.
मुंबईच्या दादरमधील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन, भारताच्या तत्कालीन उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, दि. २९ मे, १९८९ रोजी याच नाटकाच्या (पान ३ वरून) प्रयोगाने झाले. अशा वैभवशाली क्षणांचे भागीदार झालेल्या आईबाबांनी याचे प्रयोग, नाट्याभिवाचन स्वरुपामध्ये इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडामध्येेही सादर केले. त्याच सुमारास मी आणि माझी बहीण शाळा-कॉलेजमध्ये वरिष्ठ वर्गात गेलो आणि नेहमीचे शैक्षणिक जीवन सुरू झाले. शिक्षणानंतर नंतर आम्ही नोकरी-व्यवसायात मग्न झालो. पण, सावरकर या अकल्पित प्रतिभेच्या व्यक्तिमत्वाचे ठसे आमच्या मनामध्ये कायमचे घर करून राहिले हे मात्र खरं. एप्रिल २०१५ मध्ये, अचानक एके दिवशी नाटकाचे पुस्तक माझ्या हाताशी अनावधानाने आले. मोठ्या उत्साहाने, एकट्यानेच मी त्याचे पूर्ण वाचन मोठ्या आवाजात केले. त्यावेळी मला ते मंतरलेले दिवस पुन्हा आठवले आणि त्याच सुमारास, २०१६ मध्ये येऊ घातलेल्या, स्वा. सावरकरांच्या ५०व्या आत्मार्पण स्मृतीवर्षानिमित्ताने ‘अनादि मी, अनंत मी’ नाटकाचे पुनर्निर्माण करण्याच्या ईर्षेने मला पुन्हा चेतना दिली. मुंबई-पुण्यातील २५-३० तरुण हौशी कलावंतांना, गायक-वादकांना आणि तंत्रज्ञांना हाताशी धरून आपल्या समोर या नाटकाची उलाढाल नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही जमेल तशी सुरू केली.
आतापर्यंत मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, सांगली, वाई, पारनेर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड अशा विविध केंद्रांवर सादर झालेल्या जवळजवळ ४० पेक्षा जास्त प्रयोगांमधून कुठलीही प्रापंचिक, आर्थिक अपेक्षा न ठेवता, केवळ जास्तीत जास्त लोकांना या अनोख्या जीवन कहाणीचा अनुभव घेता यावा आणि खर्चाची तोंडमिळवणी व्हावी, इतकीच अपेक्षा ठेवून आम्ही हे प्रयोग सादर केले. आमचा प्रत्येक प्रयोग प्रेक्षकांनी उचलून धरला. अमेरिकेत बे एरिया, कॅलिफोर्निया आणि सिएटल, वाशिंग्टन येथेही एकपात्री नाट्याविष्कार सादर झाले. २०१९ साली या महानाट्याचे ध्वनिनाट्य रूपांतरण करून, आधुनिक स्वरूपात डिजिटल माध्यमांद्वारे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प पूर्ण झाला, तर २०२१ साली ‘दूरदर्शन सह्याद्री’ वाहिनीसाठी नाटकाचे ध्वनिचित्रमुद्रण, आणि प्रक्षेपण होऊन ही नाट्यगाथा घराघरात पोहोचली. नव्या स्वरूपात हे नाटक सादर करताना, नाटकाच्या सादरीकरणात आधुनिक तंत्राचा अवलंब केला गेला. त्यामुळे नव्याने रेकॉर्ड केलेली गीते, पोवाडे आणि ध्वनिचित्रफिती नाटकाला वेगळीच उंची देऊन गेले.
स्वा. सावरकरांचे शतपैलू व्यक्तिमत्व ‘जैसे थे’ स्वरूपात सामान्य माणसापुढे यावे, आईबाबांचे उत्तम कार्य पुन्हा एकदा आताच्या पिढीला माहित होऊन श्रीमंत मराठी भाषेचे संस्कार पिढीवर व्हावेत, यासाठी या नाट्य कलाकृतीचा एक जरी शब्द आणि क्षण कामी यावा, हा आमचा संकल्प आतापर्यंतच्या या नाट्यगाथेच्या प्रदीर्घ प्रवासात सिद्धीस गेला, असे समजतो. स्वा. सावरकरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाच्या अनमोल आठवणींना पुन्हा उजाळा मिळावा आणि या महान नाट्यगाथेच्या रूपाने आपल्यातील राष्ट्राभिमानी वृत्तीला जागविण्यासाठी आमचे आणि आमच्या संपूर्ण सहकारी चमूचे अविरत प्रयत्न चालूच राहतील. हे सर्व करताना, खुद्द तात्यारावांनीच अजरामर केलेले खालील उदात्त विचार आमच्या कुटुंबाच्या मनात नेहमी घोंगावतातस आणि आमचे प्रयत्न रुजू ठेवण्यासाठी चेतना देतात. चार काटक्या एकत्र आणून घरटी बांधणे आणि मुलामुलींची वीण वाढवणे, यालाच जर संसार म्हणायचे असेल, तर असले संसार कावळे-चिमण्यासुद्धा करतातच आहेत. पण, संसाराचा याहूनही भव्यतम अर्थ घेणे असेल, तर मनुष्यासारखा संसार करण्यात आपणही कृतार्थ झालो आहोत. आपली चार चूलबोळकी आपणच फोडून टाकली, पण त्यायोगे पुढेमागे कदाचित हजारो जणांच्या घरी, सोन्याचा धूर निघेल तेव्हा
की घेतले व्रत न हे, अम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास निसर्ग न माने
जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले, करि हे सतीचे !!
हा सर्व खटाटोप करताना, स्वा. सावरकरांसारख्या अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्वाची पूजा बांधण्याची संधी आम्हाला भगवंताने दिली, त्याबद्दल जगन्नियंत्याला मनोमन वंदन. आम्हाला आतापर्यंत सर्वतोपरी मदतीचा आणि मार्गदर्शनाचा हात दिलेल्या विविध संस्था, व्यक्ती, कलाकार, तंत्रज्ञ, पडद्यामागील सर्व सहकारी, पत्रकार, आयोजक, प्रायोजक आणि आम्हाला आजपर्यंत अजोड प्रेम आणि आशीर्वाद देणारे मायबाप रसिक-प्रेक्षक या सर्वांचे आम्ही जन्मभर ऋणीच राहू.आमचा हा सावरकर विचार प्रसार-प्रचार प्रयत्न आवडल्यास, आमच्या पुढील फेसबुक पेजवर जरूर नोंदवा आणि अधिकाधिक राष्ट्राभिमानी मराठी माणसापर्यंत आमची चळवळ पोहोचवा, हेच आवाहन करतो.
फेसबुक लिंक - www.facebook.com/AMAMSavarkar Darshan
ध्वनिनाट्य युट्यूब चॅनेल लिंक : अनादि मी अनंत मी www.youtube.com/channel/UCd७LYujJXznClgrxu-aFrjA
एकपात्री नाट्याभिवाचन, मर्यादित स्वरूपातील नाट्याविष्कार किंवा संपूर्ण नाट्यप्रयोगासाठी