माझे आणि राजेश्रीचे गेल्या काही वर्षांचे स्वप्न म्हणजे ‘त्रिवेणी.’ स्वा. सावरकरांच्या घराण्यातील स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित, स्वा. सावरकरांच्या साहित्यावर बेतलेला नृत्य, नाट्य, काव्य व निवेदनात्मक प्रयोग. खरेतर किती प्रयोग करायचे, कोठे करायचे, असे काहीच ठरलेले नव्हते, पण प्रयोग होत गेले. छत्रपती संभाजीनगरामध्ये आणि इतर ठिकाणीसुद्धा...
शब्द कळायला लागल्यापासून घरातल्या रेडिओवर सतत लागणारी ‘सागरा प्राण तळमळला’ आणि ‘जयोस्तुते’ ही गाणी मनात घर करून बसली. या गाण्यांमध्ये ऐकू येणारे शब्द इतर कोठेच ऐकायला येत नसत. तेव्हा त्यांचा अर्थ कळत नव्हता, पण ते शब्द इतर कवींहून, गाण्यांहून वेगळे वाटत होते, ते आगळेवेगळे शब्द आवडतही होते. त्या गाण्यातील कारूण्य, वीरश्री, राष्ट्रप्रेम मनाला भिडत होते. त्याचे रचनाकार वि. दा. सावरकर आहेत, हेही रेडिओवर ऐकूनच कळले. सातवी-आठवीत असताना त्यांच्याच ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकातील एक उतारा मराठीच्या पुस्तकात होता. ज्या मूळ पुस्तकातून छोटासा उतारा अभ्यासक्रमात घेतला असेल, ते पुस्तक पूर्ण वाचण्याचा माझा अट्टहास असे. घराजवळच्या सार्वजनिक वाचनालयातून मूळ ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक आणून वाचले. वि. दा. सावरकर यांच्या जगण्याविषयी, त्यांच्या त्यागाविषयी, त्यांच्या राष्ट्रभक्तीविषयी जसजसे वाचत गेले, तसतसे त्यांच्या टीकाकारांचे आवाजही कानी पडू लागले. एवढे मोठे कार्य करणार्या व्यक्तीचा गौरव तर केला जात नाहीच, पण तिच्यावर टीका मात्र केली जाते, असे का?
माझ्या किशोरवयामध्ये पडलेला हा प्रश्न. उत्तर सापडत नव्हते, पण मनातली एक जागा ‘सावरकर’ या नावाने पक्की होत गेली. आतून आवाज यायचा ‘सावरकर तसे नाहीत, तुम्ही सांगता, रंगविता, तसे ते नाहीत, तर ते ‘असे’ आहेत.’ पण, ‘असे’ म्हणजे कसे? व्याख्यानामधून त्यांचे ‘असे’ असणे मांडण्याचा प्रयत्न करू लागले. श्रोत्यांच्या प्रतिक्रिया यायच्या, ‘व्याख्यान चांगले झाले’, किंवा ‘आम्हाला हे माहितच नव्हते,’ वगैरे. पण, तरीही काहीतरी सांगायचे राहून गेले, असे वाटायचे. एके दिवशी लहान बहीण राजेश्री म्हणाली, “आपण सावरकरांची लिखित गाणी, त्यांवर नृत्य आणि त्यांच्या जीवनपटावर नाट्य असा एक प्रयोग करूया का? सावरकर ज्यांना समजूनच घ्यायचे नाहीत, त्यांना एका वेगळ्या धाटणीतून विचार करायला लावूया का?” इथूनच सुरू झाला, मनात घर केलेल्या सावरकरांची प्रतिमा मंचावर आणण्याचा प्रवास! वि. दा. सावरकरांबरोबरच त्यांच्या बंधूंची राष्ट्रप्रीती, त्यांचा त्याग, त्यांच्या पत्नीला सोसाव्या लागलेल्या यातना, हे सगळे उभे करणे तितके सोपे नव्हते. मुळातच सावरकरांचे आयुष्य वादळी, ते एक यज्ञकुंडच आणि त्यांचे कुटुंबीय त्यातील समिधाच!
अवघ्या काही तासांत या सगळ्यांचे जीवितकार्य भिन्न भिन्न कलाप्रकारांतून मांडणे अवघडच! एखादा विषय जेवढ्या कमी वेळात मांडायचा असतो, तेवढी त्याची जास्त तयारी करावी लागते, हे सूत्र ध्यानी घेऊन आम्ही दोघी बहिणींनी पुन्हा एकदा सावरकरलिखित आणि त्यांच्यावर लिखित साहित्य वाचून काढले. राजेश्रीची कल्पना अशी की, येसूवहिनी, माई आणि ताई यांच्यावर आपण अधिक लक्ष केंद्रित करूया. शुभा साठे लिखित ‘त्या तिघी’ या पुस्तकाच्या वाचनानंतर तिची ही संकल्पना अधिक दृढ झाली. संहिता मीच लिहावी, हा तिचा आग्रह. दि. २८ मे २०२२ रोजी तिला ही कलाकृती मंचावर आणायची होती. माझ्या मनात शब्दांची जुळवाजुळव झालेली होती, पण लिहायला बसण्यासाठी लागणारा आंतरिक क्षण जुळून येत नव्हता. लिहिण्यासाठी मन तडफडत होते, हात शिवशिवत होते, पण योग काही जुळून येत नव्हता. असा जवळजवळ महिना गेला. एके दिवशी, दि. २ मे रोजी पहाटे ३.३० वाजता अचानक जाग आली. इतक्या पहाटे उठण्याची गरज नसतानाही मी अनाहुतपणे उठले. डोक्यात सावरकर आणि त्यांचे कुटुंबीय याशिवाय काहीच नव्हते. सकाळी ७ वाजता मनातली संहिता कागदावर उतरलेली होती. मन शांत झाले.
अवघ्या १ तास, ५५ मिनिटांमध्ये सावरकर आणि त्यांचे कुटुंबीय यांना मंचावर आणण्याचा शाब्दिक प्रयत्न तर झाला, पण पुढचे आव्हान होते, कलाकार निवडण्याचे. येसूवहिनी राजेश्रीनेच करावी, अशी माझी इच्छा होती. तिने सरावाला सुरुवात केली. ती एक गुणी अभिनेत्री आहे, याची मला कल्पना होती. त्याशिवाय दिग्दर्शनाच्या बारीकसारीक जागांसह तिने नाट्यप्रसंग उत्तम उभे केले. तिने या आधी ‘रानगंध’, ‘अनादी मी, अनंत मी’ वगैरे प्रयोगांसाठी नृत्यदिग्दर्शन केले होते. तिच्याकडे सावरकरांच्या संगीतबद्ध झालेल्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स होत्या. नृत्यांसाठी काही भरतनाट्यम्, कथ्थक नृत्य करणार्या आणि काही अगदी ‘हिपहॉप’ करणार्या मुली निवडल्या. गाण्यांमधल्या प्रत्येक शब्दाचे अर्थ उलगडणारे हावभाव तिने नृत्याविष्कारामध्ये आणण्यासाठी अथक परिश्रम केले. तरुण मुले-मुली, ज्यांना सावरकरांविषयी फारसे माहिती नव्हते, त्यांना मी माझ्या निवेदनातून उलगडून सांगितले आणि नृत्यांगनांनी प्रत्येक गाण्याच्या रसानुसार त्यांचे चेहर्यावरील हावभाव, पदन्यास यातून आविष्कृत केले. माई आणि ताईचीसुद्धा निवड झाली. सर्वात मोठा प्रश्न होता, तो विनायक दामोदर सावरकर यांची भूमिकेसाठी कलाकाराची निवड. अनेकांनी अनेक नावे सुचविली, अनेकांनी भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली. पण, चेहरेपट्टीच जुळत नव्हती.
त्यातही सावरकरांची भूमिका करणार्या कलाकाराचे शब्दोच्चार अस्खलितच असायला हवेत. यातून एका कलाकाराची निवड केली. पण, त्याला भूमिकेत शिरताच येईना. राजेश्रीतल्या दिग्दर्शिकेने त्याला अनेक पैलू पाडले. त्याला मी एके दिवशी सावरकर काय आहेत, हे काही वेळ फोनवरून समजावून सांगितले. त्याची प्रत्येक हालचाल राजेश्रीने विचारपूर्वक दिग्दर्शित केली. त्यानंतर सावरकरांच्या जगण्यातली आंदोलने त्याने मेहनतीने वठविली. प्रकाशयोजनेवर संपूर्ण प्रयोगाची परिणामकारकता अवलंबून आहे. संगीत योजना, ध्वनी इत्यादी जुळत गेले. सावरकरांच्या कुटुंबात अठराविश्व दारिद्य्र, तिथे घरात काय सामान असणार? त्यामुळे नेपथ्य फारसे वापरायचे नाही, असे राजेश्रीचे दिग्दर्शन. असा हा देवगिरी प्रांतातून छत्रपती संभाजीनगरचा जवळ-जवळ २२ कलाकारांचा संच उभा राहिला. प्रयोगाचे नाव आमची मोठी बहीण आणि आई यांच्याशी चर्चा करून ठरले, ‘त्रिवेणी.’ दि. २६ जूनला पहिला प्रयोग झाला. आतापर्यंत लागणारा इतर खर्च आम्ही दोघी बहिणींनी उचलला. प्रयोगावेळी मात्र काही प्रायोजक मिळाले. पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झाला.
माझे आणि राजेश्रीचे गेल्या काही वर्षांचे स्वप्न म्हणजे ‘त्रिवेणी.’ स्वा. सावरकरांच्या घराण्यातील स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित, स्वा. सावरकरांच्या साहित्यावर बेतलेला नृत्य, नाट्य, काव्य व निवेदनात्मक प्रयोग. खरेतर किती प्रयोग करायचे, कोठे करायचे, असे काहीच ठरलेले नव्हते, पण प्रयोग होत गेले. छत्रपती संभाजीनगरामध्ये आणि इतर ठिकाणीसुद्धा... ‘आम्हाला सावरकरांविषयी काहीच माहिती नव्हती. तुमच्या नाटकातूनच कळले’, ‘सावरकरांच्या घराण्यातील स्त्रियांनीसुद्धा इतके हाल सोसले, हे माहितच नव्हते,’ अशा प्रतिक्रियांनी नृत्य, नाट्य, निवेदनाचे भरभरून कौतुक झाले. ‘तुम्ही बहिणी फार मोठे काम करत आहात,’ असे अनेकजण म्हणू लागले. नाट्य सादरीकरणासाठी सुसज्ज नाट्यगृह असायला पाहिजे. पण, गंगाखेड, पैठण अशा शहरांतून, जिथे नाट्यगृह किंवा रंगमंच नव्हते; पण जेव्हा निमंत्रण आले, तेव्हा तिथे मंगल कार्यालयात आम्ही मंच उभा केला. एका विशेष मुलांसाठी काम करणार्या संस्थेपासून रेडिओ देवगिरी यांनी घेतलेले प्रयोग, पुण्यातील किशोरी प्रकल्पाच्या, सैनिकी शाळेच्या मुलींसाठी झालेले प्रयोग खूप समाधान देऊन गेले. नाशिक, जिथे सावरकरांच्या आणि तीन जावांच्या आयुष्यातील बहुतांश प्रसंग आम्ही साकारले आहेत, त्या सावरकर-पावन भूमीमध्ये झालेला प्रयोग तर आमचा सन्मानच होता.
अनेक तरुण मुले-मुली प्रयोगाला येतात आणि ‘थँक्स फॉर इन्ट्रोड्युसिंग सावरकर,’ असे जेव्हा म्हणतात, तेव्हा मनस्वी आनंद होतो. ‘सागरा प्राण तळमळला’चे नृत्य-नाट्य सादरीकरण, प्रभाकरच्या मृत्यूचा प्रसंग पाहून ‘आम्हाला तुम्ही आज रडविले,’ असे अनेक महिलाच काय, पुरुषही सांगतात. पोलिसांच्या धाडीच्या प्रसंगाला ‘च्....च्’, ‘स्सऽऽ....’ असे प्रेक्षागृहातून येणारे आवाज, शिव आरती, सावरकर आरती, सावरकरांना जन्मठेप या प्रसंगांना प्रेक्षकांमधून येणार्या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत गर्जना आम्हाला आमच्या कामाची पावती देतात. प्रसिद्ध सावरकर उडी, कारागृहातील स्थितीचे निवेदानात्मक वर्णन, सावरकरांवर होणार्या टीकेवर माई, ताई आणि निवेदन, यातून विचारले जाणारे प्रश्न प्रेक्षकांना निःशब्द, शांत, स्तब्ध करतात, प्रेक्षागृहातील ती शांतता खूप काही बोलून जाते. प्रयोग झाल्यानंतर अनेकजण सावरकरांना, येसूवहिनीला पदवंदन करतात, तेव्हा सादरीकरणाची परिणामकारकता प्रत्ययाला येते. लातूर येथे झालेल्या प्रयोगानंतर एक इस्लाम धर्मीय तरुणी म्हणाली, “सावरकर म्हणजे हिंदूच - फक्त असेच वाटे. पण, आज कळले की, ते किती महान होते!” हेच तर आम्हाला करायचे होते!
नागपूर येथे झालेला प्रयोग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहिला आणि कौतुकही केले. बीड येथे झालेल्या प्रयोगानंतर एका स्थानिक राजकीय महिला नेत्याने ‘सावरकर कोणत्याही पक्ष, जात-जमातीचे नाहीत, हे आज कळले,’ असे म्हटल्यानंतर कृतकृत्य वाटले. अनेक ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम म्हणून महिला मंडळे, महिला संघटना जथ्याने प्रयोगाला येतात आणि आम्हालाच एक सुप्तशक्ती देऊन जातात. मुळातच हल्ली मराठीतील फारच थोड्या नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो. त्यातही चरित्रात्मक नाट्य आणि तेही अशा विभूतीचे की जिच्यावर एक मनस्वी प्रेम करणारा, भक्ती करणारा गट आहे, तर तिच्यावर जाणूनबुजून टीका करणारा एक गटदेखील आहे. अशा वेळी ‘त्रिवेणी’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यावे, सावरकरांच्या कुटुंबाची महती त्यांना जाणणार्या, न जाणणार्या, त्यांना उमगू शकलेल्या, उमगू न शकलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत न्यावी, हा आमचा ध्यास आहे. आमचा समूह आता २२ वरून २६ जणांचा झाला आहे. प्रत्येक प्रयोगाचा भरपूर खर्च असतो. पण, सावरकरप्रेमी, राष्ट्रप्रेमी जाणकार, रसिक प्रेक्षकांच्या साहाय्याने, सहकार्याने, पाठिंब्याने प्रत्येक प्रयोग निर्विघ्नपणे आणि वाढत्या प्रतिसादाने पार पडत जातो. काही वेळा आम्ही दोघी, आमच्या सासर-माहेरची मंडळी, तर काही वेळा आमची मित्रमंडळी, आप्त, स्वकीय खर्च भागवतात.
विनायक सावरकर, त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या नात्यांनी गुंफलेल्या या तीन स्त्रिया परस्परांमध्ये घट्ट बांधलेल्या आणि एक सुंदर, लांबसडक वेणीच्या रुपात दिसणार्या. स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुरुषांइतकेच योगदान स्त्रियांचेही होते. सावरकर आणि अनेक नेत्यांची घरे स्त्रियांनी मोठ्या हिकमतीने सावरून धरली होती; अगदी चकार तक्रार न करता! त्याची आमच्या राष्ट्रेतिहासाने दखल घ्यावी, हाच ‘त्रिवेणी’चा प्रयास आहे. स्वातंत्र्य संग्रामातील कोणत्याही नेत्याच्या कार्याचे, त्यागाचे मूल्य कशानेच होऊ शकणार नाही, कोणा एकाच्या कार्याची तुलना दुसर्याशी होऊ शकणार नाही. सावरकरांचे मात्र सबंध कुटुंबच स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पेटून उठले. प्रत्येकाच्या संघर्षाची, त्यागाची गाथा निरनिराळीच होती. प्रत्येकाच्या आयुष्याचे कोंदण ‘त्रिवेणी’तून चमकदार होऊन प्रेक्षकांचे भावविश्व ज्ञानविचारांनी उजळविण्याचा हा प्रयास असाच चालत राहो, हीच विनायकाचरणी प्रार्थना!
प्रा. प्रीती पोहेकर
(लेखिका स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड येथे प्राचार्य आहेत.)