कलाविष्कारातून सावरकरदर्शन...

27 May 2024 20:36:34

              Swatantrya Veer Savarkar
सावरकर हे जसे महान देशभक्त होते, तसेच ते महान साहित्यिकदेखील होते. त्यांनी राष्ट्रकार्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी स्वतःकडील सर्व साहित्यिक पैलूंचा किंवा फॉर्मेट्चा उपयोग करून घेतला होता. त्यांनी जशी देशभक्तीपर गीते लिहिली, तशीच विरहकाव्ये, महाकाव्ये लिहिली. त्याचबरोबर लावणी, फटका, पोवाडा, नाट्यसंगीत असे काव्यप्रकारदेखील हाताळले होते. त्याप्रमाणेच कादंबरी, निबंध, ललित, ऐतिहासिक अशा साहित्य प्रकारांतदेखील लेखन केले. त्यामुळे सावरकरांच्या देशभक्तीप्रमाणे अनेक कलाप्रेमींना सावरकरांच्या साहित्यानेदेखील भुरळ घातली. मंगेशकर कुटुंबीय, बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांसारख्या संगीततज्ज्ञांनी सावरकरांच्या काव्याला संगीत दिले.

बाबूजींनी तर त्यांच्यावर चित्रपटदेखील काढला. नुकताच रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी सावरकर हा विषय नाटक, एकपात्री, नृत्य, संगीत, गायन, पोवाडा, अभिवाचन अशा विविध माध्यमांतून लोकांसमोर मांडला आहे. त्यातील निवडक आणि शक्यतो अजूनही सक्रिय असणार्‍या अशा सावरकरांवर आधारित कलाकृतीचा विशेषांक करावा, अशी कल्पना सुचली. जेणेकरून, या कलाकृती सादर करणार्‍यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ सावरकर विशेषांकाच्या माध्यमातून आपल्या कलाकृतींची ओळख वाचकांना करून देता येईल. या आगळ्यावेगळ्या कल्पनेस तत्काळ संपादक किरण शेलार यांच्याकडून मान्यता मिळाली आणि आज हा विशेषांक आम्ही सावरकर जयंतीच्या दिवशी प्रसिद्ध करीत आहोत.
 
नेहमीप्रमाणे या विशेषांकालादेखील भरभरून प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. गेली सलग सात वर्षे दै. ‘मुंबई तरुण भारत’ने सावरकर विशेषांकासाठी ‘अतिथी संपादक’ म्हणून माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मित्रवर्य आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांचे खूप खूप आभार. या विशेषांकासाठी सलग सात वर्षे उत्कृष्ट समन्वयासह बाकी आवश्यक बाबी शांतपणे सांभाळणार्‍या मुख्य उपसंपादक (फीचर्स) विजय कुलकर्णी आणि संपूर्ण दै. ‘मुंबई तरुण भारत’ समूहाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.

 
अक्षय जोग
 
 
Powered By Sangraha 9.0