माझी जन्मठेप : अभिवाचन नाट्याविष्कार

27 May 2024 20:13:44
Mazi Janmathep drama


असे म्हणतात की, ‘जे काम हजार व्याख्यानांनी होत नाही, ते एका चांगल्या नाटकाने होते.’ तेव्हा मनाने निश्चय केला की, सावरकरांचे कार्य, प्रखर राष्ट्रवाद, भाषा प्रभुत्व, त्यांनी भोगलेले कष्ट, कारावास यातील जे जमेल ते तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपण निश्चित करू शकतो. आपल्या हातात हक्काचे माध्यम आहे रंगमंच! ‘संगीत उत्तरक्रिया’, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’, ‘सहा सोनेरी पाने’ ही पुस्तके पुन्हा एकदा सादरीकरणाच्या दृष्टीने वाचू लागलो.
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माझ्या आयुष्यात कधी आले, हे सांगणे तसे कठीणच. कारण, लहानपणापासून अनेक वेळा ते पुस्तकांमधून भेटले, कधी शाळेत इतिहासाच्या धड्यातून, कधी वक्तृत्व स्पर्धांतून, तर कधी सुरस कथांमधून! त्यांची मार्सेलिसला बोटीतून मारलेली जगविख्यात उडी आणि अंदमानला झालेली 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा या पलीकडे सावरकरांबद्दल फारशी माहिती नव्हती. मी सहावीत असताना 1966 साली त्यांची अंत्ययात्रा गिरगावातील प्रार्थना समाजच्या जे जे अ‍ॅण्ड सन्सच्या चौकात प्रचंड गर्दीत उभे राहून पाहिल्याची आठवते. पुढे जी थोडी बहुत माहिती मिळायची, ती आमच्या घरी आणि नंतर महाविद्यालयात ‘राज्यशास्त्र’ या विषयामुळे. सावरकर असे जेव्हा जेव्हा भेटले, तेव्हा मनात कुतूहल निर्माण करून गेले. कट टू थेट नोकरी. साधी मध्यमवर्गीय विचारसरणी असलेल्या आमच्या संगीतकारांच्या घरात, पदवी ही नोकरी मिळवण्यापुरतीच महत्त्वाची होती. एक दिवस तीही मिळाली आणि खूप फायद्याची ठरली. त्यात सर्वांत मोठा लाभ जर मला कोणता झाला असेल, तर तो म्हणजे देशी-परदेशी अनेक शहरांत करायला मिळालेला प्रवास. या प्रवासादरम्यान आवड निर्माण झाली ती वाचनाची.
 
अशाच एक प्रवासात कोलकात्याला जाताना एक सद्गृहस्थ भेटले आणि एकंदर देश आणि राजकारण या विषयावर गप्पा जमल्या. हजारो वर्षे देशावर झालेली आक्रमणं, स्वतंत्र भारत, नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधी आणि ओघानेच सावरकर असे विषय या प्रवासात झाले. ते बोलत होते, मी ऐकत होतो. आम्ही कोलकाता विमानतळावर उतरलो. मी माझ्या कामाला निघालो. आम्ही पुन्हा भेटल्याचे आठवत नाही. पण, तो विषय मनात घोळत राहिला आणि वाटू लागलेे, आपण महाविद्यालयात ‘राज्यशास्त्र’ हा विषय घेऊन नेमके केले काय? फक्त नोकरी? जिथे या कुठल्याच विषयांचा संबंध येत नव्हता. तेव्हा ठरवले की, महाविद्यालयात न शिकवलेला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वाचायचा. पहिलेच पुस्तक वाचायला घेतले ते सावरकरांचे ‘1857चे स्वातंत्र्य समर.’ वर्ष असेल 1995-96. त्या सुमारास लहानपणापासून असलेली नाटकाची ओढ स्वस्थ बसून देत नव्हती आणि मी निर्मिती क्षेत्राकडे वळलो. काही व्यावसायिक नाटकांच्या निर्मितीनंतर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘संन्यस्त खड्ग’ वाचण्यात आले. पुढे त्या नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. काही वर्षांतच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे एक अद्ययावत नाट्यगृहाचे काम सुरू झाले होते. ते पाहायला गेलो आणि ते पूर्ण होताच माझ्या एका नाटकाचा प्रयोग तेथे केला. त्यानिमित्ताने त्या वास्तूत जाणे-येणे सुरू झाले. दर्शनी भागातच सावरकरांचा भव्य पुतळा, आतील वाचनालय, एकंदर तो परिसर भारावून टाकणारा होता. बहुतेक सावरकर माझ्या आयुष्यात तेव्हाच आले. त्यांचे साहित्य, त्यांचे विचार जर मला तिशीत कळले असते तर...तसा उशीरच झाला होता...असो!

असे म्हणतात की, ’जे काम हजार व्याख्यानांनी होत नाही, ते एका चांगल्या नाटकाने होते.’ तेव्हा मनाने निश्चय केला की, सावरकरांचे कार्य, प्रखर राष्ट्रवाद, भाषा प्रभुत्व, त्यांनी भोगलेले कष्ट, कारावास यातील जे जमेल ते तरुण पिढीपर्यंत पोहोचवावयाचा प्रयत्न आपण निश्चित करू शकतो. आपल्या हातात हक्काचे माध्यम आहे रंगमंच. ‘संगीत उत्तरक्रिया’, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’, ‘सहा सोनेरी पाने’ ही पुस्तके पुन्हा एकदा सादरीकरणाच्या दृष्टीने वाचू लागलो. सावरकरांच्या कोणत्या साहित्यावर/नाटकावर काम करावे, हे ठरेना. तेव्हा एकांकिका स्पर्धा घेण्याचे मनात आले. असा प्रयोग पूर्वी 2013 साली मी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेऊन केला होता. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आणि तरुणाईचा उत्साह अनुभवायला मिळाला होता. तशीच स्पर्धा पुन्हा घेतली, विषय होता. ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिवीर’. ही स्पर्धा त्रिस्तरीय होती. या उपक्रमाचे शीर्षक होते ’प्रणाम भारत.’ या कल्पनेला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले ते अभिजीत गोखले यांचे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती. प्रथम स्तर लेखनाचा, द्वितीय स्तर अभिवाचनाचा आणि तृतीय स्तर रंगमंचीय सादरीकरणाचा होता. यानिमित्ताने लेखक आणि कलाकारांचा शोध घ्यायला सुरुवात केली. माझे मित्र, दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांना बरोबर घेऊन व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ऑडिशन घेतल्या आणि 27 नवोदित कलाकारांची फौज तयार केली.
 
 प्रथम आलेल्या तीन एकांकिकांच्या सादरीकरणासाठी एवढ्या मोठ्या चमूची गरज होती. पुढे या तिन्ही एकांकिका एकत्र करून ‘प्रणाम भारत’ नावाचा पावणेदोन तासांचा एक, कथाकथनाचा प्रयोग उभा केला. या प्रयोगात आम्ही हुतात्मा उमाजीराजे नाईक, मदनलाल धिंग्रा, सावरकर आणि राजगुरू यांच्या जीवनावर आधारित एक कथा-कथनाचा नाट्याविष्कार सादर करतो. याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. या प्रयोगाबद्दल इथे नमूद करण्याचे कारण असे की, या अनोख्या प्रयोगातून एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे कथानकाचा विषय दमदार असेल आणि सादरीकरणात नावीन्य असेल, तर नेपथ्य, वेशभूषा, व इतर खर्चिक तामझाम केल्याशिवाय देखील प्रयोग परिणामकारक होऊ शकतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रकार, रंगमंचावर किंवा कुठेही सादर करणे सहज आणि सोपे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, कथाकथन स्वरूपात विषय प्रभावीपणे मांडता येऊ शकतो, हेही कळले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य अशा पद्धतीने रंगमंचावर मांडता आले तर? प्रयत्न करायला काय हरकत आहे? यासाठी ‘सहा सोनेरी पाने’ आणि ‘माझी जन्मठेप’ हे दोन ग्रंथ निवडले आणि पुन्हा वाचन सुरू केले. यावेळी वाचताना मात्र मनात दृश्यं उभी राहू लागली.

लहानपणापासून ज्यांच्या कथा ऐकल्या, विचार समजण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्याबद्दल असीम कुतूहल निर्माण झाले, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे समर्थ भारताचे स्वप्न पाहणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आता ’larger than life’, अगदी आकाशाएवढे दिसू लागले. अशा थोर व्यक्तिमत्त्वाचा आजही स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी अपमान होतो, त्यांचं राष्ट्रोद्धारातील योगदान पूर्णपणे विसरले जाते, हे दुर्दैवीच. हे धगधगतं ज्वालाकुंड असलेले व्यक्तिमत्त्व, आताच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मला ‘माझी जन्मठेप’ जास्त भावलं. त्यातील काही काही प्रसंगांनी झोप उडवली. विशेषतः अंदमान कारागृहातील त्यांची पत्नीशी झालेली भेट. पुन्हा भेट होईल की नाही अशा परिस्थितीत पत्नीला धीर देताना ते म्हणतात - “मुलामुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणावयाचे असेल, तर असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण, संसाराचा याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल, तर असे समज की, मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूल-बोळकी आपण फोडून टाकली, पण त्यायोगे पुढेमागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल.”

असेच आणखी एका प्रसंगात इतर कैद्यांशी संवाद साधत त्यांना धीर देताना ते म्हणतात, “आज आपला या जगतात अपमान होईल, पण असाही एक दिवस क्वचित येईल की, अंदमानच्या याच कारागारात राजबंदीवानांचे पुतळे उभारले जातील आणि येथे हिंदुस्थानाचे राजबंदिवान राहत असत, म्हणून हजारो लोक यात्रेस लोटतील.” आज किती आनंद आहे की, अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य पुतळा आहे, आणि पोर्ट ब्लेअर विमानतळाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डा’ असे नाव दिले आहे. मनात विचार आला की, लहानपणापासून अनेक वेळा असाच पुस्तकातून आलेला सावरकरांचा संबंध हा आपल्याकडून काहीतरी पुढे घडणार असल्याचा संकेत तर नव्हता? मग राहवेना. सतत अंदमान, सावरकर, नानी गोपाल, बाबाराव, बारी, मिर्झा डोळ्यासमोर येऊ लागले. सावरकरांचे जीवनचरित्र दाखवणारे अनेक कार्यक्रम, नाटके रंगमंचावर होऊन गेली आहेत, अजूनही होत असतात. परंतु, ‘माझी जन्मठेप’वर आधारित असलेला नाट्याविष्कार यापूर्वी रंगमंचावर आला नव्हता. आपण तो प्रयत्न करून पाहवा. पण, हे आपल्याला जमेल का? तो आकाशाएवढा कॅन्व्हास आपल्याला रंगमंचावर दोन-अडीच तासांत सादर करायचा आहे. माझ्यासाठी हे शिवधनुष्य उचलण्यासारखे कठीण आणि अशक्यप्राय होते.

मनात आखणी सुरू झाली. मला नक्की काय साधायचे आहे, कोणता प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवायचा, भाषा सोपी करायची की तीच असावी, सुप्रसिद्ध कलाकार की नवोदितांना संधी द्यायची, वाचन की अभिवाचन, प्रेक्षकांना कसे आकर्षित करायचे, तिकीटविक्री की स्वेच्छा मूल्य वगैरे अनेक विचार घोळायला लागले. प्रथम ही संकल्पना माझे मित्र डॉ. अनिल बांदिवडेकर आणि दादा गोखले यांच्यासमोर मांडली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मंजिरी मराठे आणि सात्यकी सावरकर यांच्या कानावर ही संकल्पना घातली. सर्वांनी आनंदाने सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आणि मी कामाला लागलो. 550 पानांचा हा ग्रंथ दोन-अडीच तासांत रंगमंचावर साकारायचा, तर आपल्या जोडीला हा ग्रंथ संकलन करण्यासाठी सावरकर अभ्यासक असलेली अधिकारी व्यक्ती पाहिजे. ग्रंथातील अतिमहत्त्वाचे विषय, विचार, भावनात्मक प्रसंग संकलित करण्याचे कठीण कार्य करण्यासाठी पार्ल्यातील उत्कर्ष मंडळाच्या अलका गोडबोले यांना विनंती केली. त्यांनी अनेक वेळा आमच्याशी चर्चा करून, प्रथम 127 पाने, मग 90 पाने असे करीत अखेर 50 पानांची ‘माझी जन्मठेप’ची संपादित आवृत्ती रंगावृत्तीसाठी डॉ. बांदिवडेकरांना दिली.
 
कलाकार निवडीसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर ऑडिशन्ससाठी जाहिरात केली. 67 नवोदित कलाकारांनी व्हिडिओे ऑडिशन्स पाठवल्या, त्यातून 20 प्रत्यक्ष ऑडिशन्स घेऊन सहा कथन कलाकार निवडले. संकलनाइतकंच कठीण होते भावार्थ समजून त्या शब्दांचे उच्चारण. त्यासाठी माझे पार्ल्यातील मित्र आणि विनय आपटे यांचे सहकारी, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास सावरकर यांनी या कलाकारांची सव्वादोन महिने तालीम घेतली. त्यावर निवेदनात्मक संस्कार केले, सुप्रसिद्ध निवेदिका मंजिरी मराठे यांनी. या प्रयोगाचे दिग्दर्शन करण्यासाठी कायम प्रयोगशील असणारे माझे सहकारी व या संपूर्ण प्रक्रियेत सुरुवातीपासून सहभागी झालेले अनुभवी दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर होतेच. या रितीने रंगभूमीच्या विविध अंगात पारंगत असणार्‍या रंगकर्मींची मोट बांधून, एक अनोखा रंगमंचीय नाट्यविष्कार सादर करण्याची संकल्पना साकार झाली. ‘माझी जन्मठेप’चा शुभारंभाचा प्रयोग दि. 25 फेब्रुवारी, 2023 रोजी सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहयोगाने त्यांच्याच अद्ययावत नाट्यगृहात सादर झाला. अडीच तासांचा हा अभिवाचनाचा नाट्याविष्कार आतापर्यंत मुंबई, डोंबिवली, पुणे, नाशिक, मिरज, नागपूर, सोलापूर, इंदौर या ठिकाणच्या नाट्यगृहात प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात सादर झाला.

ही निर्मिती यशस्वी झाल्याची पोचपावती म्हणजे दि. 8 जुलै, 2023 शौर्य दिनी, नाशिकच्या भोंसला मिलिटरी स्कूलच्या साडेअकराशे विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद. विशेष म्हणजे, दि. 4 सप्टेंबर, 2023 रोजी नागपूर येथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या समोर हा प्रयोग सादर करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. येत्या 28 मे - सावरकर जयंतीला याचा रौप्यमहोत्सवी प्रयोग होत आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र म्हणजे स्वातंत्र्य उत्थानाची भगवद्गीता आहे. पराक्रम, त्याग, दुःख, उपहास, कौतुक, सन्मान, सत्कार, धाडस, साहस, तिरस्कार, आशा, निराशा अशा अनेक भावनांच्या परमोत्कर्ष बिंदूंची ही मालिका आहे. ते जीवन, संजीवनी मंत्राचे अमृत आहे - कवी व गायक श्री गोविंदस्वामी आफळे. हे सर्व ज्या ग्रंथातून अनुभवायला मिळते, तो म्हणजे ‘माझी जन्मठेप’ आणि म्हणूनच त्याचा रंगमंचीय नाट्याविष्कार तरुणांपर्यंत यथाशक्ती यथामति पोहोचवताना मला विलक्षण समाधान मिळते.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माझं आता आयुष्यभर टिकणारं कलात्मक नातं निर्माण झाले आहे, तेच माझे प्रेरणास्थान आहे. त्यांचे विचार कायम सोबत असतात, पदोपदी मला ते सावध करत असतात. आत्मविश्वास, आशावाद आणि सकारात्मकता ही आता माझी बलस्थानं झाली आहेत. याच विचारांनी प्रेरित होऊन नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी लिहिलेल्या ‘संगीत उत्तरक्रिया’ या नाटकाची तयारी सुरू केली. याचा शुभारंभाचा प्रयोग, दि. 24 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मरकाच्या सहयोगाने, ‘नाट्यसंपदा कला मंच’ या आमच्या संस्थेने सादर केला. या नाटकाच्या प्रयोगांची आखणी सध्या सुरू आहे. आता माझ्या पाठीशी सावरकर आहेत. पुढचा प्रवास त्यांच्यासोबत...
 
अनंत पणशीकर

Powered By Sangraha 9.0