तात्यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचा घेतलेला वसा टाकायचा नव्हता. मग मी एक तोडगा काढला. त्यांच्या अर्थपूर्ण गीतांचे व्हिडिओ बनविले, नाट्यप्रसंग चित्रित केले. आर्थिक वाटा मी पूर्णपणे उचलला. नव्या तंत्रज्ञानामुळे हा संच अगदी दोनावर आला. निवेदिका मी आणि तांत्रिक बाजू मजबूतपणे माझे पती डॉ. सतीश यांनी सांभाळायचे ठरले आणि प्रयोग करणे सोपे झाले.
एका पारंपरिक नृत्य शैलीतील कार्यक्रमात ‘सागरा प्राण तळमळला’ या गाण्यावर नृत्य सादर होणार होते व त्या गाण्याच्या निवेदनाची धुरा माझ्याकडे होती. मग वाचन, अभ्यास केला. एक अद्भुत क्षण आला. सावरकर थेट मनाला जाऊन भिडले. मला नेमके काय करायचे आहे, ते ठरले आणि पुढील प्रवास सुरू झाला. आपोआप सुरू झाला. त्यासाठी वाचन, वाचन आणि वाचन. त्यातून एक व्यक्ती काय काय असू शकते ते समजत गेले. भारावून जाण्याचे ते सारे क्षण होते. त्या क्षणांनी बहाल केला, ‘सावरकर’ हा ध्यास. या एका हिर्याला अगणित पैलू आहेत. हे जसजसे लक्षात येऊ लागले, तसतशी मी अभावितपणे प्रगल्भ होत गेले. सावरकर वाचनात आले, ते योगायोगाने. पण, पुढील प्रवास घडला, तो या बहुआयामी व्यक्तित्त्वाच्या ओढीने. निष्ठावंत क्रांतिकारक, जाज्ज्वल्य देशभक्त, जगद्विख्यात स्वातंत्र्ययोद्धा. ही तर सारी देशभक्तीची प्रतीके त्यांच्याजवळ होतीच. पण, समर्पित समाजसुधारक हा पैलू माझ्या मनात खोल रूतला. प्रगल्भ कवी, लेखक, चतुरस्र वक्ता, विवेकशील तत्वज्ञानी आणि परखड विज्ञाननिष्ठ हे पैलू तर माझ्यासाठी आश्चर्याचा महासागर होता.
हिंदुत्व हा माझा आत्मा असल्याने सावरकर आणि त्यांनी मांडलेली हिंदुत्वाची व्यापक व्याख्या माझ्यासाठी मंत्रच होता. भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी हे कार्य फारच वेगळे आहे. त्यांनी बहाल केलेले अनेक शब्द मराठीला अलंकृत करतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, वाचनानंतर संहितालेखन करायचे आणि सादरीकरणात त्यांची गीते सादर करायची, हे निश्चित केले. विस्तृत लिखाण करून, पुन्हा निवडक घटना बाजूला काढून संहिता लिहून पहिला कार्यक्रम करायचे ठरले. संच ठरला. तालमी सुरू केल्या. पहिला प्रयोग करताना मोठा संच होता. अनेक गायक, वादक, दोन निवेदक, सहा अभिनेते-अभिनेत्री, पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ इ. पण, काही प्रयोग झाल्यावर लक्षात आले की, ही सर्व मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. पूर्णवेळ कलाकार नाहीत. त्यामुळे प्रयोग करताना अडचणी येऊ लागल्या. तालीम व वेळ हे समीकरण जुळत नव्हते. तात्यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचा घेतलेला वसा टाकायचा नव्हता. मग मी एक तोडगा काढला. त्यांच्या अर्थपूर्ण गीतांचे व्हिडिओ बनविले, नाट्यप्रसंग चित्रित केले. आर्थिक वाटा मी पूर्णपणे उचलला. नव्या तंत्रज्ञानामुळे हा संच अगदी दोनावर आला. निवेदिका मी आणि तांत्रिक बाजू मजबूतपणे माझे पती डॉ. सतीश यांनी सांभाळायचे ठरले आणि प्रयोग करणे सोपे झाले.
मोठा संच घेऊन कार्यक्रम भव्य वाटत असला, तरी ते अनेकदा शक्य होत नव्हते. तात्याराव समाजापर्यंत न्यायचे होते, समाजात रूजवायचे होते, म्हणून हा मार्ग अवलंबिला. मी अभिनय करू शकते. पण, लेखिका म्हणून एक नवा पैलू मला माझ्यातच गवसला. विपूल शब्दभांडार आणि कोठेही लेखनाची धार यत्किंचितही कमी न करता मांडण्याची धाटणी ही नव्यानेच परमेश्वराने बहाल केली, असे वाटले आणि संहिता पूर्ण झाली. प्रभावीपणे सादरीकरण करायचे असेल, तर संहिता तोंडपाठ हवी. तात्यांना अनुभवायला आलेल्या मंडळींना तात्या भेटलेच पाहिजेत, या ध्यासाने मनापासून आतून आलेले सादरीकरण सुरू केले. ५० पेक्षा जास्त ठिकाणी सादरीकरण केले. परमेश्वर झोळीत खूप काही टाकत होता. अंदमानात सहलीला गेले असताना, ‘रानडे ट्रॅव्हल्स’ यांनी तिथे माझा प्रयोग ठेवला. तात्यांच्या त्या कोठडीत जाऊन त्यांना नमस्कार केला आणि तात्यांचा वादळी जीवनप्रवास व तितकेच उत्तुंग आत्मार्पण सर्वांसमोर मांडले. नव्याने मी पुन्हा जन्माला आले, असे वाटले. जीवनाची खर्या अर्थाने सफलता अनुभवायला मिळाली. तात्यांविषयीची भक्ती ही त्या सादरीकरणाने त्यांच्यापर्यंत पोहोचली, ही अनुभूती मला आली.
अनेक ठिकाणी व्याख्यानांचा योग आला. कोठेही बोलायचे तर आपले नाणे खणखणीत हवे. त्यामुळे सतत अभ्यासपूर्ण वाचन चालूच असते. अनेकवेळा उलटसुलट प्रश्न विचारून लोकांनी घेरलेसुद्धा. पण, अभ्यास असेल, तर अडचण येत नाही, हे सिद्ध झाले. हे सर्व काही सुरू असताना, मनाने आणखी एक ध्यास घेतला. त्यांच्या कवितांवर अभ्यास सुरू केला. कवितांचे प्रकार, भाषाप्रभुत्व, वृत्त, नवरस निर्मिती, महाकाव्य, त्यातून समाजप्रबोधन, देशभक्ती, कालखंडानुसार कविता, हे क्रांतिकार्यासोबत मांडावे, असे वाटू लागले. का वाटू लागले हे माहीत नाही, पण हे अचानक घडले आणि अगदी त्याचवेळी अगदी दोनच दिवसांत माझा भाऊ व बहीण यांनी एक कल्पना मांडली की, माझे वडील सातार्यातील प्रसिद्ध रंगकर्मी भालचंद्र वासुदेव डांगे व माझी आई इंदुमती यांच्या नावाने एक नर्मितीसंस्था सुरू करावी. माझे वडील हिंदू महासभेच्या बैठकांना जात असत, असे मला माझ्या आत्तेभावाकडून समजले. ‘इंदुचंद्र’ निर्मिती संस्थेतर्फे सावरकरांचे क्रांतिकार्य, समाजकार्य व साहित्य सादर करणारा कार्यक्रम करायचे ठरले. माझे संहितालेखन सुरू झाले. या कार्यक्रमात काही नवे करता येईल का, यासाठी अनेक रंगकर्मींबरोबर बोलले. ते अशासाठी की, क्रांतिकार्य व त्याबरोबर साहित्य मांडायचे, तर समतोल साधायला हवा आणि मग ठरले, तात्यांच्या अर्थपूर्ण गीतांवर भरतनाट्यम् शैलीतील नृत्ये त्यात योग्य ठिकाणी सादर करावी. त्यासाठी सातार्यातील उत्तम कलाकारांची साथ मिळाली.
निवेदनाची धुरा मी स्वतः, डॉ. हिमगौरी वडगांवकर व माझी रंगकर्मी बहीण हेमांगी जोशीने सांभाळायचे ठरले. पुन्हा एकदा तांत्रिक बाजू सांभाळायला माझे पती डॉ. सतीश वडगांवकर धावून आले. प्रथम प्रयोग सातार्यात आई-वडिलांच्या कर्मभूमीत करायचे ठरले. निधी गोळा करून. सर्वांसाठी खुला प्रयोग ठेवला. मुंबईतील उद्योजक, तसेच सातारचे काटदरे मसालेवाले, कराडचे माझे मित्र डॉ. मिलिंद पेंढारकर यांनी त्यांच्या जनकल्याण पतसंस्थेतर्फे, तर इतर अनेक मान्यवरांनी निधी दिला. माझे सख्खे बंधू मुकुल डांगे व चुलत बंधू चिंतामणी डांगे यांनी निधी दिला. ‘सावरकरांसाठी करायचे नाही, तर कोणासाठी?’ असे म्हणणारी माणसे भेटली. आमची सर्व भावंडे, मित्रमैत्रिणी परगावाहून खास आली होती. माझ्या आत्याचे पती ज्येष्ठ रंगकर्मी शरद लिमये यांच्या शुभहस्ते या निर्मिती संस्थेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. काही मान्यवरांनी मात्र ‘सावरकर ही व्यक्तीच आम्हाला आवडत नाही’ म्हणून निमंत्रण नाकारले. अशा परस्परविरोधी अनुभवांना सामोरे जात, बहिणीने व मी अगदी बॅनर ते रंगमंच व्यवस्था आणि निवेदन ते सर्वांना सुग्रास भोजन अशा सर्व गोष्टी लीलया हाताळल्या. आम्ही हे यशस्वी पुष्प आई-वडिलांच्या चरणी वाहिले. प्रयोग मिळत गेले.
सध्या मी अमेरिकेत आहे. येथेही तात्यांच्या जयंतीनिमित्त नॉर्थ कॅरोलिनामधील रॅले येथे माझा ‘क्रांतिसूर्य सावरकर’ हा कार्यक्रम रविवार, दि. १९ मे रोजी संपन्न झाला. यासाठी भारतातील व अमेरिकेतील संघबधूंची मला खूप मदत झाली. ही एक ईश्वरी साखळी आहे, असे मनाला वाटून गेले. नाशिक येथील अतिशय नामांकित आयुर्वेद महाविद्यालयाने स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. ‘क्रांतिसूर्य सावरकर’ कार्यक्रम ठेवला. समोर तरुण वर्ग. कसा प्रतिसाद देतील माहीत नाही. पण, अफाट प्रतिसाद मिळाला. ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी सतत सभागृह दणाणत होते. सावरकरांचे हिंदुत्व, देशभक्ती, क्रांतिकार्य हे सर्व पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, ते त्यांनी आत्मसात करावे. पण, त्याचबरोबर, अभ्यासांती माझ्या लक्षात आलेल्या गोष्टी सामान्य जीवनातही खूप उपयोगी पडतील, अशा आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘स्वसमुपदेशन.’ तात्यांनी हे आयुष्यभर वापरले आहे, म्हणून ते प्रत्येक परिस्थितीत टिकू शकले. ते आपण शिकू शकतो. दृढनिश्चय, प्रचंड प्रतीक्षेची तयारी, कष्ट, शरीरयष्टीच्या तुलनेत प्रचंड हालअपेष्टा कशा सोसायच्या, हे शिकावे. उत्तरार्धातील उपेक्षा. ही उपेक्षा न मानता केवळ ‘मी या भारतमातेसाठी काय करू शकतो,’ हा विचार त्यांनी केला. एक व्रतस्थ जीवन जगण्याची ही तयारी आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची आहे, हेसुद्धा शिकता येईल. यातून देशप्रेम शिकता येईल. जोपर्यंत देशावर आपण निर्व्याज प्रेम करत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही, हे तरुणांनी, सर्वांनी शिकलेच पाहिजे. बरेच अभ्यासण्यासारखे आहे. पण, शब्दमर्यादा आहे याची जाणीव मला आहे, म्हणून जाता जाता-
की घेतले व्रत न आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने
जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे
बुद्धयाची वाण करी धरिले सतीचे...
या तात्यांच्या अनमोल ओळींचे स्मरण करते. माझी शब्दसुमनांजली तात्यांच्या चरणी अर्पण करून माझा लेखनप्रपंच थांबविते.
वंदे मातरम्...