मनोज बाजपेयींची सेंच्युरी डगमगली!

25 May 2024 22:08:35
Manoj Bajpayee

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी यांचा अभिनय कारकिर्दीतला 100वा चित्रपट ’भैयाजी’ दि. 24 मे रोजी प्रदर्शित झाला. मातीतले कलाकार असे जे आपण म्हणतो, त्या पठडीतील मनोज बाजपेयी यांची अभिनयशैली. यापूर्वी त्याची प्रचिती ‘शुल’, ‘नाम शबाना’, ‘जोरम’ अशा अनेक चित्रपटांतून आली आहे. आता अभिनय कारकिर्दीतील 100वा चित्रपट खास असणारच, पण तो खरंच अभिनय, दिग्दर्शन, संगीत, कथा या सर्व अनुषंगाने खास होता का? जाणून घेऊयात...
 
तत्पूर्वी नेमके ’भैयाजी’ चित्रपटाचे कथानक काय आहे, तर ही कथा घडते बिहारमधील सीतामंडी या गावात. रामचरण त्रिपाठी म्हणजेच भैयाजी (मनोज बाजपेयी) यांचा गावात आदरयुक्त दरारा. त्यांच्या शांत, समाजसेवेच्या वृत्तीमुळे गावातील लोकं त्यांना देवासमान मानतात. एकेकाळी गुंड असणारे भैयाजी तो विध्वंसक काळ मागे सोडून साधं जीवन जगण्याचा विचार करतात आणि लग्नाच्या बोहल्यावर उभे राहतात. त्यांचा छोटा भाऊ दिल्लीहून त्यांच्या लग्नासाठी येत असतो. पण, दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर एका गुंडाचा मदमस्त मुलगा त्याची काही कारणास्तव हत्या करतो आणि हे समजल्यावर भैयाजी तत्काळ दिल्लीत जातात आणि पुढे आपल्या भावाच्या मृत्यूचा सूड कसा घेतात? आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरोपीचा बाप काय काय करतो? अशी चित्रपटाची कथा आहे.
 
मुळात चित्रपटाच्या पूर्वार्धातच हा संपूर्ण चित्रपट सूडाच्या भावनेने पुढे सरकणार आणि अर्थात खलनायकाचा नायकाच्या हातून म्हणजेच भैयाजीच्या हातून मृत्यू होणार हे समजते; फक्त ते कसं होणार, याची प्रेक्षक वाट पाहतो. त्यामुळे आधीच कथानक पूर्णपणे समजल्यामुळे कमकुवत कथा मांडणी आहे, असं स्पष्टच म्हणावं लागेल. ‘भैयाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शक अपुर्व सिंग कार्की यांनी यापूर्वी ‘सिर्फ एक बंदा कॉफी हैं’ हा चित्रपट मनोज बाजपेयींसोबत केला होता. पण, त्या चित्रपटाप्रमाणे याहीवेळेस दिग्दर्शक कथामांडणीत मागे पडले. याशिवाय मनोज बाजपेयी यांचा 100वा चित्रपट असूनही त्यांचा ‘स्क्रिन टाईम’ फार कमी वाटतो आणि त्याहून जास्त वेळ चित्रपटातील बाप-मुलाची खलनायकी जोडी अर्थात अभिनेते जतिन गोस्वामी आणि सुविंद्र विक्की हेच दिसतात.

मनोज बाजपेयींचा एक वेगळा लूक नक्कीच ‘भैयाजी’च्या पात्रातून पाहायला मिळतो. चित्रपटाच्या कथेत बिहारी आणि दिल्ली-हरियाणा टच दाखवण्यात आला आहे. मात्र, अ‍ॅक्शन सीन्स पाहता, आपण दक्षिणात्य चित्रपट पाहत असल्याचा भास होतो. चित्रपटातील पार्श्वसंगीत बिहारच्या संस्कृतीवर पूर्णपणे बेतलेले. त्यामुळे गाणी ही बिहारी गायकांनी गायली आहेत. पण, मनोज बाजपेयी यांच्या आवाजातील ’बाग के करेजा’ आणि ’कौने जनम के बदला’ ही गाणी थोडीफार भावतात. पण, त्यातही ऐकताना फारसे काही नावीन्य जाणवत नाही.

कथा, दिग्दर्शन, संगीत यानंतर अभिनयाकडे वळूयात. नेहमीप्रमाणे मनोज बाजपेयी यांनी अभिनयाच्या या ग्राऊंडवर सिक्सर नक्कीच मारला आहे. ‘भैयाजी’ हे पात्र जितकं आक्रमक, कणखर आणि बेधडक आहे, ते अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर साकारण्यास मनोज खरे उतरले आहेत. पण, कागदावर ते पात्र थोडं कमकुवत उमटलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसेच, त्यांच्यासोबत झळकलेली जोया हुसैन हिने मनोज बाजपेयींपेक्षा अधिक छान अ‍ॅक्शन सीन्स दिले आहेत आणि ती बर्‍याचवेळी तिचा परफॉर्मेन्स वरचढ ठरतो, तर भागीरथी कदम ज्यांनी ‘भैयाजी’च्या छोट्या अम्माची भूमिका साकरली आहे. त्यांचे हावभाव आणि संवाद एकमेकांशी जुळत नसल्याचे अगदी ठळकपणे दिसते.
 
आता प्रश्न पडतो तो असा की, ‘भैयाजी’ हा चित्रपट पाहावा की पाहू नये? जर का तुम्ही मनोज बाजपेयींचे चाहते आहात, तर नक्कीच त्यांचा अभिनय आणि 100वा चित्रपट असल्यामुळे तो पाहायला जा. परंतु, यापूर्वी आलेले काहीसे याच पठडीतील चित्रपट आणि त्यातील अ‍ॅक्शन सीन्स ‘भैयाजी’पेक्षा थोडे ठीक होते, असे म्हटले तर वावगे ठरु नये.

 
चित्रपट : भैयाजी
दिग्दर्शक : अपुर्व सिंग कार्की
कलाकार : मनोज बाजपेयी
रेटिंग : दोन स्टार


 
Powered By Sangraha 9.0