स्वत:मधील कलाकारावर विश्वास ठेवणारा ‘अनिकेत’

24 May 2024 22:28:43
talk with aniket vishwasrao

मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अनिकेत विश्वासराव. अनिकेत विश्वासराव लवकरच ‘२६ नोव्हेंबर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’ने त्याच्याशी साधलेला सुसंवाद....


‘२६ नोव्हेंबर’बद्दल.....

अनिकेत विश्वासराव लवकरच ‘२६ नोव्हेंबर’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलताना तो म्हणाला की, “संविधानाचे महत्त्व गोरगरिबांना अजूनही माहीत नाही. आपले अधिकार, हक्क काय आहेत, याची पुरेशी माहिती त्यांना नसल्यामुळे आजही समाजातील काही लोक त्यांच्यावर अत्याचार करतात. त्यामुळे समाजातील तळागाळातील लोकांना संविधानात तरतूद केलेले अधिकार काय आहेत, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘२६ नोव्हेंबर’ या चित्रपटातून करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने केला आहे.” या चित्रपटात अनिकेत विश्वासराव झथऊ ऑफिसरची भूमिका साकारत आहे.


....म्हणून अभिनयच करिअर म्हणून निवडले!

अनिकेत विश्वासराव याचे अभिनय क्षेत्राकडे पाऊल कसे वळले, याबद्दल बोलताना तो म्हणतो की, “महाविद्यालयात शिकत असतानाच अभिनयाची गोडी लागली होती. महाविद्यालयीन जीवनात अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये कामं केली होती. वेगवेगळ्या भूमिकांमधून मी कलाकार म्हणून महाविद्यालयीन काळातच माझी जडणघडण होत गेली आणि त्याचेच फळ म्हणून कॉलेजमध्येच असताना ‘नायक’ ही मालिका मला मिळाली. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर लगेचच मला ‘हवा आने दे’ या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मालिका आणि हिंदी चित्रपटात फार मोठी संधी मिळाली. एकामागून एक इतक्या लहान वयात अभिनयाच्या संधी आल्यामुळे, हेच क्षेत्र करिअरसाठी निवडायचा मी निर्णय घेतला,” असं अनिकेत म्हणाला.

राहुल बोस यांच्यामुळे सहकार्‍यांबद्दलचा आदर शिकलो

२००३ साली सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘चमेली’ या हिंदी चित्रपटातही अनिकेत झळकला होता. त्या चित्रपटाची विशेष आठवण सांगताना अनिकेत म्हणाला की, “इतका मोठा चित्रपट मिळाल्यामुळे कामाचं नक्कीच मला दडपण आलं होतं. त्या चित्रपटावेळी मी केवळ माझ्या अभिनयावर लक्ष केंद्रित करत होतो. कारण, करिना कपूर सोबत मी स्क्रीन शेअर करणार होतो. त्यामुळे भूमिका जरी छोटेखानी असली तरी ती चांगलीच झाली पाहिजे, असा माझा अट्टहास होता.”

पुढे अनिकेतने अभिनेते राहुल बोस यांच्याबद्दल बोलताना म्हणाला की, “एके दिवशी सकाळी ९ ची शिफ्ट होती आणि सकाळी ७.३० वाजताच मी आणि राहुल बोस सेटवर पोहोचलो होतो. त्यावेळी आम्ही दोघं बसून छान गप्पा मारत होतो. पण, राहुल खरंच माझ्याशी फार आपुलकीने वागले आणि त्यांनी माझी काळजीदेखील घेतली. ज्यावेळी मी राहुल यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी मला लक्षात आलं की, ज्येष्ठ कलाकार म्हणून प्रत्येकाशी कसं आपुलकीने वागलं पाहिजे. त्यामुळे आता इतकी वर्षे मी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर नक्कीच सेटवरील स्पॉटबॉयपासून इतर सर्व डिपार्टमेंटमधील सहकार्‍यांशी कसं वागायचं, हे मी नक्कीच राहुल बोस यांच्याकडून शिकलो,” अशी कबुलीदेखील अनिकेतने यावेळी दिली.

सध्या अनिकेतची दोन नाटकं रंगभूमीवर सुरू आहेत. ‘द परफेक्ट मर्डर’ आणि ‘कोण म्हणतं टक्का दिला’ या दोन नाटकांमधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेच. मालिकांबद्दल बोलताना अनिकेत म्हणाला की, “मालिकांनीच मला प्रसिद्धी आणि नाव दिलं आणि मुळात मनोरंजनाचं कोणतंही माध्यम हे लहान-मोठं नसतं; आपल्या कामाच्या शैलीवर आणि जिद्दीवर सारं काही अवलंबून असतं, असं मी मानतो..”
 
मालिकांपासून दूर राहण्याचा विचार केला, कारण....

कलाकार सध्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये कामं करताना दिसत असतात. पण, मालिका म्हटलं की कलाकार म्हणून तारेवरची कसरत नक्कीच असते. यावर अनिकेत म्हणाला की, “मालिका म्हणजे फार मोठी आणि महत्त्वाची कमिटमेंट आहे. कारण, रोज एपिसोड टेलिकास्ट होत असल्यामुळे रोज शूट करणं गरजेचं असतं. पण, चित्रपटांचं शूट हे काही दिवसांमध्ये पूर्ण होतं आणि नाटकाचे प्रयोग शक्यतो वीकेंड्सना असल्यामुळे बर्‍याचदा नाटक आणि चित्रपट करणं सोप्प जातं. पण, या रांगेत मालिका बसत नसल्यामुळे सध्या मी मालिकाविश्वासापासून लांब आहे,” असे अनिकेत म्हणाला.

अनिकेत विश्वासराव याने नाट्यसृष्टीचा प्रवास ‘नकळत सारे घडले’ या नाटकापासून केला. याशिवाय, ‘ऊन-पाऊस’, ‘कळत-नकळत’ या मालिकांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या. अनिकेतने आत्तापर्यंत ‘फक्त लढ म्हणा’, ‘पोश्टर गर्ल’, ‘पोश्टर बॉईज’, ‘मस्का’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘ये रे ये रे पैसा 2’, या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.


Powered By Sangraha 9.0