‘मुदतपूर्व’ची कमाल की कसोटी?

23 May 2024 22:05:07
Rishi Sunak
 
भारतात एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, आता जागतिक स्तरावर ब्रिटनमध्ये होणार्‍या निवडणुकांचे वेध लागले आहेत. ब्रिटनमध्ये दि. 4 जुलै रोजी राष्ट्रीय निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. तेथील हुजूर पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारची 14 वर्षे पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, निवडणूकपूर्व सर्वे असे दर्शवितो की, हुजूर पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचे यंदाचे हे शेवटचे वर्ष ठरु शकते.
 
ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनक, त्यांचे हुजूर पक्षाचे सहकारी, तसेच मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर आणि त्यांच्या मंत्र्यांनी गुरुवारी जोरदार प्रचार केला. तत्पूर्वी बुधवारी संध्याकाळी ‘10, डाऊनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधानांच्या निवासस्थानांच्या पायर्‍यांवर ऋषी सुनक यांनी केलेले पावसातील भाषण चांगलेच गाजले. या भाषणाने देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, सुनक यांचा गेल्या 14 वर्षांपासून सत्तेत असलेला हुजूर पक्ष यंदाच्या निवडणुकीत केयर स्टारमरच्या नेतृत्वाखालील विरोधी मजूर पक्षाकडून पराभूत होण्याची शक्यता आहे. मजूर पक्ष हा हुजूर पक्षाच्या सुमारे 20 टक्के गुणांनी पुढे असल्याचे समजते.तसेच सुनक यांच्या सरकारबद्दल इंग्लंडवासीयांचे मत फारसे सकारात्मक नाही. 2022 साली पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ऋषी सुनक यांनी सुधारक, ‘टेक्नोक्रॅट’ आणि स्थिर नेता म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
 
सुनक यांच्याकडे सर्वसाधारण निवडणूक बोलाविण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा अवधी होता. परंतु, त्यांनी अपेक्षित तारखेच्या काही महिने आधीच म्हणजे जुलै महिन्यात निवडणूक जाहीर केली आहे. त्यांच्या या मुदतपूर्व निवडणुका घेण्याच्या निर्णयाला स्वकीयांकडूनच दुभंगलेला प्रतिसाद मिळाला. आता अर्थव्यवस्था आणि संरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत दोन्ही पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, ऋषी सुनक यांच्या सरकारने मजूर पक्षावर करवाढीचे नियोजन केल्याचा आणि जागतिक आव्हानांसाठी या पक्षाचे धोरणे अप्रस्तुत असल्याचा आरोप केला, ज्याचा मजूर पक्षाने कडाडून विरोध केला. वास्तविक, गेल्या 14 वर्षांतील आर्थिक गैरव्यवस्थापनासाठी मजूर पक्षातील नेेते हे हुजूर पक्षाला सर्वस्वी दोष देतात.निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाविषयी पाहिले, तर हा युनायटेड किंग्डम हा देश एकूण 650 मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक मतदारसंघात मतदार स्थानिक उमेदवार निवडतात, जो नंतर आपल्या कर्तृत्वावर संसदेत जागा मिळवू शकेल.
 
मतदारांना त्यांच्या बॅलेट पेपरवर एक उमेदवार निवडायचा असतो आणि सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार विजयी होतो. उमेदवार सामान्यतः मोठ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. 326 हा बहुमताचा जादुई आकडा. ही सीमा ओलांडणार्‍या पक्षाचा नेताच पुढे सरकार बनवू शकतो आणि पंतप्रधान होऊ शकतो. जवळपास 50 दशलक्ष ब्रिटनचे मतदार मतदानासाठी पात्र असतील. येथील स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदान होते. संपूर्ण युकेमधील मतदार ‘हाऊस ऑफ कॉमन्स’च्या सर्व 650 सदस्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवडतील. ‘कॉमन्स’मध्ये बहुमत असलेला पक्ष, एकटा किंवा युतीने, पुढचे सरकार स्थापन करेल, त्याचा नेता पंतप्रधान होईल.
 
जेव्हा कोणताही पक्ष 325 पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाही, अशावेळी विद्यमान पंतप्रधान सत्तेत राहतात आणि त्यांना युती करण्यासाठी इतर पक्षांशी वाटाघाटी करून सरकार स्थापन करण्याची पहिली संधी दिली जाते. संसदेत बहुमत मिळवून देणार्‍या व्यवस्थेवर सहमती दर्शविण्यात तो किंवा ती अयशस्वी झाल्यास, सत्ताधारी नंतर विरोधी पक्षाच्या नेत्याला नवीन सरकार स्थापन करण्याची शिफारस करतात. र्धेीर्ॠेीं नामक एका मार्केट रिसर्च कंपनीने एप्रिलमध्ये भाकित केले होते की, मजूर पक्ष 403 जागा जिंकतील, तर हुजूर पक्षाला 155 जागांवर समाधान मानावे लागेल. 2019च्या निवडणुकीत हुजूर पक्षाने 365 जागा जिंकल्या होत्या आणि मजूर पक्षाने 202 जागांवर विजय संपादित केला होता. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागून आहे.


 
Powered By Sangraha 9.0