सिंदखेड राजा येथे उत्खननात सापडले 'प्राचीन शिवमंदिर'
22-May-2024
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : बुलढाणाच्या सिंदखेड राजा (Shivmandir Sindakhed Raja) येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोर सध्या जिर्णोद्धाराचे कार्य सुरु आहे. यावेळी उत्खनन सुरु असताना पुरातन 'शिवमंदिर' सापडल्याचे निदर्शनास आले आहे. हे मंदिर १३ व्या शतकातील यादकालीन शिवमंदिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराची भारतीय पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात आली. उत्खननात मंदिराशी संबंधित आणखी काही वस्तू सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या मंदिराचा सखोल अभ्यास केला जाईल, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राजस्थानाच्या दौसा जिल्ह्यातील वेझा गावातही महाभारत आणि मौर्य काळातील अवशेष नुकतेच सापडले होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने उत्खननादरम्यान गावातील एका ढिगाऱ्यावर २५०० वर्षांहून जुन्या कलाकृतींचा शोध लावला आहे. यात पितळेची हत्यारे, नाणी आणि मौर्य काळातील पुतळ्याचे शीर, शुंग काळातील अश्विनी कुमारांची शिल्पे आणि हाडांची अवजारे यांचा समावेश आहे. दरम्यान महाभारत काळातील मातीच्या भांड्यांचे तुकडे व इतर कलाकृती देखील सापडल्या आहेत.