‘बोको हराम’ ते रोहिंग्या

22 May 2024 20:51:35
Boko Haram

"पाणी भरणं, साफसफाई करणं, घर चालवणं ही गुलामगिरी इथे तुझ्यासाठी नाही. तू ख्रिश्चन होतीस, पण आता नाहीस.तू नायजेरियामध्ये नाहीस, तर तू आता इस्लामच्या राज्यात आहेस,” असं तिला पळवून आणणारा ‘बोको हराम’ संघटनेचा दहशतवादी सांगत होता. ती १४-१५ वर्षांची मुलगी भेदरली होती. ती विचारात असतानाच तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तिने झिडकारताच तो म्हणाला, ”ठीक आहे, निकाह करू . तयार राहा.” त्याचे म्हणणे ऐकून ती अजूनच घाबरली. ती म्हणाली, ”मी लहान आहे. मी निकाह करू शकत नाही.” यावर त्याने पाच वर्षांच्या एका छोट्या मुलीला दाखवले आणि म्हणाला, ”ही माझी मुलगी आहे. तिचा पण निकाह होईल. तिच्यापेक्षा तर तू मोठीच आहेस ना?” ‘बोको हराम’ या क्रूर दहशतवादी संघटनेच्या तावडीतून सुटलेल्या एका नायजेरियन मुलीने तिची आपबिती जगाला सांगितली होती.
 
नुकतेच ‘बोको हराम’ संघटनेने बंधक बनवलेल्या २०९ बालक, १३९ महिला आणि सहा पुरुषांना सोडून दिले. अर्थात, मानवतेचा कनवळा येऊन त्यांनी बंधकांना सोडलेे नाही, तर नायजेरिया आणि लगतच्या सर्वच देशांनी ‘बोको हराम’ संघटनेवर बंदी आणली. कट्टरतावादी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रयत्न झाले. त्यातच ‘इस्लामिक स्टेट’ अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनेही नायजेरियात हातपाय पसरायला सुरुवात केली. नायजेरिया खनिज आणि नैसर्गिक संपत्तीने श्रीमंत. इथल्या जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी माणसांवर कब्जा करण्याचे तंत्र ‘इसिस’नेही अवलंबले. मग, ‘इसिस’ आणि ‘बोको हराम’चा संघर्ष सुरू झाला. दोन्हीही संघटनांचा उद्देश आणि ध्येय काय, तर म्हणे जगात शरियाची सत्ता आणायची. पण, दोन्ही दहशतवादी संघटना हा दावा करून जगभरातल्या त्यांच्या कौमवाल्यांना धोका देत आहेत, हेच खरे! कारण, नायजेरियाच्या खनिजसंपन्न प्रदेशावर कब्जा करण्यासाठी दोन्ही संघटनांचे दहशतवादी ’मुस्लीम ब्रदरहूड’ वगैरे विसरून एकमेकांचे कट्टर शत्रू झालेत.

२०२१ साली ‘इसिस’ आणि ‘बोको हराम’च्या संघर्षात ‘बोको हराम’चा तत्कालीन प्रमुख अबुबकार शेकाऊ हा ‘इसिस’च्या तावडीत सापडणार होता. तसे होऊ नये म्हणून अबुबकारने स्वत:ला बॉम्बने उडवले. आताही अपहरण केलेल्या, बंधक बनवलेल्या लोकांना ‘बोको हराम’ केवळ भीतीने सोडत आहे. अपहरण केलेले लोक आयतेच गुलाम म्हणून ‘इसिस’ला मिळू द्यायचे नाहीत, हे ‘बोको हराम’चे मत. तसेच ‘बोको हराम’चे दहशतवादी महिला, बालकांचे अपहरण करून शोषण करतात, म्हणून स्थानिक नायजेरियन त्यांच्या विरोधात होते. नायजेरियन लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण करण्यासाठी ‘बोको हराम’ बंधकांना सहज सुटू द्यायचा प्रयत्न करत आहेत.नायजेरियामध्ये २००२ मध्ये कट्टरपंथी मोहम्मद युसूफने ‘बोको हराम’ची स्थापना केली. ‘बोको हराम’चे अधिकृत नाव आहे, ”जमात-ए-हली-सुन्ना-लिदावति-वल- जिहाद.” नायजेरियन भाषेत ‘बोको हराम’ म्हणजे ’पाश्चिमात्य संस्कृती हराम आहे.’ तिचा स्वीकार करणारे सगळे हराम आहेत. त्यामुळे त्यांचा खातमा केलाच पाहिजे.

 त्यासाठी त्यांनी नायजेरियाला केंद्र केले. आधी नायजेरियात सत्ता आणायची आणि मग त्यानंतर जगभरात अशी सत्ता आणायची, असे त्यांचे स्वप्नरंजन. त्यासाठी त्यांनी लोकांचे अपहरण करणे, हा मार्ग निवडला. त्यातही हजारो मुली, महिला आणि बालकांचे अपहरण केले. कारण, या मुली-बालकांना सोडवण्यासाठी ते त्यांच्या पालकांकडून खंडणी मागू शकत होते, सरकारवर दबाव टाकून या बंधकांच्या बदल्यात तुरुंगात असलेल्या ‘बोको हराम’च्या हिंस्र दहशतवाद्यांना सोडवण्याची मागणी करू शकत. बंधकांवर लैंगिक अत्याचार करून त्यांना गुलाम बनवणे, जास्तीत जास्त अपत्य जन्माला घालण्यासाठी मुली, महिलांचा क्रूरपणे वापर करणे, बंधकांना अमली पदार्थ किंवा शस्त्रांच्या तस्करीत जबरदस्तीने भरती करायचे. आत्मघातकी हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर करायचा, तसेच पकडलेल्या लोकांचे धर्मांतरण करायचे वगैरे वगैरेंसाठी ‘बोको हराम’ मुली, बालकांचे अपहरण करायचे. असो. म्यानमारमध्ये हिंदू आणि बौद्धांची पाच हजार घरेे जाळणारे रोहिंग्या आणि हे नायजेरियातील ‘बोको हराम’चे दहशतवादी दोघेही भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर आहेत. मात्र, त्यांची विकृत हिंसा आणि दुष्ट मनोरथ एकच आहे. हे कोणते लोक आहेत? त्यांना हे असले कोणत्या कायद्याचे राज्य, जगभरात आणायचे आहे?

 
Powered By Sangraha 9.0