‘न्यास’: समाजशीलतेचा ध्यास

21 May 2024 22:16:26
Nyas

मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासह पर्यावरण आणि क्रीडासंस्कृती या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या डोंबिवलीतील ‘न्यास’ या संस्थेच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश.

डोंबिवली येथील एकमेकांचे मित्र असलेला एक छोटा विज्ञाननिष्ठ आणि फुटबॉलप्रेमी आणि ट्रेकिंगप्रेमी यांचा एक ग्रुप एकत्रित आला. त्यातील काहीजण हौस म्हणून भागशाळा मैदानावर येऊ लागले. या मैदानावर खेळता खेळता मुले जमा होऊ लागली आणि त्यांना शिकता शिकवता संघ तयार झाला. स्वतःच्या खर्चाने जिल्हास्तरीयस्पर्धा भरविणे असे करता करता त्याचे रुपांतर ‘नॅशनल युथ अकादमी फॉर स्पोट्सर्र् अ‍ॅण्ड सायन्स’ नावाच्या एका संस्थेत झाले. नंतर वैज्ञानिक दृष्टिकोन विकास हे उद्दिष्ट धरून काम सुरू झाले.शहापूर तालुक्यातील हिव येथील एका निसर्गरम्य शेतावर संस्थेचा पहिला उपक्रम पार पडला. 30 मुलांसाठी एक निसर्ग शिबीर आयोजित केले होते. या शिबिरामुळे अनेक मुले जोडली गेली. यातूनच संपूर्णपणे विज्ञानावर आधारित विज्ञान महोत्सव दरवर्षी भरविण्याचे ठरविण्यात आले. त्यात वैज्ञानिक प्रश्नमंजुषा, प्रयोगमेळावे आणि पेपर प्रेझेन्टेशन असे उपक्रम अंतर्भूत करण्यात आले. या उपक्रमांतून शाळांशी ओळख झाली.

संस्थेचे काम सुरू असताना शहरातील बर्‍याचजणांकडून ‘संस्थेचे एवढे मोठे नाव कशाला?’ अशा सूचना येऊ लागल्या. आणि मग नकळत ‘नॅशनल यूथ अकादमी फॉर स्पोर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स’ची फक्त ‘न्यास’ कशी झाली ते कळलेसुद्धा नाही.संस्थेला वर्तमानपत्राच्या माध्यमातून ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदे’ची माहिती मिळाली. काही मुले एका प्रकल्पाच्या मार्गदर्शनासाठी संस्थेत आली होती. त्यांना संस्थेने मार्गदर्शनसुद्धा केले. मुलांच्या मेहनतीने तो प्रकल्प राज्यस्तरावर निवडला गेला. संस्थेनेही या उपक्रमात झोकून देऊन काम केले. या उपक्रमामध्ये ठाणे जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक ते राज्य समन्वयक म्हणून 1998 ते 2013 ‘न्यास’ने ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदे’त विविध भूमिका निभावल्या आणि ‘न्यास’चे योगदान उल्लेखनीय राहिले. राज्यभर विज्ञान शिक्षक आणि विविध विषयातील तज्ज्ञ यांचे एक नेटवर्क तयार झाले. विविध कार्यशाळा, सेमिनार, सादरीकरण यांमुळे मुलांचे कौशल्ये विकसित झाले आणि व्यापक दृष्टिकोन तयार झाला.
 
‘न्यास’ने दरवर्षी विज्ञान महोत्सव भरविणे, डोंबिवली-कल्याण येथील शाळांमध्ये सायन्स क्लब नेटवर्क तयार करून विविध कार्यक्रम राबविणे, छोटी छोटी निसर्ग शिबिरे, ट्रेल्स आयोजित करणे, कमी खर्चातील प्रयोगातून अभ्यासक्रम हा उपक्रम जलसाक्षरता अभियानांतर्गत पिण्यायोग्य पाण्याच्या चाचण्या करून घेणे असे अनेक उपक्रम राबविले आहेत. 2004 मध्ये ‘विज्ञान प्रचिती’ नावाचे मुलांनी मुलांसाठी चालविलेले त्रैमासिक सुरू केले. हे सर्व सुरू असताना ‘न्यास’च्या क्रीडाविभागात दोन उपक्रमांनीसुद्धा जोर पकडला होता. फुटबॉल आणि ट्रेकिंग. शहरात मैदानांची सुविधा नसताना असेल त्या परिस्थितीत, कमी शुल्क घेऊन, भागशाळा मैदान आणि महापालिकेच्या क्रीडासंकुलातील मैदानात ‘न्यास’ने मुलांसाठी कोचिंग सुरू केले, शाळांना भेटी देऊन प्रशिक्षण देऊन त्यांचे संघ तयार केले. डोंबिवली ऑलिम्पिक या रोटरी क्लबच्या कार्यक्रमात फुटबॉलचे आयोजन ‘न्यास’कडे असायचे. सध्या ‘न्यास’तर्फे जवळजवळ पाच ते सहा शाळांसाठी कोचिंग दिले जाते. डोंबिवली शहरामध्ये फुटबॉलसाठी हक्काचे मोठे मैदान नाही. तरीही या परिस्थितीत ‘न्यास’ने सातत्याने संघ तयार करून मुलांना अनुभव देण्याचे काम केले. स्वीडन येथील यूथ फुटबॉल चषकासाठी येथील मुलांना सतत संधी मिळवून दिली. एवढी धडपड करूनसुद्धा खेळासाठी मैदान नसणे, ही मात्र खंत आहे.
 
2001 साली ‘न्यास’ने विविध तज्ज्ञ मंडळींना घेऊन अरण्यवाचन शिबिरे हा उपक्रम सुरू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत लहान मुलांची शिबिरे विविध राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व्याघप्रकल्प येथे शिबिरे घेऊन जात आहोत. 2006 मध्ये ‘विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञानप्रसार या स्वायत्त संस्थे’ने सहावी ते बारावी या इयत्तांमध्ये विज्ञान शिक्षणासाठी आयआयटी कानपूरच्या डॉ. एच. सी. वर्मा यांनी तयार केलेल्या भौतिक शास्त्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग या कार्यशाळा राज्यस्तरावर घ्यायच्या असा प्रस्ताव दिला. डोंबिवली जिमखाना येथे दि. 6 डिसेंबर 2006 रोजी हा दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला आणि नंतर राज्यातील नऊ ठिकाणी अशा कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानेसुद्धा प्रथम स्थानिक पातळीवर संस्थेला पथदर्शी प्रकल्प करायला सांगितला. त्याच्या यशानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शासन नियंत्रित शाळांमध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण या विषयाला मिशनचे स्वरुप देऊन या मिशनसाठी ‘न्यास’ची सहयोगी संस्था म्हणून नियुक्ती केली.
 
‘मिशन एनसीपी’ या नावाने 2016 मध्ये अत्यंत यशस्वीपणे हे प्रशिक्षण पार पडले आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील एक हजार शिक्षक लाभार्थी ठरले आणि 300 ते 500 विज्ञान शिक्षकांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून फळी तयार झाली. वर्गात विज्ञान शिकवताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती देणे ही ज्ञानरचनावादात अपेक्षित असलेली पद्धत प्रत्यक्ष वर्गात कशी वापरायची, याचे प्रशिक्षण या प्रकल्पात दिले गेले. 2017-18 या काळात महाराष्ट्रातील 14 हजार शाळांनी याचा लाभ घेतला.हे सर्व करत असताना समांतर काळात ‘विज्ञान प्रचिती’ या मासिकाचे काम, शाळांना त्यांच्या उपक्रमासाठी मार्गदर्शन लागते त्यात मदत करणे, निसर्ग अभ्यास या क्षेत्रांत चांगली सादरीकरणे तयार करणे, हिवाळी पाहुणे पक्ष्यांसाठी शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये छोटे ‘नेचर ट्रेल्स विंटर विथ न्यास’ या उपक्रमांतर्गत आयोजित करणे, हिवाळी शिबिरे असे उपक्रम सतत चालू असतात.मुंबईमध्ये काही पक्षी निरीक्षकांनी 2005 मध्ये एक छान उपक्रम सुरू केला. मुंबई बर्ड रेस यामध्ये हौशी पक्षी निरीक्षकांनी एक भाग निवडून त्यातील पक्ष्यांची लिखित नोंद करायची आणि महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये त्यांचे सादरीकरण करायचे.
 
‘न्यास’ने लहान वयोगटातील मुलांना यात उतरवायला सुरुवात केली. हौशी पक्षी निरीक्षकांना शास्त्रोक्त नोंदी ठेवायचा अनुभव मिळावा, म्हणून बक्षीस मिळविण्याचा उद्देश न ठेवता यात भाग घ्यायला उद्युक्त केले. त्याचप्रमाणे एका शहराच्या सीमेमधील पक्ष्यांची नोंद व्हावी, म्हणून त्या धर्तीवर ‘डोंबिवली बर्ड रेस’ सुरू केली. वृक्षसंपदेचीसुद्धा नोंद व्हावी, म्हणून डोंबिवली ‘ग्रीन रेस’सुद्धा सुरू केली. बर्‍याच हौशी पक्षीनिरिक्षकांचे रुपांतर तज्ज्ञ पक्षीनिरीक्षकांमध्ये झाले. याशिवाय, ‘न्यास’चे विश्वास भावे यांनी संपूर्ण ‘न्यास’ ग्रुपच्या मदतीने जगप्रसिद्ध निसर्ग तज्ज्ञ जिम कोर्बेट यांची चार पुस्तके, बीली अर्जन सिंघ यांचे टायगर हेवन हे पुस्तक ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (इछकड)च्या दोन पुस्तकांची ‘महाराष्ट्रातील महत्त्वाची पक्षी क्षेत्रे’ आणि ‘महाराष्ट्रातील संकटग्रस्त पक्षी’ ही दोन भाषांतरे इत्यादी साहित्याची निर्मिती केली.

हे सर्व करताना ‘न्यास’ने बैठका, पदांची उतरंड, निधी गोळा करणे, लांबलचक निर्णयप्रक्रिया, कार्यालये वगैरे गोष्टींत न अडकता सतत तरुणांना नेतृत्व देण्यावर भर दिला आहे. ‘न्यास’चे काम तरुण पिढीला समोर ठेवून सुरू आहे. पुढील काळातसुद्धा विज्ञान जागृती, विज्ञानाचे शालेय शिक्षण, अरण्यवाचन शिबिरे, पर्यावरण जागृती आणि क्रीडाविभागात अर्थातच फुटबॉल या क्षेत्रात सतत काम करायचे हे उद्दिष्ट आहे.हे सर्व काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे, सेवाभावी संस्था, प्रसिद्धी माध्यमे, शासन यंत्रणा या जर चांगला उद्देश ठेवून एकत्र आल्या, तर छोट्या छोट्या स्वरुपात सुरू असलेली विविध संस्थांची छोटी छोटी कामे मोठे स्वरुप धारण करू शकतात, असे ‘न्यास’चे विश्वास भावे यांनी सांगितले.
 
 

 
Powered By Sangraha 9.0