किर्गिझस्तानात ‘उम्मा’ची ऐशीतैशी

21 May 2024 21:40:30
Kyrgyzstan violence
 
आपले मूल उच्च शिक्षणासाठी परदेशात आहे, ही बाब सामान्य घरातील पालकांसाठी निश्चितच अभिमानास्पद. आपल्या मुलांबाबत जितके कौतुक पालकांना वाटत असते, त्याहून जास्त त्यांना त्यांची काळजीही वाटत असते. कारण, वृत्तपत्रांमध्ये येणार्‍या निरनिराळ्या बातम्यांमुळे त्यांना तसे वाटणे स्वाभाविकच. अशातच नुकतेच किर्गिझस्तानच्या बिश्केकमध्ये शिकणार्‍या स्थानिक आणि परदेशी विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले. यामुळे, केवळ भारतच नाही, तर पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांचे पालकही सध्या प्रचंड चिंतेत आहेत. आपल्या मुलांना मायदेशी परत आणण्याची विनंती या पालकांकडून त्या त्या राष्ट्राच्या परराष्ट्र मंत्रालयास होत आहे.

किर्गिझस्तान हे विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे एक अनुकूल ठिकाण. भारताच्या तुलनेत किर्गिझस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्त आहे आणि प्रवेशही सोपा. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील किर्गिझस्तानच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीला मान्यता देते. त्यामुळे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसह भारतीय उपखंडातील असंख्य विद्यार्थी किर्गिझस्तान येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. भारतातील सुमारे १५ हजार विद्यार्थी किर्गिझस्तानमध्ये शिकत असल्याची माहिती आहे. सोमवार, दि. १३ मे रोजी किर्गिझ आणि इजिप्शियन विद्यार्थ्यांमधील भांडणाचे व्हिडिओ शुक्रवार, दि. १७ मे रोजी ऑनलाईन व्हायरल झाले आणि यामुळे परिस्थिती बिघडत गेली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, याचदरम्यान जमावाने बिश्केकमधील वैद्यकीय विद्यापीठांच्या वसतिगृहांना लक्ष्य केले. ज्या ठिकाणी विशेषतः भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील विद्यार्थी राहतात. भारताप्रमाणेच पाकिस्तानचे साधारण १२ हजार विद्यार्थी किर्गिझस्तानमध्ये आहेत. त्यापैकी काही बिश्केकमध्ये शिकण्यासाठी गेले आहेत, तर काही किर्गिझस्तानच्या इतर शहरांमध्ये असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
 
आतापर्यंत बिश्केकमधील वैद्यकीय विद्यापीठांच्या काही वसतिगृहांवर आणि पाकिस्तानींसह आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या खासगी निवासस्थानांवर हल्ले झाले. यादरम्यान, पाच पाकिस्तानी विद्यार्थी जखमी झाले. पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान सरकार सध्या किर्गिझस्तानमध्ये उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. याशिवाय, पाकिस्तानने आपल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी केला आहे. हिंसाचाराने घाबरलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनीही देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. किर्गिस्तानमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने आपल्या विद्यार्थ्यांना सतर्क केले आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेसुद्धा विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर पडण्यास मनाई केली होती. परराष्ट्रमंत्री एस.
 
जयशंकर यांनी ट्विट करून संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने २४ तास आपत्कालीन क्रमांक जारी केला होता. एस. जयशंकर यांनी भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या वसतिगृहातच राहण्यास सांगितले आहे. त्यांनी भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत.किर्गिझस्तानमध्ये साधारणतः ९५ टक्के मुस्लीम आहेत. यामध्येसुद्धा बहुसंख्य सुन्नी मुस्लीम. वास्तविक किर्गिझ लोक पहिल्यापासून इस्लामचे अनुयायी नव्हते. इस्लाम प्रथम आठव्या शतकात किर्गिझस्तानमध्ये आला. अरब आक्रमकांनी मध्य आशियातील सर्व देश काबीज केल्यावर किर्गिझस्तानही त्यांच्या ताब्यात आला आणि येथूनच इस्लामचा प्रसार सुरू झाला.पाकिस्तान, इजिप्त आणि किर्गिझस्तान ही तीन्ही मुळात इस्लामिक राष्ट्रे. या अर्थी ‘उम्मा’चे कौतुक करणार्‍या या इस्लामिक राष्ट्रातील मुस्लीम बंधूंनी एकमेकांवर हल्ला का करावा? कारण, किर्गिझस्तानमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसह पाकिस्तानी, इजिप्तच्या विद्यार्थ्यांवरही येथील तरुणांनी हल्ला केला. त्यामुळे, किर्गिझस्तानात बिघडलेल्या परिस्थितीमुळे इथल्या तरुणांचा ‘उम्मा’ नामक संकल्पनेवर आता विश्वास राहिला नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होतो.

 


Powered By Sangraha 9.0