मुंबई (विशेष प्रतिनिधी) - घाटकोपर पूर्वेकडे विमानाच्या धडकेत जवळपास ३९ छोट्या रोहित ( लेसर फ्लेमिंगो) पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली (flamingo bird strike). वन विभागाने फ्लेमिंगोचे मृतदेह ताब्यात घेतले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे (flamingo bird strike). प्रसंगी या घटनेसाठी कारणीभूत असलेले 'अॅमेरिट्स' कंपनीचे दुबईला जाणारे EK 508 क्रमांकाचे विमान काल रात्री मुंबई विमानतळावर उतरवल्याची माहिती मिळत आहे. (flamingo bird strike)
सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घाटकोपर पूर्व विभागातील लक्ष्मी नगर, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड आणि पंत नगर भागात काही फ्लेमिंगो आकाशात खाली पडल्याचे निदर्शनास आले. यामधील काही फ्लेमिंगो जागीच मृत झाले होते. तर, काही फ्लेमिंगो अचानक आकाशात खाली पडल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांच्या धडकेत मृत पावले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार विमानाच्या धडकेमुळे फ्लेमिंगोचा थवा खाली पडला. स्थानिकांनी यासंदर्भातील माहिती वन विभागाला कळवल्यावर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभायरण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागतीच फ्लेमिंगोचे मृतदेह ताब्यात घेतले. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे आम्ही जवळपास ३९ फ्लेमिंगोचे मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती ठाणे खाडी फ्लेमिंगो अभायरण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादूरे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
विमानांना पक्षी धडकण्याच्या घटनेला 'बर्ड हझार्ड' असे म्हटले जाते. 'भारतीय वायुदल' आणि 'नागरी उड्डाण मंत्रालय' सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 'बर्ड हझार्ड' घटनांच्या तपासणीबरोबरच त्याविषयी धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी गांर्भीयाने काम करते. वायुदलामध्ये 'बर्ड हझार्ड' या विषयावर काम करण्यासाठी 'पक्षीशास्त्र सेल' आहे. प्रत्येक आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळाची याविषयावरील एक समिती आहे. 'बर्ड हझार्ड'च्या घटनांमध्ये बर्याच वेळा पक्षी विमानाच्या यंत्राला धडकून जमिनीच्या दिशेने फेकला जातो. अशावेळी त्याचे पंख किंवा रक्त यंत्रामधील पात्यांमध्ये आणि आजूबाजूला पसरते. यावरून पक्ष्याच्या प्रजातीची ओळख पटवण्यासाठी वायुदलाच्या 'पक्षीशास्त्र सेल'मध्ये गुणसूूत्र (डीएनए) चाचणीची शास्त्रीय पद्धत अवलंबली जाते. वायु दलाबरोबरच नागरी उड्डाणासाठी देशातील सर्वात व्यस्थ असणार्या मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळालादेखील 'बर्ड हझार्ड'च्या घटनांना समोरे जावे लागते. मुंबई विमानतळावरील 'बर्ड हझार्ड'च्या घटनांच्या सर्वेक्षणाचे काम 'बीएनएचएस' करते. विमातळावर वाढणार्या गवतात आणि वस्त्यांमधून विमातळाच्या सीमेकडील भागात फेकल्या जाणार्या कचर्यामुळे पक्षी त्याठिकाणी आकर्षित होत असतात. घाटकोपरच्या घटनेत मृत झालेले फ्लेमिंगो हे आपल्या स्थलांतराच्या परतीच्या प्रवासात असल्याची शक्यता आहे. त्यावेळी हा अपघात झाल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे.