मुंबई : अनेक मतदान केंद्रांवर सोईसुविधांचा अभाव असल्याने मतदानाचा टक्का कमी होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावं, अशी विनंती उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सोमवारी राज्यात अंतिम टप्प्यातील मतदान सुरु असून आदित्य ठाकरेंनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "आज सकाळी ७.३० वाजतापासून अनेक मुंबईकर मतदानासाठी तासंतास रांगेत उभे आहेत. परंतू, मतदान केंद्रांवर सोईसुविधा कमी आहेत. अनेक लोकं उन्हात उभे असून अनेकांना चक्करसुद्धा आली आहे. त्याठिकाणी पाण्याची सोय आणि पंखेही नाही. ही पुर्णपणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आम्ही तिथे काहीही करु शकत नाही. आम्ही काही प्रयत्न करायला गेलो तर आमच्यावर केस होईल," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "ते कधीच तोंडावर पडलेत आणि आता..."; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात
ते पुढे म्हणाले की, "गेले काही दिवस निवडणूक आयोगाकडून मतदान करण्याबाबत संदेश येत होते. परंतू, मतदान करत असताना अनेक मतदान केंद्रांवर मतदानाचा टक्का कमी होत आहे. लोकं रांगेत उभे आहेत. काही ठिकाणी घड्याळ घालावं की, नाही. आतमध्ये फोन न्यायचा की नाही? हा सगळा गोंधळ शेवटच्या मिनीटाला बाहेर येत आहे. मतदानाला आता काहीच तास उरलेले आहे. त्यामुळे आपण कृपया करुन मुंबईकरांची मदत करावी," अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.