अयोध्येहून आलेल्या १०१ किलो लाडवांचे जगभरातील भाविकांमध्ये वितरण
02 May 2024 18:12:05
मुंबई (प्रतिनिधी) : अयोध्येत रामनवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात पार पडली. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात राम जन्मोत्सव साजरा केला जात होता. अमेरिकेच्या 'ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर’ (ओएफआरएम) संस्थेने अयोध्येतून अमेरिकेत आणलेले १०१ किलोहून अधिक ‘रघुपती लाडू’(Raghupati Ladoo) रामनवमीनिमित्त ‘प्रसाद’ म्हणून जगभरातील भाविकांमध्ये वितरित केले गेले. ओएफआरएमचे संस्थापक प्रेम भंडारी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, कॅनडा आणि यूएई सारख्या देशांमधील प्रभु श्रीराम आणि हनुमंतांच्या भक्तांना १०१ किलो लाडू यावेळी देण्यात आले. लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्थाही अयोध्येतील राममंदिराद्वारे करण्यात आली होती. ऐतिहासिक राम मंदिराला भेट दिल्यानंतर प्रसादाचे लाडू अमेरिकेत आणून जगभरातील इतर भक्तांना ते वाटप करण्याचा विचार असल्याचे प्रेम यांनी यावेळी सांगितले.
शंभरहून अधिक पेट्या विविध देशांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत, तर काही न्यूयॉर्कमध्ये वैयक्तिकरित्या वितरीत करण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान प्रेम यांची अमेरिकेत राहूनही सनातन धर्माचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका ठरली असल्याचे मत श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सचिव चंपत राय यांनी व्यक्त केले.