"२०१९ मध्ये शिंदे मुख्यमंत्री होऊ नये यासाठी..."; संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट

19 May 2024 18:26:22

Sanjay Shirsat 
 
मुंबई : २०१९ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ नये यासाठी राऊत आणि देसाईंनी प्लानिंग केलं होतं. त्यावेळी शिंदेंच्या नावाला उद्धव ठाकरेंचा विरोध होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
संजय शिरसाट म्हणाले की, "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ नये यासाठी भाजपचा आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा विरोध होता, असा उबाठा गटाच्या प्रवक्त्याने केलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. २०१४ मध्ये सरकार आल्यानंतर भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. त्यासाठी एकनाथ शिंदेंचं नाव पुढे आलं होतं. पण त्यांच्या नावाला उद्धव ठाकरेंचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी ते पद स्विकारलं नाही."
 
हे वाचलंत का? -  ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला राऊतांचा विरोध! मातोश्रीच्या आतल्या बातम्या बाहेर आणण्याची धमकी
 
"त्यानंतर २०१९ च्या निवडणूकीनंतर आमची बैठक झाली. त्यावेळी शिवसेना-भाजपचं सरकार स्थापन करण्याचं ठरलं. पण ऐनवेळी मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा उपस्थित झाला आणि आम्हाला मुख्यमंत्रीपद देत नसतील तर इतरांसोबत जायला आमचा मार्ग मोकळा आहे, असं उबाठाच्या नेत्याने सांगितलं होतं. अखेर संध्याकाळपर्यंत भाजपच्या नेत्यांनी मातोश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांचे फोन घेतले गेले नाहीत. पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत यूती करण्याचं ठरल्यानंतर एकनाथ शिंदेंशिवाय मुख्यमंत्री पदासाठी दुसरं नाव नसणार, अशी आमची भावना होती. पण संजय राऊत, देसाई आणि आणखी २-३ आमदारांच्या संगनमताने एक डाव रचला गेला. शरद पवारांकडे जाऊन तुम्ही उद्धव ठाकरेंचं नाव सुचवा असा आग्रह त्यांना करण्यात आला. शरद पवारांचा मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही आक्षेप नव्हता. परंतू, यांनी ठाकरेंचं नाव येण्यासाठी त्यांनी प्लॅनिंग केलं होतं," असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे साहेबांना भाजपचा कोणताही विरोध नव्हता. परंतू, सत्तेसाठी शरद पवारांनी गुगली टाकली की, तुम्हाला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देतो. त्यावेळी शिंदे साहेबच मुख्यमंत्री बनतील असा सर्वांना विश्वास होता. पोलिसांनी त्यांच्या घराची रेकीसुद्धा केली होती. पण रातोरात हे चक्र फिरले आणि स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी उबाठा गटाने प्रयत्न केले. आम्ही तुम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देतो असं भाजपने सांगितल्यानंतरही जाणूबुजून हेकेखोरपणा करुन स्वत: मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उबाठा गटाचे लोक यशस्वी झाले होते. पक्षाची हानी झाली तरी चालेल पण खुर्ची मला पाहिजे, या आग्रहामुळे झालेलं हे राजकारण आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  त्यावेळी भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर...; शरद पवारांचं विधान
 
२००४ मध्ये काँग्रेसला मुख्यमंत्रीपद ही पवारांची खेळी!
 
"शरद पवारांच्या सांगण्यावरुनच हे सर्व राजकारण होत होतं. २००४ ला फक्त प्रफुल पटेलच भाजपसोबत जाणार नव्हते तर शरद पवारदेखील जाणार होते. ही खेळी यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जास्त जागा असतानाही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांना वाटलं की, बाकी लोक भाजपसोबत गेले तर आपल्याला त्यांच्यात जाता येणार नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन स्वत: अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला," असेही संजय शिरसाट म्हणाले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0