खेळाडूंचा ‘लक्ष्मण’

19 May 2024 22:11:17
 laxman
 
चांगले खेळाडू घडवित असतानाच त्यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी लढणारे क्रीडाशिक्षक लक्ष्मण इंगळे त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.
 
लक्ष्मण यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे बालपण डोंबिवलीत गेले. सुरुवातीला ते डोंबिवलीतील सागाव परिसरात राहात होते. त्यामुळे, त्यांचे प्राथमिक शिक्षण, सागाव येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर ते स्टार कॉलनी येथे वास्तव्यास आले. त्यानंतर त्यांनी सहावीपासूनचे शिक्षण रा. वि. नेरूरकर विद्यालयातून घेतले. पेंढारकर महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.ची इतिहास या विषयात पदवी संपादन केली. महाविद्यालयीन जीवनातदेखील त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना, म्हणजेच १९९१ साली त्यांना ‘भारतीय विद्यार्थी सेने’तून निवडून येण्याचा मान मिळाला होता. त्याकाळी निवडणूक पद्धतीने निवड केली जात असे. लक्ष्मण यांचे वडील शंकर हे स्टार टेक्सटाईल कंपनीत नोकरी करीत होते, तर आई अंजना या गृहिणी आहेत. सध्या त्यांचे आईवडील कोल्हापूर येथे शेती सांभाळत आहेत. लक्ष्मण यांची घरची परिस्थिती बेताची होती. घरात लक्ष्मण हे थोरले आहेत.
 
त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. लक्ष्मण यांना आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, काही ना काही काम करूनच शिक्षण घ्यावे लागत होते. पण, त्यांनी शिक्षण सोडून देण्याचा कधी विचारही केला नाही. काम करतच त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण घेतले. त्यांना प्रा. शशिकांत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी बी.पी.एड पर्यंतचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून घेतले. १९९८ मध्ये बी.पी.एड पूर्ण केल्यानंतर, लगेचच पुढे एम.ए., एम.पी.एड पर्यंतचे शिक्षण औरंगाबाद विद्यापीठातून पूर्ण केले. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ कल्याण-डोंबिवली नगरपरिषेदेत काम केले. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी मिळेल ते काम केले. त्यांनी अगदी वह्या, फटाके विकण्यापासून काम केली आहेत. लक्ष्मण यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, ते कोणत्याच कामात कधीच माघार घेत नाहीत.
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयात त्यांना नोकरी मिळाली. प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक महाजन यांचे त्यांना चांगले सहकार्य मिळाले. याशिवाय, माजी मंत्री नकुल पाटील आणि पुष्पलता पाटील यांनीदेखील त्यांना मदत केली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व माजी मंत्री जगन्नाथ पाटील, यांचेदेखील लक्ष्मण यांना वेळोवेळी सहकार्य लाभले. गेली १९ वर्षे ते क्रीडा संचालक म्हणून प्रगती महाविद्यालयात कार्यरत आहेत. याशिवाय, बारावीच्या परिक्षेत गेल्या १९ वर्षांपासून, प्रेस कंडक्टर म्हणून काम पाहात आहेत. २०१६ पासून ते पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पॉवर आणि वेट लिफ्टींगमध्ये समिती सदस्य, तसेच मुंबई विद्यापीठात २००१-०२ आणि २००२-०३ या काळात सॉफ्टबॉल संघ व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले.
 
२००४-०५ पासून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून,कनिष्ठ महाविद्यालयात काम पाहात आहेत. याशिवाय, कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ, कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ठाणे जिल्हा टेनिस हॉलीबॉलचे उपाध्यक्ष ठाणे, जिल्हा टी-२० क्रिकेट, ठाणे जिल्हा सॉफ्टबॉलचे सदस्य, ठाणे जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन, ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे सदस्य, म्हणूनही ते काम पाहात आहेत. कोरोना काळानंतर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये, खेळाडू शुल्क कमी केले जात असताना, ठाणे विभागात विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये, खेळाडूंचे शुल्क वाढवून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू होता. त्यावरून, गरीब व होतकरू खेळाडूंनी शालेय स्पर्धांमध्ये भाग घेऊ नये, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे धोरण दिसत होते.यासाठी डोंबिवलीतील सर्व क्रीडाशिक्षक एकत्र आले होत,. त्यात लक्ष्मण यांचादेखील सहभाग होता. यावेळी, शुल्क कमी करावे यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यत या संदर्भात त्यांनी पाठपुरावा केला. कनिष्ठ महाविद्यालयात ’राष्ट्रीय सेवा योजना’ या माध्यमातून गरजू व गरीब विद्यार्थ्यांकरिता, ते कार्य करत आहेत. ते ’स्काऊट अ‍ॅण्ड गाईड’ यांचे आजीवन सभासद असून, त्यातून वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभाग घेत असतात. ’कडोंमपा’ क्रीडा समिती सदस्य, म्हणून लक्ष्मण यांचा विविध खेळाच्या आयोजन व नियोजनात सहभाग असतो. निलेश शिंदे, जितेश जोशी, अमित भगत, स्वप्ना साखळकर, श्वेेता राणे यांसारखे अनेक खेळाडू घडविण्यात लक्ष्मण यांचा मोलाचा वाटा आहे.
 
सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला २००८ मध्ये खेळाचा दर्जा मिळाला होता. महानगरपालिकेला क्रीडा दर्जा मिळावा, अशी क्रीडाशिक्षकांची मागणी होती. त्यामध्ये, लक्ष्मण यांचादेखील सहभाग होता. त्यांनी आपली मागणी २००८-०९चे तत्कालीन स्थायी समिती सभापती रविंद्र चव्हाण यांच्याकडे ती मांडली. रविंद्र चव्हाण यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ठाणे जिल्ह्यातील खेळाचा दर्जा प्राप्त झालेली पहिली महानगरपालिका होण्याचा बहुमान कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला मिळाला. लक्ष्मण यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या पुढील कारकार्दीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.

Powered By Sangraha 9.0