पक्ष फुटला नसता तर मीच मुख्यमंत्री झालो असतो : छगन भुजबळ

19 May 2024 13:25:15
 
Bhujbal
 
मुंबई : त्यावेळी काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मीच मुख्यमंत्री झालो असतो, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केलं आहे. २००४ मध्ये छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्षात फूट पडली असती, असं वक्तव्य शरद पवारांनी एका मुलाखतीत केलं होतं. यावर आता भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
छगन भुजबळ म्हणाले की, "मी शिवसेना आणि भाजप सरकारच्या विरोधात विरोधी पक्षनेत्याचं काम केलं. त्यावेळी माझ्या घरावर जीवघेणा हल्लाही झाला होता. तेव्हा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो. माझी खात्री आहे की, त्यावेळी काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मीच मुख्यमंत्री झालो असतो."
 
हे वाचलंत का? -  राज्यात उद्या अंतिम टप्पातील मतदान! दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
 
"पण ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी मी पवार साहेबांसोबत न जाता काँग्रेसमध्ये थांबावं आणि विधानसभेच्या निवडणूकीनंतर तुम्हाला मुख्यमंत्रीपद देतो, असे फोन किंवा मेसेज मला येत होते. पण मी सांगितलं की, मी पवार साहेबांसोबत राहणार. त्यानंतर पुढे मी प्रांताध्यक्ष झालो आणि पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष झालेत. त्यानंतर झालेल्या निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप अशी तिरंगी लढत होती. त्यावेळी आम्ही काँग्रेससोबत गेलो आणि काँग्रेसचे जास्त आमदार असल्याने त्यांचा मुख्यमंत्री झाला आणि मी उपमुख्यमंत्री झालो," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "२००४ ला काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला याची मला काही कल्पना नाही. पण त्यावेळी काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होती, हे खरं आहे. त्यावेळी काही अडचणी असतील मला याबाबत काही कल्पना नाही," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0