काँग्रेस आणि त्यांचे समविचारी पक्ष उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी देशात मुद्दाम दरी निर्माण होईल, अशी विधाने अजूनही सातत्याने करीत आहेत. ‘भारत हे एक राष्ट्र नसून, अनेक खंडांचा भूभाग आहे,’ असा धादांत खोटा दावा संधी मिळेल तेव्हा अगदी बेमालूमपणे केला जातो. राहुल गांधी असो सॅम पित्रोदा की, डी. के. सुरेश असो अथवा के. टी. रामराव, या सगळ्या नेत्यांनी अगदी काही महिन्यांच्या फरकाने उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी देशाला तोडण्याची भाषा करणारी प्रक्षोभक, देशविरोधी विधाने केली आहेत. उद्या देशभरात पाचव्या टप्प्यातील मतदानही पार पडेल. तेव्हा, मतदारांनी पुन्हा सत्तेच्या चाव्या देश एकसंध ठेवणार्या पक्षांना द्यायच्या की, देश तोडण्याची भाषा करणार्या फाळणीवादी अराजक प्रवृत्तीच्या पक्षांना द्यायच्या, हे मतपेटीतून ठरवायचे आहे.
आपल्याच देशामधून काही राज्य फुटून चक्क एक वेगळाच देश बनवण्याची वकिली केली जाते. जोडण्याची सोडाच, हे थेट देश तोडण्याची भाषा करतात? इतके तुकडे करून पण तुमच्या मनाचे समाधान झाले नाही का? अजून देशाचे किती तुकडे करायचे आहेत? कधीपर्यंत हे कराल?” दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या संसदेमध्ये विरोधी पक्षांवर अक्षरश: कडाडले होते. कारणच तसे होते. कर्नाटक काँग्रेसचा खासदार डी. के. सुरेश याने म्हटले होते की, ”जे पैसे देशातील दक्षिणेकडील राज्यांवर खर्च व्हायला पाहिजेत, ते देशाच्या उत्तरेकडील राज्यांवर खर्च होतात. हे थांबले नाही, तर मजबुरीने आम्हाला वेगळे दक्षिण राज्य म्हणून वेगळ्या देशाची मागणी करावी लागेल.” हा डी. के. सुरेश काँग्रेसचा बंगळुरू ग्रामीण भागाचा खासदार.
इतकेच नाही तर काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा भाऊ. त्यावेळी डी. के. सुरेशच्या विधानाने राजकीय वातावरण तापले. देशाच्या अखंडतेसाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, संस्कृती संरक्षणासाठी अनादिकालापासून भारताच्या लोकांनी संघर्ष केला आहे. भारतीयत्व जपले आहे. असे असताना काँग्रेस पक्षाच्या खासदाराने सहज विधान करावे की, आम्ही दक्षिण राज्य म्हणून वेगळा देश मागू? काय शिजतेय काँग्रेसच्या आणि त्यांच्या समविचारी पक्षांच्या गोटात? कारण, गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांचे नेते दक्षिण भारत आणि उत्तर भारत कसे एकमेकांपासून वेगळे आहेत, हे सांगत सुटले आहेत. असे म्हणतात यथा राजा तथा प्रजा, तशीच इथेही गत!
या ‘इंडी’ आघाडीचा स्वयंघोषित राजा राहुल गांधीच. त्यांनीही उत्तर भारत आणि दक्षिण भारत यामध्ये कशी तफावत आहे, हे सांगण्याची एकही संधी दवडलेली नाही. उदाहरणार्थ त्यांनी म्हटले की, “उत्तर प्रदेशातली राजनीती मी अनुभवली आहे. पण, केरळची राजनीती वेगळी आहे. इथल्या लोकांमध्ये राजकीय परिपक्वता आहे. ते मुद्द्यावर बोलतात, पण दिखाऊपणा करत नाहीत.” संपूर्ण भारताचे पंतप्रधान व्हायचे स्वप्न पाहणार्या राहुल गांधी यांनी अशा प्रकारे उत्तरेकडील राज्याचे लोक आणि दक्षिणेतील राज्याचे लोक यामध्ये तुलना केली. केरळपेक्षा उत्तर प्रदेशचे लोक राजकीयदृष्ट्या अपरिपक्व हा कोणता सिद्धान्त? बरं, आता राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून निवडणुकीला उभे राहिले आहेत. त्यांचे असेच एक विधान.
त्यांना एका समारंभात एका महिलेने भारतात स्त्रियांवर होणार्या अत्याचारांबद्दल प्रश्न विचारला, तर ते म्हणाले, “भारतात स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात महिलांची परिस्थिती चांगली नाही.” आसेतुहिमाचल भारताची कौटुंबिकता एकच आहे. संविधानाने अख्ख्या भारताला जोडले आहे. संविधानात्मक कायदे सगळ्या भारतात समान आहेत. असे असताना राहुल यांनी केवळ दक्षिणेतल्या केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघातील लोकांना चांगले वाटावे म्हणून हे विधान केले असण्याची दाट शक्यता. सत्तेच्या स्वार्थासाठी दक्षिण-उत्तर भारताची फोडाफोडी करणारे राहुल गांधी, त्यांचे अनुयायीही तसेच असणार ना? हो, पण राहुल गांधी यांना भारत हा खंडप्राय देशच वाटतो, हे काही लपलेले नाही. देशाची अखंडता वगैरेंवर राहुल यांचे काय मत आहे, ते तेच जाणोत.
नुकतेच ‘भारत राष्ट्र समिती’ या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामराव याने,”उत्तर प्रदेश हा वेगळा देश असून ती एक वेगळीच दुनिया आहे,” असे विधान केले. तसेच त्याचे म्हणणे आहे की, इथल्या लोकांपेक्षा दक्षिणेतील लोक वेगळा विचार करतात. थोडक्यात, केटीआरच्या मते, उत्तर भारत हा दक्षिण भारतापेक्षा वेगळा आहे आणि दक्षिण भारताशी त्याचे काही साधर्म्य नसून तो एक वेगळा देश आहे. अर्थोअर्थी या केटीआरला असे म्हणायचे आहे की, उत्तर भारत देश असून त्यात दक्षिण भारत येत नाही. काय म्हणावे? एका राज्याचा मंत्री, एका पक्षाचा अध्यक्ष असलेल्या माणसाने भारत नावाच्या देशांतर्गत दुसर्या देशाची कल्पना करावी? उत्तर भारत, दक्षिण भारत असा भेदभाव करण्यामध्ये दक्षिण भारतातील राज्यांमधले काही प्रांतिक पक्ष एकापेक्षा एक सरस आहेत. राज्याच्या प्रांतीय अस्मिता खोट्या का होईना भडकावायच्या, त्यात जनतेला भरडायचे आणि मतांची बेगमी करायची. असले उद्योग कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू आणि केरळमधले काही प्रादेशिक पक्ष करत असतात.
‘भारत राष्ट्र समिती’ही त्याला अपवाद नाही. दक्षिण आणि उत्तर वगैरे-वगैरे भेद करणार्या केटी रामारावच्या पार्टीने मागे मात्र महाराष्ट्रात मोठी बॅनरबाजी केली होती. महाराष्ट्रामध्ये सत्तेत येणारच, असे मोठाले दावे केले होते. राज्यात प्रांतिक, भाषिक उन्माद बाळगणारे हे पक्ष देशातील इतर राज्यांत मात्र संविधानिक एकसंध राष्ट्राचा मुखवटा धारण करतात. के. टी. रामाराव यांनी उत्तरेला कितीही वेगळा देश मानला तरी त्यांच्या बहिणीने - कविताच्या बाबतीत म्हणायचे तर तिने दिल्लीच्या आप पार्टीशी हातमिळवणी केली. तीही कशासाठी तर दारू घोटाळ्यासाठी. दिल्लीमध्ये दारू परवान्यांमध्ये सहभागिता मिळावी म्हणून केटीआरच्या बहिणीने कविताने, ‘आप’ सरकारला १०० कोटींची लाच दिली. आज ती तुरुंगात आहे. चौकशी सुरू आहे. घोटाळे, भ्रष्टाचार करताना केटीआरच्या घरातल्यांना सगळे जग एक वाटते. मात्र, जिथे सत्तेची बाब येते, राजकारण येते, तिथे त्यांना उत्तर-दक्षिण भेद आठवतो.
असो. भारतीय कसे एक नाहीत, तर ते वांशिकदृष्ट्या विभागलेले आहेत, हे सांगण्यासाठी फुटीरतावादी अनेक तर्हेने प्रयत्न करतात. आर्य-द्रविड सिद्धान्त तर त्यांचा आवडता सिद्धान्त. तरी नशीब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सिद्धान्ताला लाथाडले आहे. सगळे भारतीय हे एकाच वंशाचे आहेत, असे त्यांनी सिद्ध केलेले आहे. तरीही, देशाचे तुकडे करू इच्छिणारे लोक देशाच्या प्रांतीय भौतिक भेदावरून विषमतेचे सिद्धान्त मांडत असतात. नुकतेच काँग्रेसचे आंतरराष्ट्रीय माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा म्हणालेच की, “भारताच्या पूर्व भागातले लोक चिनी दिसतात. पश्चिमेकडचे लोक अरबांसारखे दिसतात. उत्तरेकडेच गोरे आणि दक्षिण भारताचे लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात.” सॅम पित्रोदा यांनी हे विधान का बरं केले असेल? तर त्यामागचा अर्थ लावणे कठीण नाही. त्यातून सॅमला म्हणायचे आहे की, भारत हा काही एका संस्कृतीने, एका धर्माने, एका वंशाने बांधलेला देश नाही. तर, चार दिशेला चार परकीय लोकांचे वंशज आहेत. ते एक कसे असतील? सॅम पित्रोदा आणि काँग्रेस आणि राहुल गांधी आणि त्यांचे ते समविचारी लोक. यांना भारत कधी तरी कळला आहे का?
या पार्श्वभूमीवर २०२१ साली ‘प्यू इंटरनॅशनल’ने ‘धार्मिक मान्यता आणि प्रथा’ यावर राष्ट्रीय सर्वेक्षण केले होते. त्या अहवालाचा निष्कर्ष होता की, देशभरात विविध राज्यांत, विशिष्ट रीतिरिवाज, पूजापाठ यात थोडे अंतर असले, तरी त्यात साधर्म्य जास्त होते. तसेच उत्तर भारत आणि दक्षिण भारत यामध्ये खूप काही अंतर आहे, असे काहीही निष्पन्न झाले नाही. हे सर्वेक्षण उत्तर भारतातील बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगण या दक्षिण भारतीय राज्यांत केले होते. फुटीरतावादी लोक दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असा खोटा वाद रंगवतात, तेव्हा या अहवालातील निष्कर्ष काय सांगतात, हे पाहणे गरजेचे आहे. त्यानुसार, उत्तर भारतातील ९९ टक्के आणि दक्षिण भारतातील ९८ टक्के लोकांनी ईश्वरावर आस्था आहे, श्रद्धा आहे, हे मान्य केले. तसेच जीवनामध्ये धर्माला महत्त्व देता का? यावर उत्तर भारतातील ८९ टक्के, तर दक्षिणेकडील राज्यातील ६८ टक्के लोकांनी म्हटले होते की, त्यांच्या जीवनात धर्माला पहिले स्थान आहे.
पंचांग किंवा रीतिप्रमाणे मुहूर्त मानता का, यावर दक्षिण भारतातील राज्यातील ९० टक्के लोकांनी तर उत्तर भारतातील ८४ टक्के लोकांनी धर्मानुसार मुहूर्त पाळतो, हे सांगितले. थोडक्यात, दक्षिण भारत आणि उत्तर भारत या दोन्हीकडील भारतीयांची धार्मिक आणि पारंपरिक मानसिकता थोड्याबहुत फरकाने एकाच सांस्कृतिक वारशातली आहे, असे या अहवालातून सिद्ध झाले. ते अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातूनही स्पष्ट झालेच. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने सगळा भारत आनंदित झाला होता. त्यात उत्तर भारतीयच आणि दक्षिण भारतीय सगळ्यांना आनंद किंवा अभिमान वाटला वाटला. परकीय हिंसक आक्रमकांचे नामोनिशाण नष्ट करून धर्माचे प्रतीक उभारले म्हणून सगळे भारतीय एक झाले. ‘राम सगळ्यांचाच’ ही भावना भारतभर आहे. तसे का होणार नाही? जन्मभूमी अयोध्या असलेले प्रभू श्रीराम यांना हनुमानजी भेटले ते सध्याच्या कर्नाटक येथील हम्पी परिसरातच. वनवासात प्रभू श्रीरामांना जिवाभावाचे सगेसोयरे पार अयोध्या ते महाराष्ट्र ते कर्नाटक ते पार रामसेतूपर्यंत. तेव्हा प्रभू श्रीरामांचे सगळे अनुयायी एकाच सत्यनिष्ठ, न्यायनिष्ठ संस्कृतीने आणि प्रभू श्रीरामाच्या भक्तीने एकत्र आले. ती एकता त्याआधीही आणि त्यानंतरही भारतीय म्हणून अखंड आहे. विष्णू पुराणात तर भारत आणि भारतीय यांच्यावर स्पष्टच श्लोक आहे.
उत्तरम् यत समुद्रस्य
हिमाद्रेश्चैव दक्षिणम्
वर्षम् तद भारतम्
विष्णू पुराणातील श्लोक. त्या श्लोकानुसार जो देश समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला आहे तो भारतवर्ष आहे. इथे भरताचे वंशज राहतात. बाकी भारताला उत्तर भारत, दक्षिण भारत म्हणून तोडू पाहणार्या देशविघातक शक्तींना भारतीय एकदिलाने एक मताने त्यांची जागा दाखवतील. भारत हा कधीच वेगवेगळ्या खंडांचा भूभाग नव्हता, तर तो जीवंत राष्ट्रपुरुष आहे, हे सत्यच आहे.