उद्धव ठाकरेंना हिरवा झेंडा आवडतो, भगव्याला फडकं म्हणतात!

18 May 2024 15:47:36
 
Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरेंना फक्त हिरवा झेंडा आवडतो आणि भगव्याला ते फडकं म्हणतात, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यांच्या मिरवणूकीमध्ये पाकीस्तानचा झेंडा नाचवला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ञाची गरज आहे हे आता त्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट झाले आहे. ते ज्याला फडकं म्हणाले तो भगवा ध्वज आहे. ज्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये गुरु कोणाला मानावं हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी डॉ. हेडगेवारांनी सांगितलं की, प्रभू श्रीरामांचा, प्रभू श्रीकृष्णाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा ध्वजच आपला गुरु असू शकतो. त्यामुळे तो भगवा ध्वज गुरुस्थानी ठेवण्यात आला."
 
हे वाचलंत का? -  मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावरील हल्ला उबाठाच्या कार्यकर्त्यांना भोवला!
 
"पण अलीकडच्या काळात उद्धव ठाकरेंना फक्त हिरवा झेंडा आवडतो. भगव्या झेंड्याशी त्यांचा संबंध संपला आहे. भगवा झेंडा त्यांना फडकं वाटतो आणि पाकिस्तानचा झेंडा घेऊन ते नाचतात. त्यांच्या मिरवणूकीमध्ये पाकीस्तानचा झेंडा नाचवला जातो. त्यामुळे यातून त्यांची मानसिकता समजते. आज याचा परिणाम काय होईल हे आपल्या लक्षात येईलच. पण याचा दुरगामी परिणाम खूप मोठा असणार आहे, ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नाही," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या फ्लिप फ्लॉपमुळे त्यांचा मराठी मतदार त्यांच्यापासून दूर गेलेला आहे. त्याला वाटतं की, हेदेखील लांगूलचालन करतात, हे सगळं उद्धव ठाकरेंच्या आता लक्षात आलं. त्यामुळे ते मुस्लीम मतांमधून ही भरपाई काढू पाहत आहेत. वर्षानुवर्षे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांने' अशी आपल्या भाषणाची सुरुवात करायचे. उद्धव ठाकरेदेखील अशीच सुरुवात करायचे. पण इंडी आघाडीची मुंबईत सभा झाली तेव्हा सगळ्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की, हिंदू शब्द सोडून द्या. तेव्हा उद्धव ठाकरेंनी हिंदू शब्द सोडून दिला," असेही फडणवीस म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0