कॅन्सरग्रस्त बालकांनी अनुभवला रेल्वेचा समृद्ध वारसा

18 May 2024 19:47:53

railway
मुंबई, दि.१८ : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त मध्य रेल्वेने टाटा कॅन्सर रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त मुलांसाठी हेरिटेज म्युझियम टूर आयोजित केली. कर्करोगाशी झुंजणाऱ्या २९ तरुण योद्धांसाठी ही सहल आयोजित करण्यात आली होती. या विशेष मार्गदर्शित सहलीचा उद्देश मुलांना आनंद आणि प्रेरणा देणे, त्यांना एक संस्मरणीय आणि शैक्षणिक अनुभव प्रदान करणे हा आहे. मध्य रेल्वेच्या आमंत्रणावरून ८ वर्षे ते १४ वर्षे वयोगटातील कर्करोगावर उपचार घेत असलेल्या मुलांना भारतीय रेल्वेचा समृद्ध वारसा आणि इतिहासाची ओळख करून देण्यात आली. यावेळी संग्रहालय मार्गदर्शक झेवियर यांनी रेल्वेचा समृद्ध वारसाविषयक आकर्षक कथा आणि प्रदर्शनातील कलाकृतींबद्दल तथ्यांसह मुलांना माहिती दिली. या तरुणांनीही जिज्ञासा जागृत ठेवत उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी असंख्य प्रश्न विचारले आणि रेल्वेच्या ऐतिहासिक खजिन्याची माहिती जाणून घेण्यास उत्साह दाखविला. मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाने या संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी ए.के. जैन यांच्या शुभहस्ते या मुलांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.
Powered By Sangraha 9.0