आरोह वेलणकरसोबत दिलखुलास गप्पा...

17 May 2024 21:31:09
Aroh Velankar

इंजिनिअरिंग करताना लागलेलं नाटकांच वेड अभिनेता आरोह वेलणकर याला ‘रेगे’ चित्रपटापर्यंत घेऊन आलं आणि आज चित्रपट, मालिका या मनोरंजनाच्या क्षेत्रात आरोहने आपला एक चाहता वर्ग तयार केला. मराठीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर आरोह हिंदी चित्रपटसृष्टीतही झळकणार आहे. ‘चंदु चॅम्पियन’ या त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाचे औचित्य साधत, ’दै. मुंबई तरुण भारत’शी आरोह वेलणकर याने साधलेला हा सुसंवाद...

पाण्यात पडलं की, माणूस आपोआप पोहायला शिकतो. असाच जीवनाकडे देखील बघण्याचा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन असणारा आरोह वेलणकर तो कला क्षेत्राकडे कसा वळला, याबद्दल सांगताना म्हणाला की, “सध्याच्या तरुण पिढीला आम्हाला जीवनात काय करायचं आहे किंवा करिअर कशाचं घडवायचं आहे, याबद्दल फार माहिती आहे. पण, माझ्या पिढीच्या लोकांना लहानपणी मुळात करिअर म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर इतकंच माहीत होतं आणि त्यानुसार मी देखील एका सामान्य कुटुंबातील असल्यामुळे आणि अभ्यासात बर्‍यापैकी हुशार असल्यामुळे, मी इंजिनिअरिंगची वाट धरली. त्यातही ‘मॅकेनिकल इंजिनिअरिंग’मध्ये माझा नवा प्रवास सुरु झाला. पण, याच क्षेत्रात मला करिअर करायचं नाही, हे थोडंफार ठरलं होतं. इंजिनिअरिंगचा अभ्यास करता करता मला अभिनयाची गोडी लागायला लागली. मग एकांकिकेचा प्रवास सुरु झाला आणि मला कला क्षेत्रात माझं नाव पुढे न्यायचं आहे, हे मी मनाशी पक्कं केलं. पण, वडिलांनी पूर्णवेळ अभिनय करण्याची परवानगी नाकारल्यामुळे, मी पुढे अजून अभ्यास करायचं ठरवलं. नाटक करता यावं, म्हणून खरंतर मी अजून शिकण्याचा विचार केला. कारण, माझ्या मते नाटकामुळे खरा कलाकार घडतो आणि तो माणूस म्हणूनही तितकाच परिपूर्णदेखील होतो,” असेदेखील तो म्हणाला.
 
नाटकावरील प्रेमाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला की, “नोकरी करत असताना अभिनय करणं शक्य होणार नाही, याची मला खात्री होती. त्यामुळे अभ्यास करता करता आता जशी चार वर्षे अभिनयाला दिली, तसंच पुढे आणखी दोन वर्षेे करू, असं ठरवून मी पुन्हा अभ्यासाच्या तयारीला लागलो,” असं सांगत, नाटक करता यावं म्हणून ‘एमए’साठी प्रवेश घेतल्याची कबुली आरोहने दिली.आरोह वेलणकरने ‘रेगे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिला चित्रपट कसा मिळाला, याबद्दल सांगताना आरोह म्हणाला की, “इंजिनिअरिंग करता करता मी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. बक्षीसं मिळवत होतो. त्यावेळी ‘मृगजळ’ हा करंडक होता. त्याला अनेक कलाकार यायचे. त्या स्पर्धेला ‘रेगे’ चित्रपटाचे लेखक प्रवीण तरडे पण आले होते. तिथे मला पाहिल्यानंतर ‘रेगे’ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी त्यांनी मला बोलावलं. त्या चित्रपटाच्या फायनल ऑडिशनला मी आणि अभिनेता शशांक केतकर होतो आणि माझी निवड त्या चित्रपटासाठी झाली. मनोरंजन क्षेत्रात काम करताना माझा एक विश्वास आहे की, तुमच्या वाटेला जे काम येणार असतं, ते तुमच्याकडेच येतं. तसं, मला माझा पहिला चित्रपट जो अभिजित पानसे दिग्दर्शित, प्रवीण तरडे लिखित आणि महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री अशा कलाकारांसोबत काम करण्याची पहिली संधी घेऊन आला होता. कदाचित ‘रेगे’ या चित्रपटाचा मी भाग व्हावं हे विधिलिखतच होतं,ाा असंदेखील आरोह म्हणाला. पुढे त्याने शशांकबद्दल बोलताना म्हटले की, “तसंच त्याच्याही वाटेला ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका आली, जी आत्तापर्यंत मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.”
 
इतकी वर्षे कलाविश्वात काम करत असूनही काम मागायला लाज वाटत नाही, असंदेखील यावेळी बोलताना आरोह म्हणाला. “मी एक कलाकार आहे. त्यामुळे माझी कला मला लोकांसमोर सादर करायची आहे. त्यासाठी मला लोकांकडे जाऊन काम मागण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे काम मागण्यात कोणतीही लाज नसावी,” असे ठामपणे आरोह यावेळी म्हणाला. शिवाय ‘रेगे’ हा पहिला चित्रपट ज्यांच्यासोबत घडला, त्या प्रवीण तरडेंच्या ‘धर्मवीर 2’ या चित्रपटातही आरोह वेलणकर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचेही त्याने सांगितले.महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वीर दौडले सात’ या चित्रपटात मी प्रवीण तरडेंसोबत सहकलाकार म्हणून काम केलं. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचं दिग्दर्शन आणि लिखाण असलेल्या ‘धर्मवीर 2’ मध्ये काम करण्याचा उत्साह काही वेगळाच आहे, असे आनंदाने तो म्हणाला.आरोह वेलणकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात देखील झळकला होता. ‘बिग बॉस’च्या आठवणी सांगताना तो म्हणाला की, “जीवनात प्रत्येक कलाकाराने एकदा तरी अनुभव घ्यावा असं ते घर आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचाच ‘रिअ‍ॅलिटी चेक’ मिळतो.” शिवाय एक कलाकार म्हणून मी ‘रेगे’ चित्रपट केल्यानंतर जितकी प्रसिद्धी मला मिळाली नव्हती, तितकी ‘बिग बॉस’ नंतर मिळाल्याची प्रामाणिक कबुलीदेखील आरोहने यावेळी बोलताना दिली. तसेच, राखी सावंत, किरण माने यांचा ‘बिग बॉस’चा सीझन हा ‘मेंटल ट्रॉमा’ असल्याचे देखील तो म्हणाला. शिवाय सध्या कलाकारांना केल्या जाणार्‍या ‘ट्रोलिंग’वरही आरोहने बिनधास्तपणे आपलं मत मांडलं. तो म्हणाला की, “आपल्याकडे एक सर्वसाधारण विचारसरणी अंगवळणी पडली आहे की, कलाकारांची राजकीय मतं नसावीत. त्यांनी सगळ्यांपुढे हात जोडावे. पण, असं नसलं पाहिजे. कारण, आम्ही कलाकार जरी असलो तरी आमचं वैयक्तिक आयुष्य आहे आणि माझी राजकीय, सामाजिक अशा कोणत्याही विषयांवर ठाम मतं आहेत आणि मी ती मांडतो. त्यामुळे ‘ट्रोलर्स’ना जे बोलायचे ते बोलू दे, आपण ठाम असलं की बर्‍याच गोष्टी सोप्प्या होतात.”
 
स्वा. सावरकरांच्या जीवनावर आधारित ‘वीर’ ‘स्टेज शो’

अभिनयानंतर लवकरच दिग्दर्शकीय क्षेत्रातही उतरण्याचा मानस असल्याचे सांगत आरोह म्हणाला की, “लवकरच मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित एक कलाकृती घेऊन येणार आहे. ‘वीर’ असे या कार्यक्रमाचे नाव असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित हा ‘स्टेज शो’ असणार आहे. त्यामुळे सावरकरप्रेमींना पुन्हा एकदा त्यांचं जीवन एका वेगळ्या मनोरंजनाच्या माध्यमावर अनुभवता येणार आहे.
 
‘चंदु चॅम्पियन’मधून आरोह वेलणकरचे हिंद चित्रपटसृष्टीत पदार्पण

आरोह वेलणकर लवकरच ‘चंदु चॅम्पियन’ या हिंदी चित्रपटातून बॉलीवूडमध्येही अभिनयाचा प्रवास सुरु करत आहे. अभिनेता कार्तिक आर्यन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून, त्याच्या सोबत आरोह अतिशय महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कार्तिक आर्यन या चित्रपटात मराठमोळे पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते आणि भारतीय सैन्याचे अधिकारी मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारत आहे. आरोह वेलणकर याचे कार्तिक आर्यनशी या चित्रपटात विशेष नातेसंबंध दाखवले आहेत. हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘चंदु चॅम्पियन’ या चित्रपटाविषयी सांगताना आरोह म्हणाला की, “83 या हिंदी चित्रपटासाठी मी ऑडिशन दिलं होतं. पण, काही कारणास्तव मी त्या चित्रपटाचा भाग झालो नाही. कालांतराने कास्टिंग दिग्दर्शकांनी माझं काम पाहिल्यामुळे मला ‘चंदु चॅम्पियन’साठी विचारणा करण्यात आली. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता, मी होकार दिला आणि या अलौकिक चित्रपटाचा भाग झालो.”
 
मुरलीकांत पेटकर यांच्याविषयी...
 
मुरलीकांत पेटकर हे भारतीय सेनेतील एक अधिकारी होते. त्यांनी 1965 साली झालेल्या भारत - पाकिस्तान युद्धात नऊ गोळ्या झेलल्या होत्या. नऊ गोळ्या लागल्याने पुढे मुरलीकांत यांना चालणं कठीण होऊ लागलं. त्यामुळे त्यांना अपंगत्व आलं. यामुळे निराश आणि खचून गेलेल्या मुरलीकांत यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नाउमेद न होता, त्यांनी आलेल्या शारीरिक व्याधींचा सामना करायचं ठरवलं. त्यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भाग घेतला. 1972 साली या स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी भारतासाठी पॅरालिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक पटकावलं. त्यानंतर त्यांनी भारतासाठी तब्बल 127 सुवर्णपदकं जिंकली. याच पेटकर यांची यशोगाथा ‘चंदु चॅम्पियन’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक कबीर खान मोठ्या पडद्यावर उलगडणार आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0