माफी बर्‍याच गोष्टींची मागावी लागेल!

16 May 2024 20:03:14
uddhav thackeray


बाटगा अधिक कडवा असतो, या वचनाचे प्रत्यंतर सध्या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे येत आहे. “गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्यासाठी मते मागितली, ही माझी चूक झाली आणि त्यासाठी मी जनतेची माफी मागतो,” असे वक्तव्य नाशिकमधील सभेत करून उद्धव ठाकरेंनी अव्वल दर्जाचा कृतघ्नपणा काय असतो, त्याचा नमुना दाखविला आहे. पण, माफीच मागायची, तर आणखीही बर्‍याच गोष्टींसाठी त्यांना माफी मागावी लागेल. आपल्या वडिलांनी हिंदुत्वाचा प्रचार केल्याबद्दल ते माफी मागणार आहेत का?
 
निवडणुकीच्या प्रचारसभेत नेत्यांनी आपल्या कामगिरीची अतिशयोक्ती करणे समजण्यासारखे. कधी कधी न केलेल्या कार्याचीही बढाई मारली जाते, तेव्हा ते हास्यास्पद ठरतात. कारण, ‘गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत आपल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात मते मिळाली,’ अशी राज्यातील एका नेत्याची समजूत झाली. नाशिकमधील प्रचारसभेत बोलताना उरल्यासुरल्या शिवसेनेच्या गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१४ व २०१९ या लोकसभा निवडणुकांमध्ये “मोदी यांना मते देण्याचे आवाहन आपण जनतेला केले होते, त्या चुकीबद्दल आपण माफी मागतो,” असे म्हटले आहे. जणू आपण आवाहन केल्यामुळेच मोदी यांना मते मिळाली, अशी ठाकरे यांची समजूत झाली आहे. अर्थात, ठाकरे यांचे हे वक्तव्य धक्कादायक वाटत असले, तरी ते त्यांच्या विद्यमान अवताराला साजेसेच. किंबहुना, नव्याने सापडलेल्या मतपेढीशी असलेली कटिबद्धता सिद्ध करण्यासाठी त्यांना मोदी यांना शिव्या घालणे क्रमप्राप्तच (अर्थात या मतपेढीलाही उद्धव आपले नेते वाटत असतील, तरच त्याचा उपयोग होईल).

मोदी यांनीही महाराष्ट्रात सभा घेतल्या असल्या आणि नकली शिवसेनेवर टीका केली असली, तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक किंवा पातळी सोडून टीका केलेली नाही. उलट त्यांच्या आजारपणात त्यांची विचारपूसही केली होती. लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी शिवतीर्थावर मोदी यांनी ठाकरे यांचीही चौकशी केली होती.मोदींच्या उदंड लोकप्रियतेमुळे शिवसेनेचे कधी नव्हे, इतके म्हणजे १८ खासदार निवडून आले होते. त्यांना मोदी यांनी मंत्रिमंडळातही स्थानही दिले. नंतरच्या काळात या सत्तेचे अनेक लाभ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने उपभोगले. त्यासाठी मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी उद्धव ठाकरे हे त्यांनाच दूषणे देत आहेत, हा अव्वल दर्जाचा कृतघ्नपणा आहे. तो कृतघ्नपणा त्यांनी २०१९च्या ऑक्टोबरमध्येच उघड केला होता. ज्या मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेचा लाभ घेऊन शिवसेनेने ५६ आमदार निवडून आणले, त्यांच्याच पाठीत ठाकरे यांनी खंजीर खुपसला.

मोदी यांच्या कृपेने निवडून आलेल्या आमदारांच्या जोरावर भाजपलाच सत्तेबाहेर ठेऊन मुख्यमंत्रिपदाची आपली सत्ताकांक्षा त्यांनी पूर्ण केली. त्यांना मोदी नको होते, तर त्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून केवळ स्वबळावर त्यांना निवडून आणून दाखविण्याचे धैर्य ठाकरे यांनी दाखवायला हवे होते. पण, आता ‘गेल्या दोन निवडणुकांमध्ये मोदींसाठी मते मागितल्याची लाज वाटते,’ असे म्हणताना ठाकरे यांची जीभ एकदाही थरथरली नाही. इतकेच नव्हे, तर ‘निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान असणार नाहीत, भारतीय जनता पक्ष फुटेल,’ असले तारेही त्यांनी तोडले आहेत. पण, सारी जनता आपल्या इतक्याच बौद्धिक पातळीवरची आहे, या ठाकरे यांच्या समजुतीच्या दि. ४ जून रोजी ठिकर्‍या उडणार आहेत.उद्धव ठाकरे यांना माफी मागायचीच असेल, तर ती इतरही अनेक गोष्टींसाठी मागावी लागेल. तिची यादी बरीच मोठी आहे. शिवसेना पक्षासाठी दहा मिनिटेही उन्हात उभे न राहिलेल्या उद्धव यांना शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या आणि पक्ष वाढविण्यासाठी खस्ता खाल्लेल्या ज्येष्ठ नेत्यांचा जाहीर अपमान केल्याबद्दल माफी मागावी लागेल.

शिवसेनाप्रमुखांचे सर्वात विश्वासू आणि उजवे हात असलेल्या मनोहर जोशी यांची शिवतीर्थावर आपल्याच हुजर्‍यांकडून हुर्यो उडविल्याबद्दल आणि त्यांना मंचावरून खाली उतरण्यास भाग पाडल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. असाच प्रकार त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल केला होता. राज्य सरकारच्या मालकीच्या विमानातून जाण्याचा राज्यपालांना अधिकार असतो. त्यानुसार, दिल्लीस जाण्यासाठी निघालेल्या कोश्यारी यांना त्यांनी विमानातून उतरण्यास भाग पाडले होते. आपल्या चुलतभावासह अनेक निष्ठावान नेत्यांना पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. तब्बल ३० वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता असताना मुंबईतील मराठी माणसाचा टक्का घटवून त्याला दूरच्या उपनगरांमध्ये राहण्यास भाग पाडल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. मुंबई महापालिकेच्या कामांमध्ये टक्केवारी मिळवून तिला भ्रष्टाचाराची राजधानी बनविल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. इतकेच नव्हे, तर कोविडसारखी भीषण आपत्ती आलेली असताना, त्याच्या निवारणाच्या कामातही भ्रष्टाचार केल्याबद्दल ठाकरे यांना माफी मागावी लागेल.

मुंबईसह महाराष्ट्राचा विकास खुंटविण्यास केवळ ठाकरे हेच जबाबदार आहेत. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ठप्प केले आणि या प्रकल्पाचा खर्च तब्बल दहा हजार कोटी रुपयांनी वाढविल्याबद्दल त्यांना जनतेची माफी मागावी लागेल. सत्तेत असताना एकही नवा प्रकल्प महाराष्ट्रात न आणल्याबद्दल आणि नंतरच्या काळात राज्यात येणार्‍या प्रकल्पांना विरोध केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. सत्तेचा दुरुपयोग करून सामान्य माणसाचे जीवन अधिक कष्टदायक केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. देशातील अग्रगण्य उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा कट रचणार्‍यांना राजकीय संरक्षण दिल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. काही महिन्यांनी याच अंबानींच्या घरच्या लग्नात सहकुटुंब पाहुणचार झोडताना ठाकरे यांनी जराही संकोच बाळगला नव्हता!
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असो की मनसेचे राज ठाकरे असो, ते सभेतील आपल्या भाषणाची सुरुवात ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो’ या संबोधनाने करीत आणि त्यावर श्रोत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट होत असे. उद्धव ठाकरे यांनी पाठीवर हिरवी झूल पांघरल्यापासून आपल्या संबोधनातून ‘हिंदू’ हा शब्द वगळला आहे. तेही स्वाभाविकच आहे, म्हणा. कारण खरे हिंदू आणि हिंदुत्वाभिमानी लोक आता त्यांच्या सभेला जातच नाहीत. त्यामुळे त्यांना ‘हिंदू’ म्हणण्याचे कारणच उरलेले नाही. पण, दि. ४ जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर उद्धव ठाकरे यांना उपरती झालीच, तर त्यांच्या माफीनाम्यात आणखी एका मुद्द्याची भर पडेल. खरे म्हणजे, आपली कुवत नसताना राजकारणात आल्याबद्दलच जनता त्यांच्याकडून माफी मागेल!
 
 
Powered By Sangraha 9.0