"नकली शिवसेना जेव्हा काँग्रेसविलीन होईल तेव्हा मला बाळासाहेबांची आठवण येईल!"

15 May 2024 16:26:28
 
Narendra Modi
 
नाशिक : नकली शिवसेना जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला बाळासाहेबांची आठवण येईल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचारानिमित्त ते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबईमध्ये त्यांचा भव्य रोड शो होणार आहे. दरम्यान, त्याआधी गुरुवारी नाशिकमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "ज्यावेळी नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल त्यावेळी मला सर्वात जास्त बाळासाहेबांची आठवण येईल. बाळासाहेब म्हणायचे की, ज्यादिवशी शिवसेना काँग्रेस बनली आहे असं वाटलं त्यादिवशी शिवसेना संपवून टाकेन. म्हणजे आता नकली शिवसेना राहणार नाहीये. हा विनाश बाळासाहेबांना सर्वात जास्त दु:खी करत असेल असं मला वाटतं. नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या स्वप्नांचे तुकडे तुकडे करुन टाकले. अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण व्हावं, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द व्हावं, हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. ही स्वप्न पूर्ण झालीत. परंतू, नकली शिवसेनेला याची सर्वात जास्त चीड आहे. काँग्रेसने प्राणप्रतिष्ठापणेचं निमंत्रण धुडकावून लावलं. नकली शिवसेनेनेही तोच रस्ता निवडला."
 
हे वाचलंत का? -  "केवळ एका खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचं खच्चीकरण होतंय!"
 
"काँग्रेसचे लोक मंदिराबाबत चुकीची बडबड करत आहे आणि नकली शिवसेना एकदम गप्प बसली आहे. त्यांची ही पापाची पार्टनरशीप आहे. त्यांचं हे पाप संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. ज्या काँग्रेसने वीर सावरकरांना रात्रंदिवस शिव्याशाप दिले त्या काँग्रेसला ही नकली शिवसेना डोक्यावर घेऊन नाचत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा राग अनावर झाला आहे. परंतू, नकली शिवसेनेत एवढा अहंकार आला आहे की, त्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेची काहीही चिंता नाही. त्यामुळे काँग्रेसपुढे गुडघे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचं महाराष्ट्राने ठरवलं आहे," असे ते म्हणाले.
 
यावेळी त्यांनी शरद पवारांवरही नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, "इंडी आघाडीच्या एका मोठ्या नेत्याच्या वक्तव्यावरून एनडीएला किती मोठा विजय मिळणार आहे याची जाणीव होते. त्यांना माहिती आहे की, इंडी आघाडीचा मुख्य पक्ष असलेला काँग्रेसचा एवढा मोठा पराजय होणार आहे की, त्यांना विरोधी पक्ष बननंसुद्धा कठीण होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील इंडी आघाडीच्या एका नेत्याने निवडणूक संपल्यानंतर सर्व लहान पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना वाटतं की, जर ही सगळी दुकानं काँग्रेसच्या दुकानात विलीन झाले तर कदाचित विरोधी पक्ष बनण्यास त्यांना मदत होईल. त्यामुळे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार हे निश्चित आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0