मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उत्साहाचे वातावरण, मोदी-मोदीचा जल्लोष आणि जय श्रीरामच्या घोषणा देत मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. नाकात नथ, नवारी साड्या अशा मराठमोळ्या वेशभूषा आणि पारंपारिक साज आणत महिला वर्गानेही मोदींच्या रोडशोची शोभा वाढविली. मोदींच्या चाहत्यावर्गानेही त्यांच्यासाठी आणलेले शुभेच्छा संदेश उंच झळकावले. अशोक सिल्क मिल, घाटकोपर पश्चिम ते घाटकोपर पूर्व येथील पार्श्वुनाथ मंदिरपर्यंत रस्त्यावर दुतर्फा मोदींची एक झलक पहाण्यासाठी गर्दी उपस्थित होती. काही ठिकाणी थाळीनादाने मोदींचे स्वागत झाले तर महिला वर्गाने मोदींचे स्वागत औषण करत केले. मोदींच्या रॅलीत नोकरदारवर्गाही उत्साहाने सहभागी झाला.
साधारणतः मोदींच्या रॅलीची वेळ ही सायंकाळी नोकरदार आणि चाकरमान्यांच्या घरी परतण्याची होती. मात्र, कामावरुन घरी जाणारा युवावर्गही मोठ्या संख्येने यात सहभागी झाला. याच दरम्यान, एका चित्रफलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. घाटकोपरच्या सकल हिंदू समाजातर्फे "मेरी चौखटपें चलके आज मेरे प्रधान आये है, बजाओ ढोल स्वागत के, मेरे देश के प्राण आये है.", अशा आशयाच्या चित्रफलकाने लक्ष वेधून घेतले होते.
रामललाच्या मंदिर विराजमानाचे फोटोही संपूर्ण रॅलीत झळकविण्यात आले होते. घाटकोपरच्या चिंचोळ्या रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे मोदींची एक झलक पहायला मिळावी यासाठी गर्दी जमली होती. मोदींच्या रॅलीचा एक क्षण मोबाईलमध्ये टीपता यावा यासाठी प्रत्येकाची धडपड पहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाढत चाललेली लोकप्रियता, जनतेचे प्रेम पहाता, येत्या दोन दिवसांतील मोदींच्या सभेने वातावरण पूर्ण ढवळून निघण्याची ही सुरुवात आहे. मुंबईकरांनी मोदीमय मुंबईचा हा फक्त टीझर पाहिला, इंडी आघाडीने निर्माण केलेले वातावरणातील एक मळभ दूर झटकण्याचा पुरेपूर प्रयत्न मोदी करणार आहेत.
महिलावर्ग आघाडीवर
संपूर्ण रोडशोमध्ये पतंप्रधानांच्या रॅलीत महिलांना मानाचे स्थान देण्यात आले होते. मराठमोळ्या पारंपारिक वेशात स्वागत तर केलेच मात्र, फुगड्या, लेझिम आणि कोळीनृत्याद्वारे जल्लोष करण्यात आला. महिला सशक्तीकरणाचे मोदींच्या धोरणाची पोचपावती महिलांनी त्यांना शुभेच्छा देत केली.
उबाठा गटाला चोख प्रत्युत्तर
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघात उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंनी या मतदार संघात गुजराती विरुद्ध मराठी मतदार, अशी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदींच्या या रोडशोवर पडलेली मराठमोळी छाप पहाता, ठाकरेंचा हा प्रयत्न मोदींनी केवळ एका रॅलीतून हाणून पाडल्याचे दिसून आले. आपल्या लोकसभा मतदार संघातील उमेदवारासाठी मोदी मैदानात उतरल्याचे चित्र मतदारांनी पाहिल्यानंतर ठाकरेंच्या या फूट पाडून मते मागण्याची खेळी आता अयशस्वी ठरणार आहे.