पीओके : दुर्लक्षित स्वर्ग...

14 May 2024 21:35:29
pok

प्रचंड वाढलेली महागाई, वीजटंचाई आदी मागण्यांसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या जोरदार निदर्शने सुरू आहेत. आज जम्मू-काश्मीरकडे पर्यटनाच्या दृष्टीने आपण स्वर्ग म्हणून पाहतो, परंतु पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत असे म्हटल्याचे कधी समोर आले नाही. पाकव्याप्त काश्मीरसुद्धा तितकाच निसर्गसौंदर्याने नटलेला भूभाग.
  
 मात्र, असे असूनही पर्यटक तिथवर पोहोचले नाहीत. स्वर्गाची ती बाजू त्यांनी कधी पाहिलीच नाही. अशा परिसरात मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याने पीओकेतील आंदोलक वैतागले आहेत. देशांतर्गत पर्यटकांनाही पीओकेमध्ये ओळखपत्र घेऊन प्रवास करावा लागतो. याव्यतिरिक्त परदेशी पर्यटक केवळ काही ठिकाणांना भेट देऊ शकतात. ज्यासाठी परमिट आवश्यक आहे. अशा गोष्टींमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील जनता आपल्याच देशाच्या सरकारविरोधात सतत आंदोलनाची भूमिका घेत आहे. पीओकेच्या स्वातंत्र्यासाठी नारे देत आहेत.पाकव्याप्त काश्मीरला येथील स्थानिक लोक ‘आझाद काश्मीर’ म्हणून संबोधतात. १३ हजार किलोमीटरवर पसरलेल्या पीओकेची लोकसंख्या ४० लाखांपेक्षा जास्त. पीओकेचे प्रमुख राष्ट्रपती असतात, तर पंतप्रधान हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. मुझफ्फराबाद ही या दहा जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या पीओकेची राजधानी. त्यांचे स्वतःचे सर्वोच्च न्यायालयदेखील आहे. पण, प्रत्यक्षात संपूर्ण कायद्याचे राज्य हे आजही पाकिस्तानातूनच चालते. पीओकेतील तीन मुख्य भाग म्हणजे मिरपूर, मुझफ्फराबाद आणि पूँछ. याठिकाणी दोन विमानतळे असली तरी बहुतेक ती बंद आहेत.
 
पीओकेच्या अनेक भागांत भारतीय लष्कराचा पहारा आहे, जिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. पाकिस्तानमधील पर्यटक पीओकेमध्ये कुठेही जाऊ शकत असले तरी, त्यांनी त्यांचे ओळखपत्र नेहमी सोबत ठेवणे अनिवार्य आहे. परदेशी पर्यटकांच्या बाबतीत मात्र नियम खूप कडक आहेत. ते कोणत्या भागात जाणार आहेत, याची पूर्वकल्पना व आगाऊ परवानगी घ्यावी लागते.ठिकठिकाणी लष्कर तैनात असल्यामुळे फोटो काढताना पर्यटकांना खूप सावध राहावे लागते. परिसर संवेदनशील असल्याने शक्यतो अशा ठिकाणी छायाचित्रे काढता येत नाहीत. एका पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, सप्टेंबर २०२३ पर्यंत सुमारे ११ लाख २५ हजार पर्यटक पीओकेमध्ये आले होते. त्याआधी वर्षभरात त्यांची संख्या केवळ साडेतीन लाखांवर होती. याचा अर्थ अनेक वर्षांनंतर पीओकेतील पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. पाकिस्तानपासून जवळजवळ अलिप्त असलेल्या या भागात रोजगाराचे इतर कोणतेही स्रोत नाहीत. परंतु, पर्यटकांच्या येण्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होऊ लागला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मार्चच्या अखेरीस ते सप्टेंबरपर्यंत व्यवसाय सुरू असतो.

निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असूनही विमानतळे वारंवार बंद पडणे किंवा रेल्वे सेवेचा अभाव यासारख्या गोष्टी पर्यटकांचे हेतू कमकुवत करतात आणि याचाच परिणाम पुढे फूटफॉलवर होतो. परदेशी पर्यटकांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. पर्यटन विभागाच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक पर्यटक युरोप, मध्य पूर्व, थायलंड आणि मलेशियामधून येतात. पर्यटकांची संख्या आणखी वाढावी यासाठी अनेक ‘ऑफ-बीट डेस्टिनेशन्स’ तयार करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी ५० हजारांहून अधिक परदेशी पर्यटक आले होते.जम्मू-काश्मीर आणि पीओके यांच्यातील फरक पाहिल्यास सर्वप्रथम आपल्या लक्षात येईल की, जम्मू-काश्मीरचे दरडोई उत्पन्न १.२५ लाखांपेक्षा जास्त आहे, तर पीओकेचे उत्पन्न याच्या निम्म्याहून कमी आहे. भारतीय काश्मीरमधील ३० पेक्षा जास्त विद्यापीठांच्या तुलनेत पीओकेमध्ये सहा विद्यापीठे आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये २ हजार ८०० हून अधिक सरकारी रुग्णालये आहेत, तर पीओकेमध्ये २३ रुग्णालये आहेत. पीओकेमधील लोक जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि वीजकपात यासारख्या मूलभूत समस्यांमुळे त्रस्त आहेत.नुकत्याच सुरू असलेल्या निवडणुकीत ’राम मंदिर तो झांकी हैं, पीओके अभी बाकी हैं’ हा नारा सध्या चांगलाच गाजताना दिसतोय. पंतप्रधान मोदींनी ज्याप्रमाणे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण केले, त्याचप्रमाणे आता पीओकेही लवकरच भारतात सहभागी होऊन त्याचाही विकास होईल आणि तिथल्या जनतेला न्याय मिळेल, अशी आशा...
 
 
Powered By Sangraha 9.0