अनधिकृत पेट्रोल पंपाला परवानगी देणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा!

14 May 2024 18:01:43
Pravin Darekar On Ghatkopar accident

मुंबई
:  घाटकोपरच्या रमाबाई नगर येथील पेट्रोल पंपावर दि. १३ मे रोजी धुळीच्या वादळामुळे होर्डिंग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे १४ निरापराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. मुळात हा पेट्रोल पंप अनधिकृतपणे परवानग्या घेऊन उभारला आहे. जर त्या पेट्रोल पंपाला अनधिकृतपणे परवानगी दिली नसती तर तिथे हे होर्डिंगही उभे राहिले नसते आणि ही घटना घडली नसती. त्यामुळे या अनधिकृत पेट्रोल पंपाला परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ एसआयटीमार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
 
पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की, रेल्वे वसाहतीचा भूखंड होता तो पोलिसांच्या कल्याणकरिता राखीव होता. गृहखात्याची परवानगी घेऊन भूखंड हस्तांतरित करणे किंवा त्यावर परवानगी देणे या गोष्टी होणे गरजेचे होते. दुर्दैवाने अधिकाऱ्यांचे साटंलोटं असल्यामुळे विधिमंडळात मी मागणी करूनही उचित कारवाई झाली नाही. डिसेंबर २०२२ च्या अधिवेशनात मनसेचे नेते मनोज चव्हाण, संदीप कुलते यांनी तक्रार केली होती. माझ्या निदर्शनास आणून दिले होते की अशा प्रकारचा अनधिकृत पेट्रोल पंप ज्याला परवानगी नाही तो सुरू होतोय. म्हणून मी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारने चौकशी करून कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली होती. जर त्या पेट्रोल पंपाला अनधिकृतपणे परवानगी दिली नसती तर तिथे हे होर्डिंगही उभे राहिले नसते.

आज जो निरापराध १४ लोकांना जीव गमवावा लागलाय तो लागला नसता. त्यावेळी संबंधित रेल्वे आयुक्त, महसूलचे अधिकारी कोण होते आणि महापालिकेची परवानगी देणारे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना तात्काळ एसआयटीद्वारे चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि अटक करावी. होर्डिंगवाल्या मालकाला अटक कराच परंतु परवानगी देणारेही तितकेच जबाबदार आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात होणार नाहीत याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही दरेकर म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0