POK तील आंदोलकांसमोर पाक सरकारने टेकले गुडघे

14 May 2024 15:14:20

POK

 

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) ने महागाई आणि इतर मुद्द्यांवर पुकारलेला संप मागे घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेल्या अनेक दिवसांच्या हिंसाचार आणि संघर्षानंतर, जेएएसीने मंगळवार, दि. १४ मे २०२४ आपला संप मागे घेण्याची घोषणा केली. निदर्शनांदरम्यान पीओकेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत.
 
पाकिस्तानी लष्कराकडून आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर अनेक भागात मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पाकिस्तानी माध्यामांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी JAAC च्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासोबतचं पाकव्याप्त काश्मीरसाठी २४ अब्ज रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
 
वाढती महागाई आणि पाकिस्तान सरकारच्या दडपशाही विरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेकडून आंदोलन करण्यात येत होते. आंदोलकांनी भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करणारे बॅनर्स सुद्धा यादरम्यान झळकावले होते. आंदोलन थांबण्यासाठी पाकिस्तान सरकारने दडपशाही करत ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण, यामध्ये हिंसक झालेल्या आंदोलकांनी पाकिस्तानी पोलिसांना मारहाण केली. त्यामुळे आंदोलन अधिकचं हिंसक झाले होते.
 
पाकिस्तानमधील शाहबाज सरकारला आंदोलन थांबण्यात यश आले असले तरी आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा भडका पुन्हा उठू शकतो. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आमचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांवर लक्ष असून योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ असं वक्तव्य केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0