बिगर-मुस्लिम विद्यार्थांना मौलवी बनण्याचे शिक्षण; बाल हक्क संरक्षण आयोग करणार कारवाई

14 May 2024 14:20:15
 Madarsa
 
डेहराडून : उत्तराखंडमधील मदरशांमध्ये बिगर-मुस्लिम मुलांना इस्लामिक शिक्षण दिले जात असल्याचे समोर आले आहे. या मुलांची संख्या १९६ असल्याचे सांगण्यात येत आहे. काही मदरशांचे सरकारी शाळांशी संबंध असल्याचेही आढळून आले आहे. तरीही सर्व सरकारी मानकांची पूर्तता करण्यात आलेली नाही. राज्यातील या मदरशांमध्ये भारतातील अनेक राज्यांतील विद्यार्थी दाखल झाल्याचे आढळून आले.
 
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) चे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी सोमवार, १३ मे २०२४ या मदरशांची अचानक तपासणी केली. दिल्लीत जाऊन शिक्षण विभागाला नोटीस बजावण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. एनसीपीसीआर चे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी सोमवारी उत्तराखंडमधील पोलिसांसह इतर अनेक विभागांच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की डेहराडूनमध्येच अशा ३ मदरशांची ओळख पटली आहे जिथे राज्याबाहेर राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
  
प्रियांक कानुनगो यांच्या म्हणण्यानुसार या मुलांना त्यांच्या मूलभूत शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. बाहेरील विद्यार्थ्यांमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुले असल्याचे सांगितले जाते. एका मदरशात मुलांकडून नियमित फी घेतली जात होती. या मदरशाने स्थानिक शाळेशी आपला संबंध असल्याचे सांगितले. प्रियांक कानूनगो यांनी मदरशांचे शाळांशी असलेले संगनमत ही शिक्षण विभागाची चूक मानून यामागे भ्रष्टाचाराची भीती व्यक्त केली आहे.
  
प्रियांक यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर किंवा पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. या सर्व मुलांना मुफ्ती, मौलवी, काझी आणि कारी बनायचे होते. एनसीपीसीआरच्या अध्यक्षांनी सांगितले की, त्यांनी बैठकीतच यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय दिल्लीत पोहोचल्यानंतर संबंधित विभागांना नोटीसही बजावण्यात येणार आहे.
 
प्रियांक कानूनगो पुढे म्हणाले की, उत्तराखंडमध्ये असे अनेक मदरसे सुरू आहेत जे सरकारने बनवलेल्या मानकांची पूर्तता करत नाहीत. उदाहरणार्थ, त्यांनी डेहराडूनमधील ३ मदरशांची नावे घेतली जिथे ते स्वत: अचानक तपासणीसाठी गेले होते. ते पुढे म्हणाले की, सरकारी मान्यताप्राप्त शाळांमध्ये हिंदू मुलांना शिकवण्याबाबतही माहिती मिळाली आहे. काही काळापूर्वी एनसीपीसीआरला उत्तराखंडमधील मदरशांमध्ये ७४९ बिगर मुस्लीम मुलांची माहिती मिळाली होती. ताज्या आकडेवारीनुसार, मान्यताप्राप्त मदरशांमध्ये अजूनही १९६ बिगर मुस्लीम मुले शिकत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0