घाटकोपर दुर्घटना : राऊतांच्या भावाचा होर्डींग मालकाशी संबंध?

14 May 2024 12:21:36

Sanjay Raut & Sunil Raut 
 
मुंबई : घाटकोपर दुर्घटनेतील होर्डींग मालकाचा आणि संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांचा काय संबंध आहे? असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच याबाबत चौकशी करुन संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
 
नितेश राणे म्हणाले की, "घाटकोपरमध्ये होर्डींग कोसळून असंख्य निरपराध मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला. या संबंधित होर्डींगच्या कंपनीला मुंबई महापालिकेने आधीच होर्डींग काढण्याची नोटीस दिली. परंतू, या कंपनीच्या मालकाने ते ऐकलं नाही, अशी माहिती पुढे आली आहे."
 
 
 
"या कंपनीच्या मालकाचे नाव भावेश भिडे असे आहे. हा भावेश भिडे नेमका कुणाचा पार्टनर आहे. संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत आणि या भावेश भिडेचा काय संबंध आहे? भावेश भिडेला सोबत घेऊन सुनील राऊतांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत फोटो काढला होता का?, याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं. संजय राऊत रोज सकाळी उठून भ्रष्टाराचे आरोप करत पत्र लिहित बसतात. आता एक पत्र आता पोलिस आयुक्तांनाही लिहा. भावेश भिडेमुळे आणि त्याच्या पार्टनरमुळे निरपराध मुंबईकरांना काल जीव गमवावा लागला. ते होर्डींग वेळेत काढलं असतं तर आज ते जिवंत असते. त्यामुळे या दुर्घटनेत जबाबदार असलेल्या सर्वांचीच लवकरात लवकर चौकशी करुन त्यांना अटक करण्यात यावी," अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.
 
सोमवारी वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर परिसरातील होर्डींग पेट्रोल पंपावर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जवळपास १४ लोकांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. दरम्यान, या होर्डींग कंपनीचा मालक भावेश भिडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0