"ज्या बाईने बाळासाहेबांचा म्हातारा म्हटलं तिला..."; भरसभेत व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंचा घणाघात

13 May 2024 13:00:20

Raj Thackeray 
 
मुंबई : ज्या बाईने बाळासाहेबांचा म्हातारा म्हटलं तिलाच प्रक्षाचा प्रवक्ता बनवलं, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. रविवारी शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी भरसभेत सुषमा अंधारेंचा जूना व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
 
राज ठाकरे म्हणाले की, "आज निवडणूकीला काही विषयच नाही. त्यामुळे सगळेजण घाणेरड्या शिव्या देऊन एकमेकांचा उद्धार करत आहेत. वडील चोरले यावर निवडणूक सुरु आहे. फोडाफोडीचं राजकारण मला कधीच मान्य झालं नाही आणि होणारही नाही. पण आज जे आमचा पक्ष फोडला असं बोलतात त्यांनी ज्यांच्याशी आघाडी केली आहे तिथे एकमेकांकडे जरा बघा. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ७ पैकी ६ नगरसेवक खोके देऊन फोडले होते. तेव्हा काही वाटलं नाही का?," असा सवाल त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  लोकसभा निवडणूक : सकाळी ९ पर्यंत किती टक्के मतदान? वाचा सविस्तर...
 
ते पुढे म्हणाले की, "त्यांच्यासोबत शरद पवार बसले आहेत. महाराष्ट्रात शरद पवारांनीच फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा १९७८ ला काँग्रेस फोडली. त्यानंतर १९९१ ला त्यांनी छगन भुजबळांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायला लावली. पुढे नारायण राणेंना घेऊन काँग्रेसने पुन्हा शिवसेना फोडली. आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं. तुम्हाला वडिलांबद्दल एवढं प्रेम आहे तर ज्या बाईने बाळासाहेबांचा म्हातारा असा उल्लेख केला त्या बाईला तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते करता आणि वडिलांवर प्रेम आहे म्हणून सांगता. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या भुजबळांसोबत मंत्रिमंडळात बसताना लाज वाटली नाही? तेव्हा का नाही विरोध केला?"
 
"२०१९ ला उद्धव ठाकरे आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली, पण निकालांनंतर जेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की, आपल्याशिवाय भाजपचं सरकार बसणार नाही तेव्हा त्यांनी पिल्लू सोडलं की, अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं ठरलं होतं. बंद खोलीत ठरलं होतं असं ते म्हणाले. मग ते आधीच का नाही सांगितलं? विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी जेव्हा नरेंद्र मोदी आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून सांगत होते, तेव्हा का नाही विरोध केला?," असा सवालही त्यांनी केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0