इराणच्या चाबहार बंदरावर आता भारताचे नियंत्रण; पाकिस्तानवर नजर ठेवण्यास होणार मदत

13 May 2024 18:27:39
 India-Iran-Chabhar-Port
 
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील महत्त्वाचा देश असलेल्या इराणचे चाबहार बंदर भारत चालवणार आहे. यासाठी भारत आणि इराणमध्ये १० वर्षांचा करार होत आहे. भारत आणि इराणमधील या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारताचे बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल सोमवार, दि. १३ मे २०२४ इराणच्या दौऱ्यावर गेले आहेत.
 
चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. भारत अजूनही मर्यादित प्रमाणात त्याचे व्यवस्थापन करतो. नवीन करार १० वर्षांसाठी बंदर चालविण्याचा असेल. भविष्यात हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. चाबहार बंदर हे आर्थिक आणि सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
 
नवीन करारानुसार, भारत इराणच्या चाबहार बंदराचे संपूर्ण व्यवस्थापन करेल. या अंतर्गत भारत या बंदरावर होणाऱ्या सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवेल. येथे येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांच्या आणि मालाच्या हालचालींवर भारतीय कंपन्या नियंत्रण ठेवतील. भारत आणि इराणमधील हा करार १० वर्षांसाठी असेल. याआधीही चाबहार बंदर चालवण्यासाठी भारत आणि इराणमध्ये करार झाला होता.
 
मात्र, या करारानुसार चाबहार बंदरावर भारताचे मर्यादित अधिकार होते. हा करार २०१६ मध्ये झाला होता. या अंतर्गत चाबहार बंदराच्या शाहीद बेहेश्ती टर्मिनलचे संचालन करण्याची जबाबदारी भारताकडे होती. या कराराची दरवर्षी पुनरावृत्ती होते. भारत आणि इराणशिवाय अफगाणिस्तानसोबतही हा करार करण्यात आला होता.
  
इराण आधीच भारताच्या चाबहारमध्ये मोठा हिस्सा घेण्याचा प्रयत्न करत आहे. चाबहार बंदर विकसित करण्यात भारताचा मोठा वाटा आहे. चाबहार बंदर विकसित करण्यासाठी २००२ मध्ये चर्चा सुरू झाली होती. हे बंदर पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून जवळ आहे. त्यामुळे पाकिस्तानवर नजर ठेवायला या बंदराचा भारताला फायदा होईल.
 
 
Powered By Sangraha 9.0