पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेतील शाश्वत विकास हाच मास्टर प्लॅन : हेमंत सवरा

13 May 2024 22:00:43
Hemant Sawra



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेतील शाश्वत विकास हाच मास्टर प्लॅन आहे. आणि हाच प्लॅन घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहोत, असे पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनी म्हटले आहे. पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ. सवरा यांचा काय मास्टर प्लॅन आहे, हे जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ चे प्रतिनिधी सुप्रिम मस्कर यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...

महाराष्ट्रातून सगळ्यात उशीरा आपली उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे, प्रचारासाठी मोजके दिवस हातात राहिले. वसईपासून ते अगदी डहाणूपर्यंत पसरलेला हा आदिवासीबहूल मतदारसंघ. अशावेळी, मतदारांपर्यंत पोहोचताना दमछाक होत आहे का? कमी वेळात जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कसे नियोजन केले आहे? केंद्र आणि राज्यातील कोणकोणते नेते आपल्या प्रचारात सहभागी होणार आहेत?
 
पालघर लोकसभा मतदारसंघ सागरी, डोंगरी आणि नागरी या तीन विभागांत मोडतो. त्यामुळे विस्तीर्ण असा सागरी किनारा, डोंगराळ भाग आणि नागरी भाग येथे आहे. म्हणूनच वसईपासून डहाणूपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. तरीही, या भागात भाजपची संघटनात्मक बांधणी चांगली आहे. येथील संघटनात्मक बांधणी दोन ते तीन वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. त्यामुळे, उमेदवारी उशीरा जाहिर झाली असली, तरी दीड महिन्यापूर्वीच पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारी उशीरा जाहीर होऊ शकते, असे सांगून प्रचार थांबायला नको, असे सांगितले होते. त्यानुसार तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर बैठका सुरू झाल्या होत्या. यामुळे, फक्त उमेदवाराचे नाव जाहीर होणे बाकी होते, पण प्रचाराची कामे आधीच सुरू झाली होती. सोमवार, दि. १३ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर लोकसभेच्या प्रचारासाठी येऊन गेले. यासोबत शनिवार, दि.१८ मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील प्रचारात सामील होतील. याव्यतिरिक्त कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा, आ. संजय केळकर, आ. नितेश राणे हेदेखील पालघर लोकसभेच्या प्रचारासाठी येऊन गेले.
पालघर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता, भाजपचा इथे एकही आमदार नाही. याउलट शहरी पट्ट्यात बहुजन विकास आघाडी, तर आदिवासी भागात माकपचे वर्चस्व दिसून येते. ठाकरे गटाने आपल्या विरोधात भारती कामडी यांना, तर बहुजन विकास आघाडीने बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांना मैदानात उतरविले आहे. या दोघांच्या आव्हानाकडे कसे पाहता?
 
भाजपचा एकही आमदार पालघर लोकसभेत नसला, तरी यापूर्वी या मतदारसंघात चिंतामण वनगा हे तीन वेळा खासदार होते. तसेच, विष्णू सवरा वाडा, विक्रमगड, भिवंडी ग्रामीण येथून विधानसभेत सातत्याने सहा वेळा निवडून गेले होते. त्याचबरोबर, दोन वेळा आदिवासी विकास मंत्रीपद ही त्यांनी भूषवले होते. त्यामुळे बरीच विकासकामे या दोन नेत्यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात झालेली आहेत. त्यामुळे, इथली जनता सर्व विकासकामांशी परिचित आहे. त्यातच, यंदाची लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, देशाचे पंतप्रधान कोण होणार याची निवडणूक आहे. ज्यामुळे गेल्या दहा वर्षार्ंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात झालेल्या विकासकामांमुळे जनतेचा लाभ झाला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकाराच्या संघटनात्मकरित्या अडचणी पालघर लोकसभेसाठी आम्हाला नाहीत. आम्ही निश्चित सांगू शकतो की, कार्यकर्त्यांच्या आणि महायुतीच्या जोरावर पालघर लोकसभेची निवडणूक आम्ही जिंकू शकतो.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही गावे वर्षानुवर्षे दुष्काळग्रस्त आहेत. आदिवासी रोजी-रोटीसाठी स्थलांतर करीत आहेत. आजही काही भागात शिक्षणाची पुरेशी सोय नाही. निकृष्ट दर्जाचे रस्ते, अपुरी लोकल सेवा, अशा समस्यांमुळे नागरिक हैराण आहेत. अशा वेळी लोकसभेत पाऊल ठेवताना, या समस्या सोडविण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करणार आहात?
 
लोकसभेचा प्रतिनिधी हा जरी केंद्र सरकारचा प्रतिनिधी असला, तरीसुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यात नीट सांगड घालता आली पाहिजे. कारण, केंद्र सरकारचा जो निधी येतो, तो राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामांसाठी वापरला जात असतो. त्यामुळे रस्ते, पाणी, आरोग्य, लोकल सेवा अशा समस्या केंद्र-राज्य समन्वयातून मी निश्चित सोडवू शकेन. अपुर्‍या लोकल सेवेची समस्या येत्या काळात रेल्वे मंत्र्यांशी बैठका करून सोडवली जाईल. रोजी-रोटीसाठी होणार्‍या स्थलांतराचा मुद्दा लक्षात घेता, उद्योगपूरक व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला जाईल. गरजेनुसार कौशल्य असलेले कामगार निर्माण करण्यावर आम्ही भर देऊ. तसेच, डोंगरी भागात कौशल्य विकासाला चालना देऊन गृहिणींना चांगल्या उद्योग निर्मितीसाठी मदत करू. तसेच, शहरी भागात नागरिकांच्या मुलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून चांगली धोरणे बनवून काम करण्याचा प्रयत्न करू.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘गॅरेंटी’वर महायुतीचा प्रत्येक उमेदवार मतदारांना सामोरा जातो आहे. महायुतीचा घटक म्हणून मोदींची विकासाची गॅरेंटी पूर्ण करण्यासाठी आपला हातभार कशाप्रकारे असेल? पालघर लोकसभा मतदारसंघासाठी आपण काही व्हिजन आखले आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाची गॅरेंटी दिलेली आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षांत केलेली कामे पाहता, त्यांना विजयाचा आत्मविश्वास आहेच. परंतु, सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास वाढविला आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावरच त्यांनी पुढच्या २५ वर्षांच्या विकासाचा आराखडा तयार केलेला आहे. म्हणून, त्यांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारता’ची संकल्पना मांडलेली आहे. जी शाश्वत विकासासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे ही संकल्पना सर्व घटक पक्षांसोबत राबविताना निश्चित आनंद होईल.




Powered By Sangraha 9.0