दिलीप प्रभावळकरांचे रंगभूमीवर पुनरागमन; रंगणार ‘पत्रा पत्री’चे प्रयोग

13 May 2024 18:13:58
dilip prabhavalakr 
 
 
मुंबई : नाटक, चित्रपट, मालिका या मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा रंगभूमीकडे परतले आहेत. ‘आरण्यक’ या नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी दिलीप प्रभावळकर रंगभूमीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले असून त्यांना ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांची साथ लाभली आहे. दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) लिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाच्या प्रयोगाचे निमित्त साधत तो पुन्हा रंगभूमीवर येणार आहेत.
 
दिलीप प्रभावळकर म्हणाले की, ‘समाज माध्यमांमुळे पत्रलेखन करणं हल्ली कमी झालंय. पत्रलेखनामधील ओलावा आणि आपलेपणाची अनुभूती रसिकांना देण्यासाठी ‘पत्रा पत्री’चा प्रयोग करण्याचं ठरवलं. ‘अक्षर दिवाळी अंक’, ‘इत्यादी’ अशा प्रकाशनांमध्ये त्यावेळी मी लिहिलेली ही पत्रं प्रसिद्ध झाली होती. त्या पत्रांमधून त्यावेळच्या घटनांवर मार्मिक टिपणी केली आहे. प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीचं लेखन या पत्रांमध्ये आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. अशा पाच कथा आम्ही अभिवाचनासाठी निवडल्या आहेत.’ तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा बनून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचं अभिवाचन करणार आहेत. या ‘दृक आविष्कारा’चे दिग्दर्शन विजय केंकरे करणार असून रंगावृत्ती नीरज शिरवईकर करणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0