सर्जिकल स्ट्राईकविषयी काँग्रेसचा संशय कायम; तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचीही टिप्पणी

11 May 2024 17:28:09
revanth reddy
 
नवी दिल्ली :पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने खरोखरच सर्जिकल स्ट्राईक केला की नाही, याविषयी शंका असल्याची टिप्पणी काँग्रेस नेते आणि तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे.
 
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. रेवंत रेड्डी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात सांगितले की, सर्जिकल स्ट्राईक खरोखर झाला होता का, याविषयी अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. केंद्र सरकारने आजपर्यंत पुलवामा हल्ल्याचा खुलासा केलेला नाही. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हल्ल्यात वापरलेले स्फोटक कुठून आले आणि त्याचा तपास का केला गेला नाही, असा सवाल त्यांनी सरकारला केला.
 
मुख्यमंत्री रेड्डी यांच्या वक्तव्यावर भाजप नेते बंडी संजयकुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, काँग्रेसला एक दिवस पाकिस्तानच्या एका वृत्तपत्रातून प्रशंसा मिळाली. त्यानंतर आज काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेस पुन्हा लक्ष्य केले आहे. हैदराबादमधील मक्का मशीद, दिलसुखनगर, लुंबिनी पार्क बॉम्बस्फोटांना जबाबदार असलेल्या काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय सुरक्षेविषयी बोलू नये. तेलंगणाचे मुख्यमंत्री राजकीय फायद्यासाठी भारतीय लष्कराच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह उभे करतील अशी अपेक्षा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0