हिंदू नेत्यांना धमकावणाऱ्या मोहम्मद अलीला बिहारमधून अटक!

11 May 2024 16:35:42
gujarat police arrested mohammed ali

नवी दिल्ली : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि हिंदू सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांच्यासह अनेक नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मोहम्मद अलीला गुजरात पोलिसांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथून अटक केली आहे. त्याचे पाकिस्तानशी संबंध असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तो पाकिस्तानातील एका व्यक्तीसोबत व्हॉट्सॲप ग्रुपशी जोडला गेला होता. गुजरातचा मौलाना सोहेल खानही याच गटात होता.

हिंदू नेत्यांना धमकावल्याप्रकरणी सूरतच्या विशेष शाखेच्या पथकाने २४ वर्षीय मोहम्मद अली उर्फ ​​शहनाज याला त्याच्या घरातून पहाटे २ वाजता अटक केली आहे. मोहम्मद अली मुझफ्फरपूरच्या सक्रा पोलीस स्टेशन हद्दीतील सक्रा चक अब्दुल्ला गावात लपून बसला होता. त्याला न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्याच्या प्रक्रियेत गुजरात पोलीस सध्या गुंतले आहेत.

मोहम्मद अली पाकिस्तानी संघटनांच्या सतत संपर्कात होता, असे बोलले जात आहे. तो पाकिस्तानातील डोगर या तरुणाशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कनेक्ट झाला होता. त्यांचाही एक गट होता. गुजरातचा मौलाना सोहेल खानही याच गटाशी संबंधित होता. मौलाना सोहेलच्या अटकेनंतर गुजरातच्या विशेष शाखेचे पथक मुझफ्फरपूर येथील साक्रा येथे पोहोचले होते.

पोलिसांनी मोहम्मद अलीकडून मोबाईल जप्त केला आहे. तो नेपाळच्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सॲप वापरायचा आणि त्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हिंदू देवदेवतांची अनेक संपादित छायाचित्रे आणि व्हिडिओ आढळून आले आहेत, जे आक्षेपार्ह आहेत. त्याच्यावर सुरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अली ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ कॉल करून लोकांना धमकावत असे. तो ज्या नेत्याला धमकावू इच्छित होता त्याचा नंबर एका खास ग्रुपमध्ये जोडायचा आणि ग्रुप व्हिडिओ कॉल करायचा. त्यानंतर तो व्हिडिओ कॉल करून धमक्या देत असे. या धमक्यांमध्ये खुनाच्या धमक्यांचाही समावेश होता. अनेक हिंदू नेत्यांना धमक्या दिल्याचा आणि कट रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

अलीचा जन्म नेपाळमध्ये झाला असून तो गेल्या २३ वर्षांपासून तेथे राहत होता, असे सांगण्यात येते. तो तिथे ओळख लपवून राहत होता. तो बिहारमध्ये येत-जात राहतो. हिंदुत्ववादी नेता उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मौलाना सोहेल अबुबकर तिमोल याला अटक केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मोहम्मद अली याला नेपाळमध्ये शहनाज या नावाने ओळखले जाते.




Powered By Sangraha 9.0