पश्चिम रेल्वेने महिनाभरात केली २० कोटींची दंडवसुली

11 May 2024 18:24:42

wetern rail


मुंबई, दि.११:प्रतिनिधी 
अनधिकृतरित्या आणि विनातिकीट लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येते आहे.याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल रेल्वेमध्ये तिकीट तपासणी मोहीम सातत्याने राबवली जात आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल २०२४ मध्ये अनेक तिकीट तपासणी मोहिमेद्वारे २०.८४ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे, ज्यामध्ये केवळ मुंबई उपनगर विभागातून ५.५७ कोटी इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, एप्रिल २०२४ मध्ये बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह २.९४ लाख तिकीट विहीन/अनियमित प्रवाशांच्या शोधातून २०.८४ कोटी वसूल करण्यात आले. तसेच, एप्रिल महिन्यात, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ९८ हजार प्रकरणे शोधून ५.५७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल २०२४मध्ये ४००० हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे. याद्वारे रु.१३.७१ लाखांचा दंड वसूल केला.

या व्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेने “BATMAN 2.0” तिकीट तपासणी मोहीम देखील आयोजित केली होती. या मोहिमेचा उद्देश रात्रीच्या वेळी अनधिकृत तिकिट प्रवासावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना विना तिकीट प्रवास करण्यापासून किंवा उच्च वर्गात प्रवास करण्यापासून, विशेषतः रात्रीच्या वेळी परावृत्त होईल. या उपक्रमांतर्गत, बॅटमॅन पथकाने ०३/०४ आणि ०४/०५ मे २०२४च्या मध्यरात्री ३.४० लाख रुपयांचा दंड वसूल केला. पश्चिम रेल्वेने सर्वसामान्यांना योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0