डोळस व्यक्तींचा दृष्टिकोन बदलणारा ‘श्रीकांत’

10 May 2024 21:41:08
Srikanth Movies

जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी
सत्वर. जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर.

या ओळी खर्‍या अर्थाने ज्यांना लागू होतात ते म्हणजे भारतातील पहिले अंध उद्योगपती श्रीकांत बोल्ला. दृष्टी असूनही बर्‍याचदा आपल्याला डोळसने बर्‍याचशा गोष्टी दिसत नाहीत किंवा आपण त्यांच्याकडे कानाडोळा करतो. पण, जन्मत: अंध असलेल्या श्रीकांत यांनी कधीच अंध असल्यामुळे ‘माझ्याकडून एखादी गोष्ट पूर्ण होणार नाही’ हा नकारात्मक दृष्टिकोनच बाळगला नाही. देशातील अनेक अंध मुलांना जगण्याचे, शिकण्याचे नवे स्वप्न पाहायला शिकवणार्‍या श्रीकांत बोल्ला यांची प्रेरणादायी गोष्ट तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ’श्रीकांत’ या चित्रपटात दाखवली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल...
 
जन्मत: आपल्या बाळात कोणतंही व्यंग असेल, तर पुढे त्या बाळाचे भविष्य काय असणार, या विचारातच आई-वडील अगदी खचून जातात. त्यातही घरची आर्थिक बाजू अधिक कमकुवत असेल, तर त्या व्यंग घेऊन जन्मलेल्या मुलाचं जगणंदेखील नकोसं होतं. श्रीकांत यांच्या बाबतीत काहीसं असंच झालं. आंध्र प्रदेशमधील मछलीपट्टम या लहानशा खेडेगावत श्रीकांत यांचा जन्म झाला. आईवडील दोघेही लोकांच्या शेतात राबून दोन पैसे कमवणारे. अशात घरात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा जन्मल्यामुळे वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. भविष्य अगदी सप्तरंगी दिसत होतं. पण, दुर्दैवाने त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचे संपूर्ण जीवनच बेरंगी असणार होते. जन्मत:च अंध असल्यामुळे, त्या मुलाचे संगोपन करणे कसे चुकीचे आहे, याची जाणीव काहींनी पदोपदी श्रीकांत यांच्या पालकांना करवून दिली. मात्र, आपल्या मुलाला जगवण्याचा आणि त्याला शिकवण्याचा ध्यास श्रीकांतच्या पालकांनी घेतला आणि भारताला पहिला अंध उद्योगपती मिळाला.

आजही समाजात अंध, मुका, बहिरा किंवा कोणतेही इतर शारीरिक व्यंग असल्यास ते केवळ भीक मागू शकतात, याच नजरेने त्यांच्याकडे पाहिले जाते. श्रीकांत या चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांचा अंध व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. आजवर अनेक चरित्रपट प्रदर्शित झाले, पण जीवंतपणी एखाद्या व्यक्तीची संपूर्ण जीवनकहाणी जी अतिशय प्रेरणादायी आहे, पण तितकाच त्यांचा संघर्ष आव्हानात्मक असूनही, त्याची मांडणी अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने करण्यात दिग्दर्शक तुषार यांना यश नक्कीच आले आहे.

श्रीकांत यांना लहानपणापासूनच विज्ञान या विषयाची विशेष रुची. त्यामुळे दहावीनंतरचे शिक्षण विज्ञान शाखेत करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, अंध मुलांसाठी भारताच्या शिक्षण व्यवस्थेत तशी तरतूद नसल्याकारणाने त्यांना कोणतेही महाविद्यालय विज्ञान शाखेत प्रवेश देण्यास नकार देत होते. त्यावेळी श्रीकांत यांनी न घाबरता थेट शिक्षण संस्थेलाच कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडले. त्यांनी ती लढाई कशी लढली, याची मांडणी अतिशय उत्तमरित्या दिग्दर्शकांनी मांडली आहे. आता केवळ अंध असल्यामुळे त्यांच्या जीवनातील संघर्ष दाखवून पुढे त्यांनी अंध लोकांसाठी नोकरीच्या संधी कशा उपलब्ध करुन दिल्या. इेश्रश्ररपीं खपर्वीीीीूं कशी उभी राहिली? भारताचे माजी पंतप्रधान डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी श्रीकांत यांच्या या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक कशी केली, या सगळ्या घटनांचे अतिशय विचारपूर्वक सादरीकरण करण्यात दिग्दर्शक, लेखक यांना यश आले आहे. विशेष म्हणजेस, केवळ श्रीकांत यांची सकारात्मक बाजू किंवा त्यांचा केवळ संघर्षच न दाखवता, मिळालेल्या यशामुळे त्यांचा पाय थोडाफार कसा डगमगला होता, ती बाजू देखील धाडसाने दाखवण्यात आली आहे.

’श्रीकांत’ या संपूर्ण चित्रपटाचेच कौतुक यासाठी करावेसे वाटते, कारण सामान्य माणूस म्हणून एखाद्या अंध व्यक्तीला सिग्नलवर पाहिल्यानंतर जो पहिला विचार आपल्या मनात येतो, तोच या चित्रपटातही दिग्दर्शकाने तंतोतंत दाखवला आहे. मुळात अंध व्यक्तींना किंवा व्यंग असलेल्यांना आपल्या दयेची नाही, तर मदतीची किंबहुना ते देखील आपल्यासारखे आणि आपल्यातले आहेत, याची आपण त्यांना जाणीव करुन द्यावी, अशी अपेक्षा असते. अंध व्यक्तींसाठी नोकरीच्या संधी उपबल्ध करुन देणं, ज्या डोळस माणसांना जमलं नाही, ते काम त्यांच्यातील एका व्यक्तीने अगदी जिद्दीने करुन दाखवलं. केवळ नोकरीच नाही, तर कायद्याशी लढून अंध व्यक्तींना विज्ञान शाखेत शिकण्याचा मार्गदेखील त्यांनी मोकळा करुन दिला. तसेच, भारताने जर श्रीकांत यांना शिक्षण नाकारले असले, तरीही परदेशातील विद्यापीठांनी श्रीकांत यांची किंमत समजून, त्यांना दिलेल्या संधीतून एक छुपा संदेशदेखील या चित्रपटाने देऊ केला. आयुष्यात कोणतीच गोष्ट असाध्य होणारी नसते; फक्त आपल्याला योग्य साथ देणारे शिक्षक, पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे हितचिंतक असतील, तर आपण अशक्य गोष्ट शक्य नक्कीच करुन दाखवू शकतो. ‘श्रीकांत’ चित्रपट पाहिल्यानंतर श्रीकांत हे जरी अंध असले तरीही उद्योग क्षेत्रात त्यांनी घेतलेली उंच भरारी आपल्याही पंखांत बळ देऊन जाईल, हे नक्कीच.

चित्रपटात श्रीकांत बोल्ला यांची भूमिका अभिनेता राजकुमार राव यांनी साकारली असून, केवळ दणकट शरीरयष्टी, अ‍ॅक्शन सिन देणारा कलाकारच ‘ग्रेट’ असतो, ही विचारसरणी पुसून टाकत, एखाद्या भूमिकेत स्वत:ला झोकून देऊन काम करणं म्हणजे काय असतं, याचं उत्तम उदाहरण त्यांनी तयार केले आहे. याशिवाय ज्योतिका, शरद केळकर यांनी देखील अप्रतिम काम केले आहे. खर्‍या अर्थाने राजकुमार राव श्रीकांत यांचं जीवन या चित्रपटाच्या निमित्ताने जगले आहेत, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तसेच, ज्या वडिलांनी जन्मल्यानंतर श्रीकांत यांना जीवंतपणी मारुन टाकण्याचा विचार केला होता, त्याच श्रीकांतच्या मनातील ‘पापा कहते हैं बडा नाम करेगा’ हे पार्श्वगीत अधिक आनंद देत आणि प्रसंगी डोळ्यांत अभिमानाने अश्रूदेखील आणते. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत येणारे मारधाड करणारे, प्रेमपट, भयपट या चित्रपटांच्या यादीत ‘श्रीकांत’सारखा चित्रपट नक्कीच वरचढ ठरणारा आहे, यात तिळमात्र शंका नाही.


चित्रपट : श्रीकांत
दिग्दर्शक : तुषार हिरानंदानी
कलाकार : राजकुमार राव, ज्योतिका. अलाया एफ, शरद केळकर, भरत जाधव
रेटींग :



Powered By Sangraha 9.0