नवी मुंबई विमानतळाची गतिशील ‘उडान’

09 Apr 2024 20:46:18
navi mumbai airport



मुंबई महानगर क्षेत्रासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला भरारी देणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ. सध्या या विमानतळाचे बांधकाम वेगाने सुरु असून, पुढील वर्षीपर्यंत या विमानतळाचा पहिला आणि दुसरा टप्पा कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानिमित्ताने या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या आजवरच्या बांधकाम प्रगतीचा घेतलेला हा सर्वंकष आढावा...

नवी मुंबईतील विमानतळ हा देशातील एक अति- महत्त्वाचा प्रकल्प. पनवेलजवळ उभा राहणारा हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प. मुंबईतील सध्याच्या सहार विमानतळाची क्षमता परिपूर्णतेच्या पलीकडे पोहोचली आहे. तसेच शीघ्रगतीने होणारा मुंबई महानगराचा विकास आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला मोठे आव्हान ठरणार असल्याने, प्रचंड क्षमतेच्या नवी मुंबई विमानतळाला फार मोठे स्थान प्राप्त झाले आहे. ‘सिडको’च्या विमानतळ वाहतूक विभागाच्या सीजीएम एस. विजयकुमार यांच्यासोबत केलेल्या चर्चेतून या प्रकल्पाचे महत्त्व अधिक विस्ताराने अधोरेखित झाले.

नवी मुंबईचा विमानतळाचे काम १९९७ पासून नियोजित होत आहे. या विचारांना गती येऊन अखेरीस २००७ मध्ये मुंबई विमानतळावरचे काम विभागण्याकरिता प्रकल्पाचा संकल्प केला गेला. या विमानतळाच्या प्रकल्पाबरोबर नवी मुंबईतील विमानतळाजवळील ‘नैना’सारखी अनेक नगरे पण नियोजित केली जात आहेत.


प्रकल्प आणि मंजुर्‍या

या प्रकल्पाला पर्यावरण, वन, सागरी किनार्‍याजवळील संवेदनशील विभाग, संरक्षण विभाग, खारफुटी विभाग इत्यादी सर्व खात्यांकडून काही अटींनुसार हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. ‘डीजीसीए’ने विमानतळाच्या स्थानावरील सर्व सेवावाहिन्या व केबल्स योग्य ठिकाणी बदलण्याबाबत मंजुरी मिळविली आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फेब्रुवारी २०१८ मध्ये करण्यात आले.

या विमानतळ प्रकल्पाची केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जानेवारीमध्ये भेट दिली. त्यावेळी ‘नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ (छचखअङ) कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यासोबत घेतलेल्या बैठकीनंतर सिंधियांनी स्पष्ट केले की, हे विमानतळ दि. ३१ मार्च, २०२५ मध्ये कार्यान्वित होऊ शकेल. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कामाची प्रगती लक्षात घेता, दि. ३१ मार्च, २०२५ पर्यंत मात्र या विमानतळाचा पहिला व दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी नक्की खुला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विमानतळाच्या पहिल्या दोन टप्प्यांबरोबर एक टर्मिनल आणि एक धावपट्टी सुरू होऊ शकेल. तसेच वर्षाला दोन कोटी प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या दोन टप्प्यात आहे, असेही सिंधिया म्हणाले. या प्रकल्पाचे एकूण पाच टप्पे होणार आहेत. पुढील तीन टप्प्यात चार टर्मिनलचे नऊ कोटी प्रवासी क्षमता असणारे हे विमानतळ असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.


जलवाहतुकीने जोडणार नवी मुंबई विमानतळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुकीने जोडण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. अलीकडेच झालेले अटल सेतूचे लोकार्पण हा याच आखणीचा भाग असल्याचे सिंधिया यांनी स्पष्ट केले. नेरळ-उरण रेल्वेस लागूनच हा विमानतळाचा प्रकल्प असून, या विमानतळाच्या तिन्ही बाजूस मेट्रोची आखणीही अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय कुलाबा-अलिबाग-विमानतळ अशा मार्गावर जलवाहतुकीचेही नियोजन केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.


देशात आणखी ७५ नवी विमानतळे

देशांतर्गत विमान प्रवासाची मागणी दिवसागणिक वाढत असून, कोरोना पूर्व काळातील १५ कोटी विमान प्रवाशांचा आकडा आपण नुकताच गाठला आहे, अशी माहिती हवाई वाहतूक मंत्री सिंधिया यांनी दिली होती. पुढील पाच वर्षांत ही संख्या ३० कोटी प्रवाशांच्या घरांत असेल, असेही ते म्हणाले होते. पुढील दहा वर्षांत संपूर्ण देशात ७५ नवी विमानतळे उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे झाल्यास देशात एकूण २०० विमानतळे कार्यान्वित होतील.


नवी मुंबई विमानतळ अनेक मार्गांशी संलग्न होणार

हे विमानतळ ‘मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी’ प्रदान करणारे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असेल. या आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते व रेल्वे आणि मेट्रोची संलग्नता असेल, तर भविष्यात जलमार्गाचा पर्यायसुद्धा उपलब्ध केला जाणार आहे.


विमानतळाची कनेक्टिव्हिटी

सध्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (मुंबई-पुणे महामार्ग), सायन पनवेल मार्ग, शिवडी-चिर्ले सागरी सेतू, अमरा मार्ग, पाम बीच रोड, ठाणे-बेलापूर मार्ग, सांताक्रुझ- चेंबूर मार्ग, पश्चिम उपनगरे, दक्षिण मुंबई, इस्टर्न एलिवेटेड फ्रीवे हे मार्ग या विमानतळाला जोडले जाणार आहेत. खारकोपर-उरण मार्गावरील तरघर रेल्वे स्थानक विमानतळाच्या जवळ आहे. तसेच मेट्रोचे तीन मार्ग विमानतळाला जोडले जाणार आहेत.

या विमानतळ प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पावर रुपये १८ हजार कोटी खर्च होणार आहेत. पहिला टप्पा डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु, त्याचा व्यावसायिक वापर मार्च २०२५ पासून होईल. २०४० पर्यंत या विमानतळाचे पाचही टप्पे कार्यान्वित होतील, असा अंदाज आहे.

या विमानतळावर समांतर दोन धावपट्ट्या असतील. या विमानतळावर आगामी नोएडा विमानतळाप्रमाणे स्विन्ग गेट्स असतील. त्यामुळे एकाच प्रवेशद्वारातून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाण हाताळण्याची विमान कंपन्यांना शक्य होणार आहे.
 
नियोजित टर्मिनल्स

पश्चिम दिशेला टर्मिनल्स टी१, टी२ व टी३ असतील. पूर्व दिशेला टी४ असेल. एकावेळी विमानतळावरील पार्किंग जागेमध्ये ५ हजार, ५०० वाहने पार्क होऊ शकतील.

टर्मिनलची प्रवासी क्षमता पुढीलप्रमाणे असेल. टी १ (२ कोटी); टी २ (३.५ कोटी), टी ३ (२ कोटी), टी ४ (२ कोटी), एकूण क्षमता (९.५ कोटी).


६० जेट्सच्या पार्किंग सुविधा

खासगी विमानांसाठी या भागात मोठी मागणी असल्यामुळे पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात ६० जेट विमानांच्या पार्किंगची सोय असेल. मुंबई व नवी मुंबई विमानतळासाठी संयुक्त हवाई ऑपरेशन्स चालवण्याची सरकारी विमानतळ प्राधिकरणाची योजना आहे.
नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्याचा कालावधी व विमानतळाची वाहतूक-क्षमता
पुणे (१२० मिनिटे), ठाणे (४५ मिनिटे), मुंबई (६० मिनिटे), अलिबाग (९० मिनिटे).

दिल्ली व मुंबई हे दोन्ही विमानतळे २००५ मध्ये खासगी कंपन्यांकडे व्यवस्थापनासाठी सोपवण्यात आली. दिल्ली विमानतळावरून २००९ मध्ये सुमारे सात कोटी प्रवाशांची वाहतूक होत होती, तर मुंबई विमानतळाची सर्वोच्च हवाई वाहतूक ४.८ कोटी होती. त्यामुळे भविष्यात नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाले, तर मुंबई व नवी मुंबई विमानतळांची संयुक्त क्षमता ६.५ कोटी होऊ शकेल.


अत्याधुनिक तपास यंत्रणा

दोन लाख चौ. मीमध्ये पसरलेल्या टी१चे डिझाईन लीडगोल्ड स्टॅण्डर्डनुसार केले जाणार आहे. प्रवाशांच्या तपासणीसाठी बॉड स्कॅनर्स आणि सामानाच्या तपासणीसाठी ‘३ डी सीटीएक्स’ (कम्प्युटर टोपोग्राफी एक्सरे) यांचा वापर केला जाणार आहे.


बांधकामाचे टप्पे

डिसेंबर २०२४ - दक्षिण दिशेतील रन-वे आणि टर्मिनल टी१ कार्यरत होतील.
मार्च २०२५ - उत्तर दिशेकडील रन-वे आणि टर्मिनल टी२ चे बांधकाम सुरू होईल. या कामाची अंतिम मुदत २०२८ असेल. टी१ व टी२ दरम्यान ऑटोमेटेड मुव्हर व टर्मिनल टी३ साठी साईट तयार करण्याचे काम सुरू होईल. टर्मिनल टी४ जोडण्यासाठी भूमिगत ऑटोमेटेड पीपल मुव्हरचे बांधकाम सुरू करण्यात येईल.
मार्च २०२९ - टर्मिनल टी३ साठी बांधकामाला सुरुवात होईल.
मार्च २०३२ - टर्मिनल ४ टी४ सह सर्व टप्प्यांसाठी अंतिम मुदत असेल.


प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन

‘सिडको’ला खात्री आहे की, भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल व टप्पा-२च्या मंजुर्‍या मिळविण्याच्या कामाला गती येईल. सध्या प्रकल्पाला लागणारी जमीन ‘सिडको’च्या ताब्यात आहे. प्रकल्पबाधित रहिवाशांची घरे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता शिक्षण संस्था, देवळे इत्यादींचे नियोजन सुरू आहे. एकूण साडेतीन हजार कुटुंबे प्रकल्पबाधित आहेत व त्यांचे सुविधायुक्त पुनर्वसन करणे नियोजित आहे. त्या प्रकल्प बाधितांकरिता आमच्याकडून उद्योग वा नोकर्‍या देणे क्रमप्राप्त आहे.


विमानतळानजीक हरित वातावरण फुलणार

सिडकोने हरित वातावरणाची निर्मिती हे ध्येय ठेवले आहे. विमानतळाजवळच्या २४५ हेक्टर क्षेत्राच्या वाघिवली गावातील खारफुटींच्या जंगलांची देखभाल शिवाय कामोठा गावचे ३१० हेक्टर क्षेत्र व मोहा खाडीजवळ ६० हेक्टर क्षेत्र आणि विमानतळ जागेच्या उत्तरेकडील मोठे पाणवठ्यांचे क्षेत्र अबाधित ठेवण्यात येणार आहे. त्याचा विस्तार व नवीन लागवड करणे व जैवविविधता जगवणे, ही कामे ‘सिडको’नी करावयाचे ठरवले आहे.


नैना नगराचे नियोजन

पनवेलच्या पुढे नियोजित नागरी प्रदेश विकसित झालेला नाही. म्हणून या प्रदेशांचा ‘सिडको’ने अभ्यास केला व ५० किमी अंतरावर असलेल्या विमानतळानजीकच्या प्रदेशांवर त्याचा परिणाम लक्षात घेऊन ‘सिडको’ने नियोजन सुरू केले आहे. ‘सिडको’कडे या नैना प्रदेशाच्या विकासाची जबाबदारी सरकारनी सोपवली आहे. हे क्षेत्र सुमारे ६०० चौ. किमी व्यापले आहे. त्यापैकी फक्त ५० टक्के क्षेत्र एक स्वरचित सामर्थ्यावर स्मार्ट शहर म्हणून विकसित होऊ शकते.

एकूणच नवी मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रातील सर्वांगीण प्रगती ही थक्क करणारी असून, विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर या क्षेत्रासह महाराष्ट्राच्या नावलौकिकातही भर पडणार आहे, हे निश्चित.



Powered By Sangraha 9.0