भाजप नेत्या माधवी लता यांचा उल्लेख ‘लेडी सिंघम’ असाही केला जात आहे. आपल्या भाषणांमधून हैदराबादमधील स्थानिक विषयांची जी चर्चा त्यांच्याकडून केली जात आहे, ती मतदारांना भावणारी अशीच. तळागाळातील जनतेचे प्रश्न माधवी लता या आपल्या भाषणातून मांडत असल्याने एक नवा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
हैदराबाद ही आपलीच जहागीर असल्याच्या थाटात वावरत असलेल्या ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद- उल मुस्लीमन’ या पक्षाचे नेते असदुद्दिन ओेवेसी यांना भाजपच्या स्थानिक नेत्या माधवी लता यांनी आव्हान दिले असून, त्यांच्या प्रचारामुळे हैदराबादचे राजकीय वातावरण ढवळून निघालेले दिसते. भाजपच्या नेत्या माधवी लता यांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन, त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुका होत असताना, हैदराबादच्या राजकीय क्षितिजावर माधवी लता यांचा झालेला उदय भाजप समर्थकांचा उत्साह वाढविणारा ठरला. भाजपच्या तत्वांचा आणि हिंदुत्वाचा हिरिरीने प्रचार करीत असलेल्या माधवी लता यांचा, ज्या भागात भाजपची शक्ती त्या तुलनेत कमी आहे. तेथील मतदारांवरही प्रभाव पडत आहे.
भाजप नेत्या माधवी लता यांचा उल्लेख ‘लेडी सिंघम’ असाही केला जात आहे. आपल्या भाषणांमधून स्थानिक विषयांची जी चर्चा त्यांच्याकडून केली जात आहे, ती मतदारांना भावणारी अशीच. तळागाळातील जनतेचे प्रश्न माधवी लता या आपल्या भाषणातून मांडत असल्याने एक नवा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. माधवी लता यांनी अलीकडेच ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात रजत शर्मा यांना जी मुलाखत दिली, त्या मुलाखतीचेही खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले होते.
माधवी लता या जुन्या हैदराबाद शहरातील याकतपुरा विधानसभा क्षेत्रातील. गेल्या २५ वर्षांमध्ये त्या भागात विकासाचा गाडा जो रुतून बसला आहे, त्यावर माधवी लता आपल्या भाषणात जोर देतात. शहरात पायाभूत शिक्षण सुविधांचा अभाव, पूरस्थितीकडे डोळेझाक; लांगूलचालनाचे धोरण यामुळे हिंदू आणि मुस्लीम समाजात तणाव वाढत असल्याकडे त्या आपल्या भाषणातून लक्ष वेधतात. जेथे एकेकाळी हिंदू मोठ्या संख्येने राहत होते, त्या भागातील हिंदू जातीय दंगलींमुळे अन्यत्र गेल्याने त्या भागात आता केवळ मूठभर हिंदू उरले आहेत, याकडे माधवी लता लक्ष वेधतात.
हैदराबाद एकीकडे ‘आयटी हब’ म्हणून ओळखले जात असले, तरी त्या लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांकडे दुर्लक्ष होत असल्याचे माधवी लता यांचे म्हणणे आहे. ओवेसी यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी खूपच कमी काम केले. त्याउलट आपल्या समाजाचे लांगूलचालन करण्यात आणि हिंदू समाजामध्ये घबराट निर्माण करण्यातच ते व्यस्त असतात, अशी टीका माधवी लता यांनी केली आहे.
आपण मुस्लीमविरोधी असल्याचा जो आरोप आपल्यावर केला जात आहे, त्याचेही त्या जोरदार खंडन करतात. मुस्लीम महिलांना न्याय मिळाला पाहिजे, याचा त्या हिरिरीने पुरस्कार करतात. ‘तिहेरी तलाक’चा त्या निषेध करतात. कुराणाच्या शिकवणीशी विसंगत असलेल्या प्रथांवर त्या टीका करतात. त्यांच्या या भूमिकेवरून मौलानांकडून त्यांना धमकाविले जात आहे. समान नागरी संहितेला ओवेसी यांच्याकडून होत असलेल्या विरोधावर त्या त्यांच्यावर कडाडून टीका करतात. समान नागरी कायद्यामुळे मुस्लिमांची ओळख विसरली जाईल, या ओवेसी यांच्या म्हणण्याचे खंडन करताना माधवी लता यांनी, त्यामुळे केवळ ओवेसी यांचे खरे रूप उघडे पडेल, अशी टीका केली आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या वेळी ‘एमआयएम’ आणि रझाकार यांनी हिंदू समाजावर केलेल्या अत्याचारांचे स्मरणही त्या करून देतात. हैदाराबादमधील मशिदींकडे ओवेसी दुर्लक्ष करतात, असे सांगतानाच मशिदीच्या जागांवर उभ्या राहिलेल्या निवासी बांधकामांकडे माधवी लता लक्ष वेधतात. त्यांनी (ओवेसी बंधू) मशीद तोडली, बिल्डरशी हातमिळवणी केली आणि अपार्टमेंटची उभारणी केली, असा आरोपही माधवी लता यांनी केला आहे. माधवी लता यांनी ओवेसी यांच्याविरूद्ध प्रचाराचा जो धुमधडाका लावला आहे, त्यामुळे त्यांनी हैदराबादच्या या स्वयंघोषित नेत्यास आव्हान दिले आहे. माधवी लता यांच्या प्रचारामुळे हैदराबाद शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.
‘द गार्डियन’च्या वृत्ताची योगींनी उडवली खिल्ली!
“दहशतवादाविरूद्ध जी जागतिक लढाई सुरू आहे त्याचे नेतृत्व भारत करील,” असे स्पष्ट प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे आयोजित प्रचारसभेत स्पष्टपणे सांगितले. काही दिवसांपूर्वी एका ब्रिटिश दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताने जगाचे आणि आमचेही लक्ष वेधून घेतले होते. त्यामध्ये पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांची कशी हत्या केली जात आहे, याचा उल्लेख होता. पण ही बातमी त्या वृत्तपत्रास कशाप्रकारे मिळाली हे केवळ तेच वृत्तपत्र जाणो, ‘गार्डियन’च त्याबद्दल सांगू शकेल,” असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ‘द गार्डियन’ने आपल्या वृत्तामध्ये, २०२० सालापासून पाकिस्तानमध्ये ज्या २० दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या, त्यामध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. पण, कोणत्या सूत्रांच्या आधारे हे वृत्त दिले, याबद्दल त्या वृत्तपत्राने काहीच भाष्य केले नव्हते. दहशतवाद हे आव्हान असल्याचे जगाने मान्य केले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी भारत जगाचे नेतृत्व करील, असे योगी आदित्यनाथ यांनी या प्रचारसभेत बोलताना स्पष्ट केले.
आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्याविरूद्ध तक्रार!
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या ६ एप्रिल रोजी बालुरघाट येथे आयोजित निवडणूक प्रचारसभेत भाजप नेत्यांविरूद्ध आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जी यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल प. बंगालमधील भाजप नेते शिशिर बाजोरिया यांनी प. बंगालच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मुख्यमंत्र्यांविरूद्ध तक्रार केली आहे. प. बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल; तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याबद्दल ‘गद्दार’ आणि ‘कुलांगार’ अशा शब्दांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाणूनबुजून वापर केला असल्याचे आयोगाकडे केलेल्या तक्रारीत भाजपने म्हटले आहे. अशा प्रकारची आक्षेपार्ह भाषा वापरली जाणार नाही, याची आयोगाने दक्षता घ्यावी, असेही आयोगास लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसने ३२ जागा जिंकल्या होत्या. भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला दोन आणि काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. पण, २०१९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने एकदम १८ जागा जिंकल्या होत्या. तृणमूल काँग्रेसला २२ जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या, तर डाव्या पक्षांना एकही जागा मिळाली नव्हती. आता प. बंगालमधील मतदान सात टप्प्यांमध्ये होणार आहे. तृणमूल काँग्रेसची आणखी किती अधोगती होते ते दि. ४ जून रोजी जनतेला दिसून येईल.
दत्ता पंचवाघ